लंडनमध्ये आल्यापासून इथली दुकानं पाहताना मला एक गोष्ट जाणवली आहे. थोडं बारीक लक्ष दिलं आणि पॉप्युलर गोष्टींपलीकडं बघितलं तर इथं बराच काही अनोखं आहे, काही अनोखी ठिकाणं आणि काही दुकानं. काल Covent Garden मध्ये फिरताना आम्हाला चक्क कवितांचं औषधाचं दुकान सापडलं. “The Poetry Pharmacy”. लाकडी छोट्या खणांच्या कपाटात अनेक औषधाच्या बाटल्या ...
खरं तर पोराला लंडन मध्ये सोडायला येताना डॉक्टर कडून प्रत्येक आजाराच्या गोळ्या लिहून घेतल्या आणि त्याचा एक डबा त्याच्या रूमवर ठेवला आहेच. पण त्या झाल्या शाररिक आजारावरच्या गोळ्या. सर्दी, ताप, खोकला वगैरे. काही फारसं झालंच नाही पण घरची आठवण मात्र येते आहे तेव्हा काय करायचं? अर्थात फोनने हे सगळं सोपं केलं आहे. अंतराचं फारसं काही उरलेलं नाही. पोराला वाटलं तर तो कॉलेज मधून बाहेर पडताना आम्हाला video call करू शकतो. आज काय खाल्लं ते दाखवू शकतो, खोलीत नवीन पोस्टर लावलेलं दाखवू शकतो, रस्त्यात काही गंमत दिसली तर त्याच क्षणी पुण्याला पोहोचवू शकतो. आम्हीही घरात बसून त्याला आज कुठला पक्षी खिडकीत आला, आज पाऊस किती पडला, किंवा त्याच्यासाठी आलेलं एखादं निरर्थक courier दाखवू शकतो. पूर्वी परदेश आणि घर यांच्यामध्ये साता समुद्राचे अंतर असायचे आता बहुधा फक्त battery percentage हा एकमेव अडथळा आहे.
पण फोनने एक गोष्ट सोडवलेली नाही. वेळ. timezone.
लंडनची संध्याकाळ म्हणजे पुण्यात रात्र. आम्ही सकाळच्या चहाला त्याला फोन करायचा विचार करतो तेव्हा तो झोपलेला असेल. जगाने London आणि Pune एका screen वर आणून ठेवले, पण आता सारखी ही गणितं करावी लागतात.
पृथ्वीच्या स्वतः भोवतीच्या आणि सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेची जाणीव आता रोज होणार आम्हालाही आणि पोरालाही.
काही दिवसांनी पोराच्या कदाचित लक्षात येईल की प्रश्न फक्त time zone चाच नाही. कधी कधी फोन करण्यासारखं काही नसतं. दिवस वाईट गेलेला नसतो. काही problem नसतो. कॉलेज ठीक चाललेलं असतं. जेवण झालेलं असतं. मित्र भेटलेले असतात. उद्याचं वेळापत्रक अगदी नीट असतं. “काय झालं?” असं विचारलं तर उत्तर अगदी साधं असतं. “काही नाही”. पण घर आठवत असतं.
मला वाटतं घराची आठवण ही बातमी नसते. म्हणून ती फोनवर सांगणं अवघड असतं. फोनला काहीतरी बोलणं लागतं. घराला लागत नाही. घरात आपण कितीतरी तास एकमेकांशी न बोलता एकत्र असतो. आई kitchen मध्ये काहीतरी करत असते. बाबा दुसऱ्या खोलीत laptop घेऊन बसलेला असतो. कुणीतरी fridge उघडतं. कुणीतरी दार लावतं. “जेवणार आहेस का?” असा प्रश्न कुठूनतरी येतो. उत्तर दिलं जातं किंवा दिलं जात नाही. यात सांगण्यासारखं काही नसतं. पण घर बहुधा याच ‘काही नाही’ने बनलेलं असतं. फोन माणसाशी जोडतो. पण कधी कधी आपल्याला माणसाशी बोलायचं नसतं. त्याचं आसपास असणं हवं असतं. आणि त्यासाठी अजून कुठलंही app निघालेलं नाही.
कदाचित म्हणूनच Covent Garden मधल्या The Poetry Pharmacy मध्ये पोरांसाठी ते छोटंसं prescription घेताना मला आतून काहीतरी होत होतं.
त्यांनी त्याचं नाव विचारलं.
SIFAR.
आजार विचारला.
