IT मधले सगळेच आता ऐटीत राहिले नाहीत
काम, AI आणि करिअरमधलं midlife crisis
परवा मला माझ्या मित्राने सहज विचारले “सध्या टेकमध्ये सगळे इतके उदास का आहेत?”
एक काळ असा होता की रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायला लागणं हा एक गौरवशाली प्रकार असायचा, फक्त महत्वाच्या लोकांना असं जास्तीचं थांबवून घ्यायचे. बाहेर बहुतेक दिवे गेलेले असायचे, आत काही monitors अजून उजळलेले, टेबलावर अर्धवट थंड झालेली कॉफी, कुणीतरी एका विचित्र bug च्या मागे तासभर लागलेला आणि मग अचानक कुठूनतरी आवाज यायचा, “झालं!” काही क्षणांनी सगळे त्या एका screen भोवती जमा व्हायचो. फार मोठं काही घडलेलं नसायचं. जग बदललेलं नसायचं. एखादा कोड चाललेला असायचा, एखादा crash थांबलेला असायचा, कालपर्यंत फक्त whiteboard वर असलेली एखादी गोष्ट आज पहिल्यांदा मॉनिटर वर किंवा फोनवर दिसलेली असायची. पण त्या क्षणी त्यात एक साधा (जवळजवळ बालिश) आनंद असायचा. काहीतरी चालत नव्हतं आणि आता ते चालत आहे. आणि त्या दोन अवस्थांच्या मध्ये आपण होतो. ह्या विजयाचे कधी आपण शिल्पकार होतो आणि बहुतेक वेळी साक्षीदार. त्या काळात संगणक मला अजूनही किंचित जादूचाच प्रकार वाटत होता.
Software अर्थातच कायमच अमूर्त होतं, पण त्याच्याशी आपलं नातं इतकं अमूर्त नव्हतं. आपण काहीतरी Software लिहायचो, ते चालायचं किंवा चालायचं नाही. चूक आपली असायची, दुरुस्तीही आपली. एखादं application पहिल्यांदा उघडलं, एखादं feature प्रत्यक्ष device वर जिवंत झालं, एखाद्या ग्राहकाने आपण बनवलेली गोष्ट वापरली की आपण केलेलं काम आणि जगात घडलेला छोटासा बदल यांच्यामध्ये एक थेट नाते तयार होत होते. त्या नात्यात फारसे कोणी मध्यस्थी नव्हते. रात्रभर जागून एकदा प्रॉब्लेम सोडवतांना आलेला वैताग, एखाद्या सहकाऱ्याने अचानक शोधलेलं solution आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळं चालू झाल्यावर मिळणारा क्षणिक विजय, या सगळ्यात केलेल्या श्रमाला एक अर्थ होता. संध्याकाळी घरी जाताना आपण दिवसभर काय केलं याचा कुठेतरी पुरावा होता.
