पूर्वी पुण्यातल्या जगप्रसिद्ध आप्पा बळवंत चौकात नु म वि शाळेच्या रांगेत, झेरॉक्स च्या दुकानाशेजारी एका छोट्याश्या त्रिकोणात कुमार काका भेळवाले होते. शाळा कॉलेज मध्ये असतांना मी अगदी न चुकता तिथे जात असे. ते मला नेहमी "या स्कॉलर" असे म्हणायचे - त्यांच्या मते ज्यांनी १०-१२ मध्ये चांगल्या कॉलेजमध्ये जाण्याइतके मार्क मिळवले आणि ज्यांना कॉम्पुटर वापरता येतो ते सगळे स्कॉलर! बाकी मी फार काही स्कॉलर वगैरे नव्हतो! काकांबद्दल मला विशेष प्रेम होते. अगदी माझे जेव्हा ठराविक एका मुलीबरोबर लग्न करायचे ठरले तेव्हाही मी तिला कुमार काकांना भेटायला घेऊन गेलो होतो (अर्थात घरी भेळ वगैरे करण्याच्या भानगडीत पुढे तू पडू नकोस, माझे भेळेचे स्टॅंडर्ड हे आहे - हे मुख्यतः सांगायचे होते).
असो तर ते उत्तम फरसाण भेळ, भडंग भेळ द्यायचे. अजूनही त्या भेळेची चव आठवते, कधी आंबट गोड तर कधी एकदम झटका तिखट आणि त्याबरोबर कुमार काकांबरोबरच्या गप्पा तोंडी लावायला, माझ्या लहानपणीच्या अनेक संध्याकाळ मी इथे घालवल्या. आता कुमार काका आहेत का माहिती नाही, भेळेचे दुकान तरी बरेच दिवसात उघडे दिसले नाही, किंवा ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्वीग्गी इत्यादी ऑनलाईन उद्योगांनी आम्हाला ह्यांच्यापासून दूर नेले. आता वह्या, पुस्तके, सटेशनरी आणायला, कराची ची लस्सी प्यायला तिथपर्यंत जावे लागत नाही. घरबसल्या ऑर्डर या सोयी सुविधांच्या नावाखाली अशी कित्येक ठिकाणे आणि माणसे तुटली माणुसकी तुटली, आता कितीही "स्कॉलर" असून काही फायदा नाही .... आता वाटते आपण श्रीमंत झालो कि गरीब?
बाकी आता ओल्ड गणेश, न्यू गणेश, फलाना फलाना यांनी भेळ या प्रकारचे एकंदरीतच "कल्याण" केले आहे!
- विश्वेश
Nostalgia at it's peak