अशी कल्पना करा, २०४५ सालची एक सुंदर पावसाळी संध्याकाळ आहे, तुम्ही ऑफिसचं सगळं काम जरा लवकर आवरलं आहे, कपडे बदलले आहेत, जेवणं लवकर उरकली आहेत आणि शहराच्या दुसऱ्या टोकाला होणाऱ्या “Bad Poetry Club” च्या शंभराव्या प्रयोगाला जायला निघाला आहात. गेल्या काही वर्षांत हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला आहे की तिकिटं महिनाभर आधी संपतात, कुणी त्याला “आयुष्यावर बोलू काही” नंतरची सर्वांत मोठी काव्यात्मक मराठी सांस्कृतिक चळवळ म्हणतं, कुणी “कवितेत चुकू काही” असं प्रेमाने नाव ठेवतं, आणि कुणाला अजूनही हे कळत नाही की जगातल्या जवळजवळ प्रत्येक माणसाला उत्तम कविता लिहून देणारा AI उपलब्ध असताना लोक पैसे देऊन वाईट कविता ऐकायला का जातात.
कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराशी मात्र पहिलाच नियम आहे, फोन, smart glasses, ear-buds, writing assistants सगळं बाहेर ठेवायचं, आत फक्त कागद आणि पेन घेऊन जायचं. रंगमंचावर एक टेबल, काही खुर्च्या, मागे मोठ्या अक्षरांत “BAD POETRY CLUB -100” आणि त्याखाली त्या कार्यक्रमाचं जुनं ब्रीदवाक्य, “इथे कविता सुधारली जात नाही”. कार्यक्रम सुरू झाल्यावर सूत्रसंचालक सांगतो की आजही नियम तेच आहेत, कविता लिहिताना AI वापरायचा नाही, लिहिल्यावर edit करायची नाही, cliché आला तर काढायचा नाही, यमक भयानक असेल तर भयानक होऊ द्यायचं, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कविता वाचून झाल्यावर कोणीही “इथे उपमा अजून specific करता आली असती”, “ending थोडी predictable आहे”, “हा metaphor खूप गुळगुळीत आहे” असं काही म्हणायचं नाही.
कारण २०४५ पर्यंत चांगली कविता लिहिणं खूपच सोपं झालं आहे.
एखाद्या तेरा चौदा वर्षांच्या मुलाने “तुझे डोळे समुद्रासारखे आहेत” असं लिहिलं तर त्याचा AI writing buddy त्याला ते वाक्य चुकीचं आहे असं सांगत नाही, तो फक्त नम्रपणे suggestion देतो की ही उपमा मागच्या दोनशे वर्षांत असंख्य वेळा वापरली गेली असल्याने त्याला स्वतःच्या अनुभवातलं काही अधिक specific शोधायचं आहे का. मग तो विचारतो, तिचे डोळे तुला नेमके कधी आठवतात, रंग महत्त्वाचा आहे की ती पाहण्याची पद्धत, समुद्र शांत आहे की उधाणलेला, आणि काही मिनिटांत त्या मुलाकडून अशी ओळ लिहून घेतो जी त्याच्या वयाच्या, वाचनाच्या आणि अनुभवाच्या कितीतरी पुढची वाटते. शाळांना हे आवडलं, पालकांना आवडलं, प्रकाशकांना तर फारच आवडलं, आणि काही वर्षांत “मनाचं आभाळ”, “आठवणींची शिदोरी”, “तुटलेलं हृदय”, “एकटा चंद्र” अशा प्रतिमा जवळजवळ नष्ट झाल्या. प्रत्येक कविता अधिक नेमकी, अधिक original, अधिक restrained, अधिक publishable झाली आणि एका विचित्र अर्थाने साहित्यिक इतिहासात पहिल्यांदाच “वाईट कविता दुर्मिळ झाली”.
बहुधा तेव्हाच कुणाला तरी जाणवलं की कुछ तो गडबड हैं.
कारण वाईट कविता ही नेहमीच काही कचरा किंवा भंगार नसते, अनेकदा ती चांगल्या कवितेचं बालपण असते. ग्रेस पहिल्यांदा वाचलेल्या तरुणाच्या वहीत काही महिने गरजेपेक्षा जास्त पाऊस पडणं, संध्याकाळी धुकं दाटणं आणि प्रत्येक तिसऱ्या कवितेत एखादा पक्षी अचानक उडून जाणं हे कदाचित साहित्यिक अपराध नसून apprenticeship असतं, कारण दुसऱ्याच्या अंधारात काही काळ राहिल्याशिवाय आपला अंधार वेगळा आहे हे अनेकदा कळत नाही. पद्मा गोळ्यांच्या कवितेतला स्त्रीचा साधा, स्पष्ट उच्चार आजच्या विविध AI model ला stylistically uncomplicated वाटू शकतो, पण एखाद्या काळात त्या साधेपणातच त्याचं धैर्य होतं. आरती प्रभूंच्या कवितेत एखादी प्रतिमा, उपमा आपल्याला पूर्ण समजत नाही म्हणून ती सुधारण्याची गरज नसते, कारण काही कविता अर्थ सांगत नाहीत, त्या आपल्या आत काही काळ ऋतूसारख्या राहतात. आणि ग्रेसांच्या कवितेला AI “या दोन प्रतिमांमधलं connection clearer करायचं का?” असं विचारत राहिलं असतं तर कदाचित कविता अधिक coherent झाली असती, फक्त त्यातला ग्रेस थोडा कमी झाला असता.