नंतर वर्षे गेली. कंपन्या बदलल्या, products मोठे झाले, teams मोठ्या झाल्या आणि माझी स्वतःची भूमिका त्या सगळ्याबरोबर बदलत गेली. Code च्या जवळ बसणारा माणूस आधी code लिहिणाऱ्या लोकांची team सांभाळू लागला, मग अनेक teams, मग managers, मग organizations, product, strategy, budgets, hiring, roadmaps, acquisitions, leadership meetings. प्रत्येक पायरीवर कामाचं क्षेत्र मोठं होत गेलं. आपण घेतलेल्या निर्णयांचा परिणाम अधिक लोकांपर्यंत पोहोचू लागला. पण गंमत अशी की काम मोठं होत असताना ते माझ्यापासून अधिक दूरही जात गेलं. एकेकाळी माझ्यासमोरचा समस्या अगदी सध्या असायच्या. Program चालत नाही आणि तो हवा तसा चालायला हवा. पुढे समस्या अशा झाल्या की organization aligned नाही, ownership स्पष्ट नाही, execution predictable नाही, strategy sharp नाही, दोन teams एकमेकांशी पुरेसं बोलत नाहीत, आणि एखाद्या चांगल्या माणसाला चुकीच्या रोलमध्ये ठेवलं आहे. या समस्या कमी कठीण नाहीत. अनेकदा code लिहिण्यापेक्षाही कठीण आहेत. पण त्या हातात धरता येत नाहीत. दिवसभर दहा-बारा तास काम करून laptop बंद केल्यानंतर कधी कधी स्वतःलाच विचारावंसं वाटतं, आज मी नेमकं काय केलं? लोकांशी बोललो, काही निर्णय घेतले, काही निर्णय होऊ दिले नाहीत, कुणाचा राग ऐकून घेतला, कुणाला धीर दिला, काही ambiguity कमी केली, काही conflict स्वतःमध्ये absorb केला. कदाचित leadership म्हणजे मोठ्या प्रमाणावर हेच. तरी मनाच्या एखाद्या आदिम भागाला संध्याकाळी अजूनही काहीतरी समोर ठेवून म्हणावंसं वाटतं, हे बघ, आज हे केलं.
कदाचित म्हणूनच “सध्या टेकमध्ये सगळे इतके उदास का आहेत?” हा प्रश्न मला नवीन वाटला नाही. कारण बाहेरून पाहणाऱ्याला टेकमध्ये उदास होण्यासारखं काय आहे हेच समजणार नाही. हे अजूनही जगातल्या सर्वांत चांगल्या पगाराच्या उद्योगांपैकी एक आहे. कामात स्वातंत्र्य आहे, जगभरच्या बुद्धिमान लोकांबरोबर काम करता येतं, सतत नवीन काही शिकायला मिळतं. साध्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या माझ्यासारख्या कित्येकांसाठी या उद्योगाने कल्पनेपलीकडचं आयुष्य उघडलं. आपण बनवलेली गोष्ट लाखो, कधी कोट्यवधी लोकांच्या हातात पाहण्याचा अनुभव फार थोड्या व्यवसायांत मिळतो. काही मित्रांबरोबर किंवा सहकाऱ्यांबरोबर शून्यातून एखादा product उभा राहिलेला पाहण्याचा थरार अजूनही मला अमूल्य वाटतो. या उद्योगाने मला भरपूर दिलं आहे आणि ते विसरून त्याच्यावर टीका करणं कृतघ्नपणाचं ठरेल. पण कृतज्ञता आणि अस्वस्थता एकाच मनात राहू शकतात. एवढं सगळं मिळाल्यावरही आत कुठेतरी कोरडेपणा का जाणवतो, हा प्रश्न त्यामुळेच अधिक अवघड होतो.
आता याला burnout म्हणणं खूप सोपं आहे. पण मला आता ही उदासी workload पेक्षा अधिक अर्थाशी संबंधित वाटते. मी प्रचंड कामाच्या काळात आनंदी असलेली माणसं पाहिली आहेत आणि तुलनेने आरामदायी पदांवर गेल्यानंतर आतून विझत गेलेलीही. Burnout शरीराला होतो, उदासी मनाला होते. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत टेक उद्योगाने आपल्याला रोजगाराबरोबर एक संपूर्ण नवीन भाषा दिली. आपण “impact” करतो, “scale” करतो, “transform” करतो, “unlock” करतो, “disrupt” करतो. आपल्या कामात एक mission असते, company ला purpose असतो, team ला north star असतो. साधी नोकरी जणू पुरेशी प्रतिष्ठित राहिली नाही. प्रत्येक startup जग बदलणारचं हवं, प्रत्येक product मानवी अनुभव पुन्हा परिभाषित करणारं हवं आणि प्रत्येक dashboard च्या मागे एक revolution लपलेल हवं. Corporate भाषेची विलक्षण ताकद अशी की ती साध्या व्यवहाराला महाकाव्याचं रूप देऊ शकते आणि त्या महाकाव्यात आपण आपली भूमिका बराच काळ अगदी मनापासून निभावू शकतो.