पोरानं बहुधा homesickness म्हटलं.
आणि pharmacist ने औषध लिहून दिलं:
POEMCETAMOL.
लाल-पांढऱ्या छोट्या capsules ची बाटली. Capsules खायच्या नाहीत. प्रत्येक capsule मध्ये कागदाची बारीक सुरळी आहे आणि त्या सुरळीवर कविता.
Prescription वर तिने लिहिलं:
One pill to be taken in the evening with a cup of coffee when you feel lonely and miss your home.
हे वाचून आम्ही हळवे हसलो.
मग पुढची ओळ वाचली.
Don’t be afraid. There is a thread that always connects you to your family.
मला त्यातला thread आवडला. नाळ नाही. नाळ कापावी लागते. दोरीने कुणाला तरी बांधून ठेवता येतं. धागा मात्र दोन गोष्टींना जोडून ठेवतो आणि तरी त्यांच्यामध्ये अंतर वाढू देतो. मुलगा मोठा करणं कदाचित एवढंच असावं. धागा तोडायचा नाही आणि त्याची लांबी ठरवायचीही नाही. अठरा वर्षं तो धागा काही फुटांचा होता. एका खोलीतून दुसऱ्या खोलीपर्यंत. कधी शाळेपर्यंत. कधी मित्राच्या घरापर्यंत. आता त्याची दोन टोकं पुणे आणि लंडनमध्ये असतील. आणि त्यात गंमत अशी की आम्ही त्याला लंडनला पाठवलंच यासाठी आहे की त्याने सतत त्या धाग्याकडे पाहत बसू नये. त्याने स्वतःचे मित्र करावेत, स्वतःचे रस्ते शोधावेत, चुकीच्या Tube मध्ये बसावं, lecture मध्ये बसून आपल्याला इतकी वर्षं जे खरं वाटत होतं त्याबद्दल शंका घ्यावी. काही दिवस फोन करायचा विसरावा. लंडनमध्ये असताना त्याने लंडनमध्येच असावं.
आणि तरी एखादी संध्याकाळ अशी येणारच. काही वाईट घडलेलं नसेल. म्हणूनच कदाचित ती सांगणं जरा अवघड असेल. त्या संध्याकाळीसाठी ही बाटली आहे. Emergency साठी नाही. मोठं दुःख झालं तर त्यासाठी माणसं आहेत. आम्ही आहोत. मित्र असतील. फोन आहे. मोठ्या दुःखाला बहुधा मोठ्याने सांगता येतं. हे औषध त्या छोट्या, नाव नसलेल्या संध्याकाळीसाठी आहे. ज्या दिवशी फोन करण्यासारखं काही नसेल, पण फोन करावासा वाटत असेल. ज्या दिवशी पुणं आठवत असेल, फार मोठी कुठली गोष्ट नाही अगदी फालतू काहीतरी. आईशी बोलायला काही नसेल, बाबाला विचारायचं काही नसेल, तरी ते दोघे आसपास असते तर बरं वाटलं असतं असं वाटेल.
त्या वेळी एक capsule काढायची.
ती उघडायची.
आतली कागदाची सुरळी वाचायची.
कुणीतरी कधीतरी लिहिलेल्या चार ओळी.
त्या घराची जागा घेणार नाहीत. त्यांनी घेऊही नये.
फक्त त्या संध्याकाळी त्या ओळी थोडा वेळ सोबत बसतील.
सगळ्यात सुंदर गोष्ट मात्र शेवटी त्यांच्या छोट्या पाकिटावर होती.
Patient: Sifar
Special Instructions: As needed.
कवितेसाठी यापेक्षा चांगलं prescription मला सुचत नाही.
“As needed” गरज पडेल तेव्हा.
आणि मला मनापासून वाटतं, ती बाटली त्याच्या drawer मध्ये तशीच पडून राहावी. तिच्यावर धूळ बसावी. लंडनमध्ये त्याचं आयुष्य इतकं भरून जावं की Poemcetamol ची आठवणही होऊ नये.
पण कधी एखादी संध्याकाळ आलीच, फोन हातात घेतला आणि पुण्यात आता किती वाजले असतील असा विचार आला, बोलण्यासारखं काहीच सुचलं नाही आणि तरी घर थोडंसं जवळ हवं वाटलं, तर त्यासाठी त्या बाटलीत काही गोळ्या आहेत.
Poemcetamol.
Some things don’t need a cure, don’t have a cure … they need solace!
Poetic Solace!
-- विश्वेश