Bad Poetry Club ची कल्पना याच अस्वस्थतेतून जन्मेल कदाचित.
पहिल्या काही कार्यक्रमांत लोक फार हसतील, कारण स्वतःला जाणीवपूर्वक वाईट लिहू देणं हे २०४५ मध्ये जवळजवळ विसरलेलं कौशल्य?? झालं असेल. एखादा पन्नाशीचा माणूस “रात्र काळी आहे आणि मन उदास आहे” असं लिहून स्वतःच खजील व्हायचा, कारण त्याच्या डोक्यातला internal editor लगेच सांगायचा की रात्र काळी असतेच, त्यामुळे adjective redundant आहे आणि sadness सांगण्याऐवजी ती एखाद्या दृश्यातून दाखवणं अधिक प्रभावी ठरेल, पण club मध्ये कुणी त्याला मदत करणार नाही, कारण त्या खोलीत पहिल्यांदा माणसाला सतत सुधारलं न जाण्याचा अधिकार मिळेल, स्वातंत्र्य मिळेल.
आणि मग हळूहळू लोकांच्या लक्षात येईल की जगासाठी जुनी असलेली ओळ एखाद्या माणसासाठी नवीन असू शकते.
मृत आईबद्दल लिहिताना “घर रिकामं वाटतं” हे काही जगातलं सगळ्यात original वाक्य नाही, मुलगा पहिल्यांदा घर सोडून गेल्यावर “तुझी खोली अजून तशीच आहे” लिहिणं ही काही मोठी literary achievement नाही, प्रेमात पडलेला पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा “तुझे डोळे समुद्रासारखे आहेत” लिहितो तेव्हा त्याने कवितेच्या इतिहासात काही भर घातलेली नसते. पण कदाचित त्या क्षणी त्या प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात काहीतरी प्रथमच अनुभवलेलं कागदावर उतरवलेलं असतं, आणि AI ला जगात ती ओळ किती वेळा लिहिली गेली आहे हे उत्तम माहीत असलं तरी त्या माणसाला ती ओळ पहिल्यांदा का लिहावीशी वाटली याचं गणित वेगळं असतं.
शंभराव्या प्रयोगाच्या शेवटी एक सोळा वर्षांचा मुलगा रंगमंचावर येतो, आणि गंमत अशी की त्याने आयुष्यात कधीही AI शिवाय कविता लिहिलेली नाही. तो काही मिनिटं कागदाकडे पाहत राहतो, मग खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहतो आणि थोडा संकोचून विचारतो, “पावसाबद्दल लिहिलं तर cliché होईल ना?” प्रेक्षकांतून कुणीतरी हसत म्हणतं, “आज चालेल,” आणि तो मुलगा पुन्हा कागदाकडे पाहतो.
त्याची कविता फार चांगली नसते.
त्यात पाऊस असतो, आठवण असते, चंद्रही येतो, एका ठिकाणी “मनाचं आभाळ” येतं आणि सभागृहात थोडं हसू पसरतं, पण कोणी त्याला थांबवत नाही. शेवटी तो कविता वाचून झाल्यावर जरा लाजत म्हणतो, “मला माहीत आहे, ही खूप bad आहे”, तेव्हा पहिल्या रांगेत बसलेला एक वृद्ध कवी त्याला फक्त एवढंच विचारतो, “पण ती तुझी आहे ना?”
मुलगा काही क्षण विचार करतो आणि हो म्हणतो.
कदाचित २०४५ मध्ये कवितेसमोरचा सर्वांत मोठा प्रश्न AI कविता लिहू शकतो का हा उरलेलाच नसेल, कारण तोपर्यंत AI विलक्षण कविता लिहीत असेल, आपल्या आवडत्या कवींच्या शैलीत लिहीत असेल, आपल्या स्वतःच्या जुन्या diary वरून आपल्यापेक्षा अधिक आपल्यासारखी कविता लिहीत असेल. खरा प्रश्न बहुधा असा असेल की इतकी उत्तम कविता सहज उपलब्ध असताना माणसाने स्वतःची अपुरी, अडखळणारी, कधी cliché ने भरलेली कविता लिहायचीच कशासाठी.
आणि कदाचित Bad Poetry Club त्याचं एक छोटंसं उत्तर असेल.
कारण काही गोष्टी आपण जगात सर्वांत चांगल्या करण्यासाठी करत नाही, आपण त्या स्वतःपर्यंत पोहोचण्यासाठी करतो.
त्या रात्री कार्यक्रम संपल्यावर लोक फोन परत घेतील, AI assistants पुन्हा सुरू होतील आणि शहर पुन्हा आपल्या perfect भाषेकडे परत जाईल, पण कुठेतरी एका सोळा वर्षांच्या मुलाच्या खिशात एक दुमडलेला कागद असेल, ज्यावर पाऊस, चंद्र, आठवण आणि मनाचं आभाळ असलेली एक अत्यंत सामान्य कविता लिहिलेली असेल.
कित्येक वर्षांनी एक वाईट कविता पूर्ण झालेली असेल.
आणि कदाचित एक सच्चा, नविन, अपूर्ण कवी सुरू झालेला असेल.
-- विश्वेश



खुप छान!
अपनी हस्ती ही से हो जो कुछ हो
आगही गर नहीं, ग़फ़लत ही सही
गाण्याचं पण असेच होत चालले आहे . किती perfect सुरावट, ताना, वेलांट्या ... अति गोड