हे सगळं खोटं होतं असंही नाही. त्या वेळी एखादे नवे product किंवा feature launch खरंच महत्त्वाचे वाटत होते. एखादी hiring decision रात्री झोप उडवत होती. एखाद्या engineer चे career वैयक्तिकदृष्टया आपल्याला महत्त्वाचा होते. Product failure मनाला लागत होते. आपण जे मानत होतो ते त्या क्षणी खरंच मानत होतो. पण काळाची एक विचित्र आणि किंचित निर्दयी सवय आहे. काळ corporate urgency ला सहज फाट्यावर मारतो. ज्या roadmap वर सहा महिने घालवले तो दोन वर्षांनी कुणालाच आठवत नाही. ज्या reorg ने संपूर्ण office काही आठवडे अस्वस्थ झालेलं असतं त्या org ची नावंसुद्धा नंतर बदलून जातात. ज्या feature वरून दोन वरिष्ठ लोकांनी तासभर वाद घातलेला असतो ते feature एखाद्या release note मध्ये दोन ओळींची सूचना न देता शांतपणे बंद झालेलं असतं. त्या वेळी मात्र ते सगळं म्हणजेच आपलं जग असं वाटलं होतं. Career चा एक टप्पा असा येतो की ही दोन्ही दृश्यं आपल्याला एकाच वेळी दिसू लागतात. एखादं काम एकाच वेळी जास्त महत्वाचंही किंवा अर्जंट असतं आणि इतकंसं महत्त्वाचंही नसतं. ही दोन वाक्यं एकाच वेळी खरी असू शकतात, हे समजायला बहुतेक अर्धं आयुष्य जावं लागतं.
आपल्या आईवडिलांच्या पिढीकडे पाहिलं तर नोकरीशी त्यांचं नातं अनेकदा अधिक साधं होतं. नोकरी करायची, ती नीट करायची, घर चालवायचं, मुलांना शिकवायचं, मिळेल त्यातून थोडं थोडं साठवायचं. आयुष्याचा उरलेला अर्थ कुटुंबात, मित्रांत, शेजारात, श्रद्धेत, एखाद्या सवयीत, एखाद्या छोट्या छंदात विखुरलेला असायचा. आपण मात्र कामाकडून खूप जास्त मागायला लागलो. पैसा हवा, प्रतिष्ठा हवी, बौद्धिक समाधान हवं, मित्र हवेत, identity हवी, purpose हवा, self-worth हवा आणि शक्य असेल तर अमरत्वाची एखादी corporate आवृत्तीही म्हणजे legacy हवी. “मी काय करतो?” हा प्रश्न “मी कोण आहे?” या प्रश्नात इतका मिसळला की business card वरचं पद कधीकधी स्वतःच्या नावाचा भाग वाटायला लागलं. Team वाढली की आपण मोठे झाल्यासारखं वाटलं, calendar भरलं की आपण महत्वाचे आहोत असं वाटलं. कुणाला आपली गरज आहे आणि कुणीतरी फक्त आपल्या approval ची वाट पाहत आहे यातला फरक लक्षात न घेणं हे seniority चं एक विचित्र occupational hazard असावं.
