
रात्री झोपण्यापूर्वी आपण घरातले सगळे दिवे बंद करतो. टीव्ही बंद करतो, लॅपटॉपचं झाकण मिटतो, फोन बाजूला ठेवतो. घरात शांतता पसरते. पण त्या शांततेतही काहीतरी सुरूच असतं. टीव्हीवरचा एक छोटासा लाल दिवा अजूनही पेटलेला असतो. Wi-Fi Router अखंड काम करत असतो. फोनवर ईमेल येत असतात, अॅप्स अपडेट होत असतात. लॅपटॉप झोपलेला असतो, पण एका स्पर्शाने पुन्हा जागा होण्यासाठी तयार असतो.
आपल्याला वाटतं, आपण सगळी यंत्रं बंद केली आहेत.
पण खरंच?
आपल्या संगणकावर, टीव्हीवर, मोबाईलवर आणि असंख्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर एक छोटंसं चिन्ह असतं. वर्तुळाच्या वरच्या बाजूला एक उभी रेघ असलेलं. ⏻
आपण त्याला Power Symbol म्हणतो. जगातल्या सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या चिन्हांपैकी ते एक असावं. लहान मुलालाही ते बटण कशासाठी आहे हे माहीत असतं. पण या चिन्हाचा मूळ अर्थ काहीसा वेगळा आहे.
त्याची गोष्ट मजेशीर आहे.
पूर्वीच्या विद्युत उपकरणांवर दोन स्वतंत्र चिन्हं असायची. एक उभी रेघ, म्हणजे ‘I’, आणि एक वर्तुळ, म्हणजे ‘O’. ही चिन्हं Binary पद्धतीतल्या 1 आणि 0 शी जोडलेली आहेत. ‘I’ म्हणजे ON आणि ‘O’ म्हणजे OFF. विद्युत प्रवाह सुरू आणि बंद. यंत्राच्या अस्तित्वाच्या दोन स्पष्ट अवस्था.
नंतर या दोन चिन्हांना एकत्र करण्यात आलं. वर्तुळ आणि त्याच्या वरच्या बाजूला एक उभी रेघ. १९७३ मध्ये International Electrotechnical Commission ने तयार केलेलं हे चिन्ह आज New York च्या Museum of Modern Art च्या संग्रहातही आहे.
पण इथे एक गंमत आहे.
आपण सर्रास Power म्हणून वापरत असलेलं ⏻ हे चिन्ह IEC 60417 या आंतरराष्ट्रीय मानकात 5009 क्रमांकाने नोंदलेलं आहे. त्याचं नाव आहे Stand-by.
पूर्णपणे बंद नव्हे. सुरूही नव्हे.
पुन्हा सुरू होण्याच्या तयारीत असलेली अवस्था.
प्रत्यक्ष पूर्ण ON/OFF नियंत्रित करणाऱ्या बटणासाठी IEC चं वेगळं चिन्ह आहे. त्यातली उभी रेघ वर्तुळाच्या आतच थांबते. हा फरक इतका लहान आहे की तो बहुतेक वेळा आपल्या लक्षातही येत नाही. अर्थात, आज प्रत्येक उपकरणावर या चिन्हांचा वापर त्यांच्या मूळ अर्थाशी काटेकोरपणे जुळतोच असं नाही. काही उपकरणांत Power बटणाने यंत्र पूर्ण बंदही होतं.

तरीही Stand-by हेच चिन्ह आपल्या दैनंदिन भाषेत Power बनलं, यात आपल्या बदलत्या तंत्रज्ञानाची एक रंजक गोष्ट दडलेली आहे.
एकेकाळी उपकरणं खरोखर बंद होत असत. जुन्या रेडिओचा स्विच फिरवताना येणारा ‘खट्’ आवाज आठवा. आवाज थांबायचा आणि रेडिओ बंद व्हायचा. पुन्हा काही ऐकायचं असेल तर तो मुद्दाम सुरू करावा लागायचा. उपकरणांशी असलेलं आपलं नातंही काहीसं असंच होतं. गरज असेल तेव्हा वापरायचं, काम संपलं की बंद करायचं.
आजची उपकरणं वेगळी आहेत.
टीव्ही बंद केला की त्याची स्क्रीन काळी होते, पण तो Remote मधून येणाऱ्या पुढच्या आदेशाची वाट पाहत असतो. लॅपटॉपचं झाकण मिटलं की त्याची काम करण्याची पद्धत बदलते. फोनची स्क्रीन बंद झाली म्हणजे फोन बंद झाला असं होत नाही. Smart Home मधली अनेक उपकरणं तर सतत कुणीतरी आपल्याला हाक मारण्याची वाट पाहत असतात.
तंत्रज्ञानाने आपल्याला एक विलक्षण सोय दिली आहे. कोणतंही काम जिथे थांबवलं, तिथूनच पुन्हा सुरू करता येतं. कधीकधी तर ते थांबवण्याचीही गरज नसते. चित्रपट अर्धवट सोडला तरी पुढच्या वेळी त्याच क्षणापासून सुरू होतो. लिहीत असलेला मजकूर आपोआप सेव्ह होतो. फोन बदलला तरी फोटो, संदेश, संपर्क आणि अॅप्स पुन्हा मिळतात.
या सगळ्यामागे एक अपेक्षा आहे.
काहीही पूर्णपणे थांबू नये.
आणि हळूहळू ही अपेक्षा यंत्रांपुरती मर्यादित राहिलेली नाही.
आपणही Stand-by अवस्थेत जगू लागलो आहोत.
कार्यालयातून घरी आलो तरी ईमेल सुरू असतो. सुट्टीवर गेलो तरी एखाद्या महत्त्वाच्या मेसेजला उत्तर देता आलं पाहिजे. रात्री फोन Silent केला तरी सकाळी उठल्यावर काय काय घडलं याची उत्सुकता असते. WhatsApp वरचं Last Seen, Slack वरचा हिरवा ठिपका, Calendar मधली Availability, ही सगळी चिन्हं आता आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्याचा भाग बनली आहेत.
एखादा माणूस Offline दिसला की तो काय करत असेल, असा प्रश्न पडतो. कदाचित तो काहीच करत नसेल, ही शक्यता मात्र आपल्याला सहज सुचत नाही.
पूर्वी माणूस घरी नसेल तर त्याच्यापर्यंत पोहोचता येत नसे. घरी असला तरी झोपलेला असेल तर त्याला सकाळपर्यंत निरोप मिळत नसे. आज संदेश पाठवणाऱ्याला त्याच क्षणी उत्तर मिळावं अशी अपेक्षा. अर्थात प्रत्येकाची अशी अपेक्षा असतेच असं नाही, पण तशी सोय उपलब्ध असल्यामुळे उत्तर न देणं हा कधीकधी स्वतंत्र निर्णय ठरतो.
आपण कुठे आहोत, काय करत आहोत, यापेक्षा आपण उपलब्ध आहोत का, हा प्रश्न अधिक वारंवार विचारला जातो. Are you available?
यात तंत्रज्ञानाचा दोष किती आणि आपल्या सवयींचा किती, हे ठरवणं अवघड आहे. कारण या सततच्या उपलब्धतेचे फायदेही आहेत. हजारो मैलांवर असलेल्या आपल्या माणसाशी क्षणात बोलता येतं. अडचणीत असलेल्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवता येते. कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमधले लोक एकत्र काम करू शकतात.
पण या सोयीची एक किंमत आहे.
आपण विश्रांती घेत असतानाही पुढच्या व्यत्ययासाठी तयार असतो.
आपल्या वेळेचा काही भाग नकळत इतरांसाठी राखून ठेवलेला असतो. एखादा फोन येऊ शकतो, एखादा मेसेज येऊ शकतो, कुणाला काही विचारायचं असू शकतं. काहीच घडत नसलं तरी काहीतरी घडण्याची शक्यता सतत सोबत असते.
Stand-by म्हणजे निष्क्रियता नाही. ती पुन्हा सक्रिय होण्याची तयारी आहे.
या संदर्भात मला झोप आणि Stand-by मधला फरकही विचार करण्यासारखा वाटतो.
झोपलेल्या माणसाला जागं होण्यासाठी वेळ लागतो. तो झोपेत स्वप्न पाहतो, त्याचं शरीर विश्रांती घेतं. त्याला त्या काळात जगासाठी उपलब्ध राहण्याची गरज नसते. यंत्राच्या Stand-by अवस्थेचं उद्दिष्ट मात्र अगदी उलट असतं. ते शक्य तितक्या लवकर पुन्हा कामाला लागावं, यासाठीच ती व्यवस्था केलेली असते.
आपण स्वतःच्या विश्रांतीकडेही कधीकधी तसंच पाहतो का?