David Graeber ने Bullshit Jobs मध्ये उपस्थित केलेला प्रश्न म्हणूनच इतका अस्वस्थ करणारा आहे. काही कामं निरर्थक असतात ही त्यातली सर्वांत भीषण कल्पना नाही. स्वतःला आपलं काम निरर्थक वाटू शकतं आणि तरी आपण रोज सकाळी उठून त्या कामाच्या महत्त्वाचा अभिनय करत राहू शकतो, ही खरी अस्वस्थ करणारी अवस्था आहे. Corporate जगाने त्या अस्वस्थतेवर एक अत्यंत प्रभावी औषध शोधून काढलं आहे, ते म्हणजे व्यस्तता. विचार करायला वेळ मिळू नये इतकं काम. सकाळी WhatsApp, Slack, मग meeting, मग email, मग review, मग planning, मग status, मग decision, मग दुसऱ्या meetingची तयारी, मग कुणाच्या presentation वर comments. दिवसाच्या शेवटी calendar कडे पाहिलं की आपण फार काही केल्याची भावना निर्माण होते. कधीकधी फार काहीच घडलेलं नसतं, आपण फक्त फार व्यस्त असतो. पण आधुनिक professional आयुष्यात या दोन गोष्टींचा फरक इतका कमी दिसू लागला आहे की रिकामा calendar पाहून समाधानाऐवजी अपराधीपणा वाटू लागतो.
टेक उद्योगाला efficiency चं विलक्षण आकर्षण आहे. आपण आयुष्यभर software अधिक वेगवान, अधिक frictionless, अधिक scalable बनवण्याचा प्रयत्न केला. आणि paradox असा की software अधिक efficient होत गेलं तशी माणसं अधिक व्यस्त होत गेली. Email ने पत्राचा वेळ वाचवला, chat ने email चा, collaborative documents ने attachments चा, video calls ने प्रवासाचा, automation ने manual कामाचा. तरी आपल्याकडे वेळ उरला नाही. प्रत्येक नवीन tool ने थोडा वेळ वाचवला आणि आपण तो वेळ पुन्हा कामाने भरून काढला. आपण वेळ वाचवणारी यंत्रं बनवत राहिलो आणि त्यांनी वाचवलेला प्रत्येक तास नवीन अपेक्षांनी आधीच busy करून ठेवला.
आणि आता AI या सगळ्याच्या मध्यभागी येऊन उभा आहे.
AI बद्दलची खरी अस्वस्थता मला नोकरी जाण्याच्या भीतीत आहे असं वाटत नाही. Automation आपण याआधीही पाहिलं आहे. Technologies आल्या, roles बदलले, काही कौशल्यं कालबाह्य झाली, काही कंपन्या संपल्या आणि नवीन निर्माण झाल्या. पण AI हे प्रकरण वेगळं आहे कारण तो फक्त आपल्या श्रमांवर प्रश्न उपस्थित करत तर आपल्या बौद्धिक अहंकारालाही डिवचतो. आपण स्वतःला बराच काळ सांगत आलो की repetitive काम automate होईल, पण विचार करणं, लिहिणं, analysis, strategy, creativity, judgement या गोष्टी मात्र मानवी राहतील. आता मशीन code लिहितं, presentation तयार करतं, research करतं, customer feedback वाचून patterns शोधतं, strategy चे विविध पर्याय देते आणि corporate भाषेत बोलताना कधीकधी आपल्यापेक्षाही अधिक corporate वाटतं. त्यामुळे प्रश्न फक्त “उद्या माझी नोकरी असेल का?” असा राहत नाही. त्याहून अधिक व्यक्तिगत आणि किंचित अपमानकारक प्रश्न समोर येतो. जर हे सगळं एवढ्या सहज करता येत असेल, तर मी इतकी वर्षं करत तरी काय होतो?
हा प्रश्न मी स्वतःलाही विचारतो. अनेक वर्षांच्या अनुभवाचं मूल्य नेमकं कुठे आहे? Documents मध्ये, decisions मध्ये, instincts मध्ये, चुकीची गोष्ट लवकर ओळखण्यात, लोकांबद्दलच्या judgement मध्ये, की हजारो परिस्थिती पाहिल्यानंतर नकळत मनात तयार झालेल्या pattern recognition मध्ये? आज एखाद्या तरुण engineer ला किंवा product manager ला AI काही सेकंदांत अशा गोष्टी सांगू शकतो ज्यासाठी आम्हाला एकेकाळी वर्षे खर्च करावी लागली. त्यात मला ईर्ष्या वाटत नाही, उलट काहीसा आनंद आहे. आपण ज्यासाठी इतकी धडपड केली ते पुढच्या पिढीला सहज मिळणं ही प्रगतीच आहे. पण मग अनुभव म्हणजे काय, हा प्रश्न अधिक क्लिष्ट होतो. कदाचित अनुभव म्हणजे फक्त उत्तरं माहीत असणं नाही, तर कोणता प्रश्न खरा आहे हे ओळखणं हेही असेल. Leadership म्हणजे उत्तर देणं नाही, तर कोणत्या उत्तराची किंमत कोणाला चुकवावी लागेल हे समजणं. Judgement म्हणजे माहितीचे परिमाण नसून, परिणामांचा अंदाज थोडा आधी येणेही असू शकते. मशीनकडे उत्तरं असू शकतील, पण किती चुका अंगावर घेतल्यावर शहाणपण येतं यासाठी अजून shortcut सापडलेला नाही.
तरीही AI ने आपल्या कामाबद्दलची एक समजूत मात्र उघडी पाडली. अनेक वर्षं आपण output ला identity मानलं. माझा code, माझा document, माझी strategy, माझं presentation, माझा analysis. आता हे सगळं काही सेकंदांत तयार होत असेल तर “माझं” नेमकं काय उरतं? कदाचित याच कारणाने टेकमध्ये अनेकांना अचानक हाताने काहीतरी करण्याची ओढ लागलेली दिसते. कुणीतरी bread बनवतं, कुणी gardening करतं, कुणी woodworking शिकतं, कुणी film camera पुन्हा वापरायला लागतं, कुणी vinyl गोळा करतं. मला fountain pen ने लिहिण्यातला सर्वांत आवडणारा भाग कदाचित त्याची पूर्ण अनुत्पादकता आहे. संगणकावर पाच मिनिटांत लिहिता येईल ते हाताने लिहायला वीस मिनिटं लागतात. चूक झाली तर Ctrl+Z नसतो. अक्षर वाकडं असेल तर ते तसंच राहतं. शाई कधी जास्त येते, कागद कधी साथ देत नाही, nib कधी अडखळते. कोणत्याही productivity consultant च्या दृष्टीने हा वेळेचा अपव्यय आहे. पण कदाचित म्हणूनच तो इतका मानवी आहे. त्या पानावर शब्दांबरोबर, शैबरोबर वेळही सुकत असते. ते अक्षर सुंदर असो वा नसो, त्या क्षणी माझा हात तिथून गेला होता याचा पुरावा त्यात राहतो.
मला कधी कधी वाटतं आपल्याला analog गोष्टींची ओढ ही फक्त nostalgia म्हणून लागलेली नाही. आपल्याला causality ची (कार्यकारणभाव) भूक लागली आहे. मी काहीतरी केलं आणि त्यातून काहीतरी घडलं, या साध्या अनुभूतीची. अनेक वर्षे आभासी काम केल्यानंतर ही भूक अधिक तीव्र होते. एखाद्या organizationमध्ये तुम्ही योग्य माणूस आणता, संस्कृती थोडी बदलण्याचा प्रयत्न करता, एखाद्याला promotion देता, एखाद्याला कठीण feedback देता, कुणाच्या बाजूने उभे राहता. याचा परिणाम कधी सहा महिन्यांनी दिसतो, कधी दोन वर्षांनी, कधी कधीच दिसत नाही. काही निर्णयांचे परिणाम तुम्ही company सोडल्यानंतर उमलतात. काही चांगल्या गोष्टींचं श्रेय तुम्हाला मिळत नाही आणि काही वाईट गोष्टींची जबाबदारी मात्र मिळते. पण एखाद्या संध्याकाळी तुम्ही fountain pen उचलता, दोन पानं लिहिता आणि ती दोन पानं टेबलावर असतात, तुमच्या डोळ्यासमोर, बस इतकंच. कदाचित café, pottery, gardening, सुतारकाम किंवा पुस्तकांचं दुकान यांची स्वप्नं याच कारणाने पडतात. आपल्याला खरोखर café चालवायचं नसतं. आपल्याला कदाचित संध्याकाळी shutter खाली करताना दिवस संपल्याची जाणीव हवी असते. आज एवढे लोक आले, एवढ्या cups मध्ये coffee गेली, काही गप्पा झाल्या, आता दुकान बंद. टेकमध्ये आता दिवस कधीच बंद होत नाही.