आठ तास झोपायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्यक्षम राहता येईल. सुट्टी घ्यायची, म्हणजे नव्या उत्साहाने कामाला लागता येईल. छंद जोपासायचा, म्हणजे ताण कमी होईल आणि उत्पादकता वाढेल.
अगदी वाचन, संगीत, फिरणं यांनाही काहीतरी उपयोग असावा असं आपल्याला वाटू लागतं.
एखादी गोष्ट केवळ करावीशी वाटते म्हणून करणं, किंवा काहीच न करणं, यासाठी आपण स्वतःला किती सहज परवानगी देतो?
आजकाल फोनवर Digital Wellbeing, Focus Mode, Do Not Disturb अशी अनेक साधनं उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोगही होतो. पण त्यांच्यात एक गंमत आहे. सतत उपलब्ध राहण्यासाठी बनवलेल्या उपकरणातच, काही काळ अनुपलब्ध राहण्यासाठी आपल्याला स्वतंत्र व्यवस्था करावी लागते.
पूर्वी फोन वाजू नये म्हणून रिसिव्हर बाजूला ठेवता येत असे. आज फोन वाजू नये म्हणून त्याच्या Settings मध्ये जावं लागतं.
आणि तरीही Emergency Contacts ना अपवाद ठेवण्याची सोय असते.
आपण पूर्णपणे अनुपलब्ध होण्याची कल्पनाही सावधपणे हाताळतो.
मला या सगळ्यात सर्वांत रंजक वाटतो तो त्या छोट्याशा चिन्हाचा प्रवास.
१९७३ साली तयार झालेलं एक साधं विद्युत चिन्ह. सुरुवातीला त्याचा अर्थ होता Stand-by. पुढे जगभरच्या उपकरणांवर लोकांनी त्याला Power म्हणून ओळखायला सुरुवात केली. एका अर्थाने वापरकर्त्यांनीच त्या चिन्हाचा अर्थ बदलला. New York च्या MoMA मध्ये त्याला Design चा एक नमुना म्हणून स्थान मिळालं.
आज त्या चिन्हाकडे पाहिलं की मला आणखी एक बदल जाणवतो.
जुन्या स्विचमध्ये ON आणि OFF या दोन स्पष्ट अवस्था होत्या. आधुनिक उपकरणांनी त्या दोघांच्या मध्ये एक तिसरी अवस्था तयार केली. ना पूर्ण सुरू, ना पूर्ण बंद. कायम तयार.

आपल्यापैकी अनेकांच्या दिवसांतही आता अशीच एक अवस्था असते. काम संपलेलं असतं, पण कामाचा विचार संपलेला नसतो. संवाद थांबलेला असतो, पण उत्तराची वाट पाहणं थांबलेलं नसतं. दिवस संपलेला असतो, पण पुढच्या दिवसाची यादी मनात सुरू झालेली असते.
कदाचित म्हणूनच त्या चिन्हाला पाहताना आता मला त्यातली उभी रेघ अधिक लक्षवेधी वाटते. वर्तुळ जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. पण वर एक छोटीशी फट आहे.
जणू बंद होण्याची प्रक्रिया शेवटच्या क्षणी थांबलेली आहे.
त्या उघड्या जागेतून पुन्हा कधीही सुरुवात करता यावी म्हणून.
आपण रोज कितीतरी वेळा ⏻ हे बटण दाबतो.
आणि प्रत्येक वेळी आपल्याला वाटतं, आपण काहीतरी बंद केलं.
कदाचित कधीतरी आपल्याला त्या जुन्या, साध्या ‘O’ चिन्हाचीही आठवण करून घ्यायला हवी.
ज्याचा अर्थ फक्त एकच होता.
OFF.
— विश्वेश


संपूर्ण स्विच ऑफ केलं तरी फोन किंवा लॅपटॉप चे घड्याळ सुरू रहातं, वीज गेल्यावर वॉशिंग मशीन बंद होतं पण किती मिनिटे चालले हे ते लक्षात ठेवते आणि वीज आल्यावर पुढे सुरू. आयुष्य जगतांना काही अनुभव पार आतपर्यंत पोचतात आणि आत्म्यावर संस्कार होतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत झालेल्या अशा बर्यावाईट संस्काराची मृत्यू पूर्वी साफसफाई करून जे "झिणी चदरिया, ज्यों की त्यों" परत करतात ते "जन्म-मरणाचा फेरा" चुकवून मुक्त होतात.. नाहीतर 'घड्याळ' सुरू च रहाते.