याच ठिकाणी आपल्या industry ची friction (असुलभता) बद्दलची चीड मला आता थोडी संशयास्पद वाटायला लागते. आपण वर्षानुवर्षे friction म्हणजे वाईट असं मानलं. User ला कमी clicks मध्ये गोष्टी करता आल्या पाहिजेत, engineer ला रोजचे काम करायला कमी परिश्रम पडले पाहिजेत, company ला कमी cost, decision ला कमी वेळ. यातून अद्भुत products तयार झाले आणि त्याला कमी लेखण्याचं काहीच कारण नाही. पण सगळंच friction हे waste नसतं. ते आपल्याला हाही अनुभव देत असतं, शिकवत असतं. दोन लोकांनी तासभर एखाद्या कल्पनेवर वाद घालणं spreadsheet मध्ये inefficient दिसू शकतं, पण त्या तासात फक्त निर्णय झालेला नसतो. त्यांनी एकमेकांना थोडं अधिक समजून घेतलेलं असतं. Junior engineer ला स्वतः bug शोधू देणं वेळखाऊ आहे, पण प्रत्येक उत्तर AI agent ने दिलं तर स्वतःच्या चुका स्वतः शोधता येण्याचे skill कसे तयार होणार? एखादं पुस्तक तीन आठवडे हळूहळू वाचणं inefficient आहे. मित्राबरोबर तीन तास गप्पा मारणं पूर्णपणे unscalable आहे. मुलाला तीच गोष्ट चौथ्यांदा समजावणं कोणत्याही productivity metric मध्ये बसत नाही. प्रेम, मैत्री, पालकत्व, वाचन, कला, दुःख, आठवण यापैकी जवळजवळ काहीच optimized नाही. तरी आयुष्याचा ज्या भागाला आपण शेवटी अर्थपूर्ण म्हणतो तो बहुधा याच inefficient गोष्टींनी बनलेला असतो.
म्हणून AI बद्दल मला भीतीपेक्षा कुतूहल जास्त आहे, पण त्या कुतूहलात सावधपणाही आहे. Repetitive आणि निरर्थक कामापासून AI आपल्याला मुक्त करेल ही विलक्षण गोष्ट आहे. पण corporate जगाचा इतिहास पाहता त्या मुक्त वेळेचं आपण काय करू याबद्दल मला फारसा आशावाद वाटत नाही. आठ तासांचं काम दोन तासांत झालं तर पहिला प्रश्न बहुधा असा नसेल की या माणसाला उरलेले सहा तास परत देता येतील का. प्रश्न असेल, आता याच्याकडून चारपट काम कसं करून घेता येईल का? Productivity चा लाभ आपण leisure मध्ये रूपांतरित करत नाही, expectation मध्ये करतो. कालची extraordinary efficiency उद्याची baseline होते. म्हणून AI चा खरा प्रश्न technology चा नसावा. तो आपण वाचलेल्या वेळेचं काय करतो याचा आहे. मशीन आपल्यासाठी अधिकाधिक काम करू शकत असेल, तर आपण कमी काम करून अधिक जगू (जगणे उपभोगू) का, की आणखी काम शोधू?
वय वाढलं की या प्रश्नांचा स्वर बदलतो. Career च्या सुरुवातीला पुढचं पद, पुढची company, पुढचा मोठा product, पुढची promotion यांचं आकर्षण स्वाभाविक असतं आणि असायलाही हवं. महत्त्वाकांक्षा ही सुंदर गोष्ट आहे. तिने मला अशा अनेक ठिकाणी नेलं जिथे कधीकाळी आपण जाऊ शकू अशी मी कल्पनाही केली नव्हती. पण आयुष्याची एक गंमत अशी की त्या ठिकाणी एकदा जाऊन बसल्यानंतर कळतं, त्या खोल्याही शेवटी खोल्याच आहेत. Senior लोकांनाही uncertainty असते. Strategies अपूर्ण माहितीवर बनतात. मोठ्या कंपन्यांमध्येही improvisation चालू असतं. आपण खाली असताना ज्यामागे विलक्षण बुद्धिमत्ता आहे असं वाटायचं असे काही निर्णय प्रत्यक्षात तीन थकलेल्या माणसांनी एका तासाच्या meeting मध्ये कंटाळून घेतलेले असतात. ही जाणीव cynical बनवू शकते. मला मात्र तिच्यात सत्यता वाटते. कारण मग कामाचं नेपथ्य मागे जातं आणि त्याच्या आतली माणसं दिसू लागतात.
माझ्या career मधल्या कितीतरी releases ची नावं मला आज आठवत नाहीत. काही products आता अस्तित्वातही नाहीत. काही कंपन्या विकल्या गेल्या, काही teams विखुरल्या, कितीतरी org charts नामशेष झाले. पण आश्चर्य म्हणजे काही चेहरे अगदी स्पष्ट आठवतात. एखाद्या कठीण काळात माझ्यावर विश्वास ठेवणारा manager. Promotion मिळाल्यावर चेहऱ्यावर आलेला एका engineer चा आनंद. एखादा project अपयशी ठरल्यानंतर रात्री बसून झालेलं संभाषण. Acquisition च्या काळातली अनिश्चितता. ऑफिस रिकामं होत असताना उशिरापर्यंत बसलेल्या काही लोकांच्या पूर्णपणे निरर्थक गप्पा. त्यातल्या एखाद्या joke ची आठवण अजून आहे, पण त्या quarter चा revenue किती होता हे मात्र अजिबात आठवत नाही. Career चा हिशेब शेवटी dashboards मध्ये राहत नाही. तो माणसांच्या चेहऱ्यांत राहतो. त्या वेळी आपण ज्याला “impact” म्हणत होतो त्यापेक्षा ज्यांच्या आयुष्यात आपण नकळत एखादा छोटासा ठसा ठेवला ते लोक अधिक काळ टिकतात.
कदाचित टेकमधली आजची उदासी ही याच संक्रमणाची उदासी आहे. आपण कामाला धर्म केलं आणि आता त्या धर्माची देवळं रिकामी वाटू लागली आहेत. Company म्हणजे family नाही हे कळलं. Mission statement म्हणजे तत्त्वज्ञान नाही हे कळलं. Productivity हा नैतिक गुण नाही आणि busy असणं म्हणजे महत्त्वाचं असणं नाही, हेही हळूहळू कळलं. आता AI ने शेवटचा थोडा उद्धट प्रश्न विचारला आहे. तुम्हाला स्वतःबद्दल विशेष वाटायला लावणाऱ्या कितीतरी गोष्टी मशीनही करू शकत असेल तर मग तुमच्यात विशेष काय आहे?
याचं उत्तर दुसऱ्या एखाद्या skill मध्ये शोधणं हा बहुधा आपला पहिला instinct असेल. Prompting शिका. Agents शिका. नवीन tool शिका. पुढच्या लाटेच्याही पुढे पोहत रहा. आणि ते सगळं करायलाच हवं. मीही करतो. पण तरी प्रश्न सुटत नाही. कारण आपण पुन्हा एका नव्या कौशल्याभोवती जुनीच ओळख बांधत असतो. त्यामुळे खरा प्रश्न वेगळा आहे.
“कामापलीकडे आपण कोण आहोत?”
हा प्रश्न वीसाव्या वर्षी आणि चाळिशीनंतर सारखा ऐकू येत नाही. वीसाव्या वर्षी career म्हणजे समोर उघडलेला रस्ता असतो. किती आणि काय काय मिळवता येईल ते दिसत राहतं. नंतर कधीतरी समोरच्या रस्त्याबरोबर मागचा रस्ताही दिसू लागतो. आपण कुठे पोहोचलो याबरोबर कुठे थांबलो नाही हे दिसतं. कोणत्या meetings मुळे घरी उशिरा पोहोचलो, कोणत्या weekends ला laptop उघडला, किती “urgent” गोष्टी आज पूर्णपणे विस्मरणात गेल्या, किती वेळा कुणाला “पुढच्या आठवड्यात बोलू” म्हटलं आणि तो पुढचा आठवडा कधी आला नाही, हे दिसतं. हा पश्चात्तापाचा हिशेब नाही. त्या वेळच्या आपल्याने त्या वेळच्या माहितीवर काही निवडी केल्या आणि बहुधा पुन्हा तिथे गेलो तरी त्यातल्या अनेक निवडी आपण तशाच करू. पण वय एक शहाणपण देतं की प्रत्येक गोष्ट समान महत्त्वाची नाही.
म्हणून मला आता कधी कधी वाटतं AI ने टेकमधल्या माणसाला दिलेली सर्वांत मोठी भेट productivity नसावी. ती एक प्रकारची अपमानकारक जाणीव असावी. आपण स्वतःबद्दल ज्या काही गोष्टी फार गंभीरपणे मानत होतो त्यातला बराच भाग automate करता येतो हे त्याने दाखवून दिलं आणि कदाचित नेमकी तिथेच खरी मज्जा आहे. जर माझं मूल्य माझ्या प्रत्येक document मध्ये नसेल, title मध्ये नसेल, team च्या आकारात नसेल, calendar च्या गर्दीत नसेल, तर ते कुठे आहे हा प्रश्न स्वतःला विचारता येतो. मी कसा विचार करतो, कुणाशी कसा वागतो, कुणाच्या बाजूने उभा राहतो, कुणाला पुढे ढकलतो, कुणासाठी वेळ थांबवतो, काय वाचतो, काय लिहितो, कोणत्या गोष्टींचा उपयोग नसतानाही त्या मला प्रिय असल्यामुळे करतो, कदाचित इथे यातलं उत्तर दडलं असावं.
कधीकाळी रात्री उशिरा एखादे release यशस्वी झाली की आम्ही screen भोवती जमायचो. कालपर्यंत अस्तित्वात नसलेली गोष्ट आज जन्माला आली. त्या क्षणी तेवढंच पुरेसं होतं.
आता मशीन काही सेकंदांत कालपर्यंत नसलेल्या शंभर गोष्टी तयार करू शकतं.
आणि इतकी वर्षं technology च्या जवळ राहिल्यानंतर पहिल्यांदा मला प्रश्न पडतो आहे की
निर्माण करणं म्हणजे नेमकं काय?
कदाचित काहीतरी अधिक वेगाने बनवणं नाही.
कदाचित आपल्या हाताचा, आपल्या वेळेचा, आपल्या उपस्थितीचा काही अंश एखाद्या गोष्टीत ठेवणं.
कधी एखाद्या माणसात.
कधी एखाद्या पानावर.
कधी अशा एका संध्याकाळीत जिचा पुढच्या quarter च्या revenue शी काहीही संबंध नाही.
एक लक्षात घ्या इथून पुढं मशीनला काम सोपवताना कदाचित आपल्याला एवढंच पाहायचं आहे की हळूहळू, नकळत, आपण आयुष्यही त्याच्याकडे सोपवत नाही आहोत ना.
-- विश्वेश


