पुस्तक परिचय - सीपियाँ - जावेद अख्तर
कबीर, तुलसी, वृंद, रहीम आणि बिहारी, संकलन आणि समीक्षा: जावेद अख्तर
पुस्तकाचे नाव - सीपियाँ - उर्दू, अवधी, मारवाडी, खरी बोली, हिंदी
लेखक / कवी - कबीर, तुलसी, वृंद, रहीम आणि बिहारी, संकलन आणि समीक्षा: जावेद अख्तर
आवृत्ती - प्रथम आ. २५ जानेवारी २०२५
पृष्ठ संख्या - २९६
मूल्य - रु २९९
प्रकाशन - राजकमल प्रकाशन
प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक आणि शायर जावेद अख्तर यांचे अलीकडे एक नवीन पुस्तक आले आहे ज्याचे नाव आहे “सीपियाँ”. या पुस्तकात जावेद अख्तर यांनी कबीर, तुलसी, वृंद, रहीम आणि बिहारी अशा आणि इतर काही कवींच्या दोह्यांचे संकलन केले आहे. भारतीय काव्य परंपरेत दोहा हा अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावशाली छंद आहे. हे दोहे आपल्या संक्षिप्तता, सरलता आणि सार-गर्भितेसाठी प्रसिद्ध आहे. दोहा असतो केवळ दोन ओळींचा पण आयुष्य उलगडवून दाखवू शकतो, विचार करायला लावणारे प्रश्न निर्माण करू शकतो. दोहा हा छंद हिंदी साहित्यातील भक्ति, नीति आणि प्रेम काव्यात अत्यंत प्रभावशाली भूमिका बजावत आलेला आहे. दोह्याची संक्षिप्तताच त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे ते म्हणी आणि लोकोक्तींप्रमाणे स्मरणीय बनत गेले. जावेद अख्तर आपल्या आजच्या दैनंदिन जीवनाशी ह्या दोह्यांना जोडतात आणि सांगतात की ह्यातला अर्थ समजून, आत्मसात करून, आचरण करून आपण स्वतःमध्ये आणि समाजमध्येदेखील सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.
या पुस्तकात जावेद साहेबांनी शेकडो वर्षांपूर्वीचे हे शिंपले आपल्यासमोर उलगडले आणि आपल्या समोर त्यातले मोती मांडले आहेत.
आता रहिम चा हा दोहा बघा: (१६०० च्या शतकातला आहे हा)
रहिमन मुश्किल आ पड़ी, टेढ़े दऊ काम।
सीधे से जग न मिले, उलटे मिले ना राम॥6॥
आपण आपल्या आयुष्यात अनेकदा हे अनुभवले असेल. खऱ्या वागण्याने दुनिया मिळत नाही, लोक खुश होत नाहीत, आणि खोट्यातून रामाची प्राप्ती होत नाही. इथे राम म्हणजे निष्ठेचे, खऱ्याचे, प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे.
शब्द सम्हारे बोलिये ,शब्द के हाथ न पाँव ,
एक शब्द औषध करे ,एक शब्द करे घाव।
ह्या कबीरदासाच्या दोह्याची गम्मत अशी की इथे कबीर “बात सम्हारे बोलिये ,बात के हाथ न पाँव” असेही म्हणू शकला असता. पण “बात” तुम्ही कोणतीही करू शकता, शब्द कोणते वापरता याला महत्व आहे. आपल्याला शब्द लक्षात राहतात मग ते कटू असोत व प्रेमळ. याच्या पुढे जाऊन कबीर म्हणतो -
याच विषयावर कवी वृंद म्हणतात:
पावत बहुत तलास तैं, करतैं छुटी बात ।
आँधी मी टूटी गुडी, कौन जाने कित जात ।।
म्हणजे ज्या प्रकारे वादळात सुटलेला पतंग माहित नाही कुठपर्यंत जाईल, तसेच तुमचे बोललेले शब्द ... आणि यालाच तुलसीदास अगदी समर्पक पणे म्हणतात
तुलसी मीठे वचन ते, सुख उपजत चहूं और ।
बसीकरण इक मंत्र है, परिहर वचन कठोर ।।
गोड वाणी सगळीकडे आनंद पसरवते, हि वाणी म्हणजे एक वशीकरणाचा मंत्रच जणू, म्हणून आपल्या आयुष्यातून कठोर शब्द काढून टाका ...
कागा काको धन हरै, कोयल काको देत।
मीठे बोल सुनाय के, जग अपना कर लेत।।
कावळ्याने कोणाचे धन लुटले आहे, अन कोकिळेने कोणाला काय दिले? आपल्या गोड वाणीने तिने जगाला आपलेसे केले. यावरून आपण शिकतो की वाणी मधाळ असल्याने जग जिंकता येते.
दोह्यांमध्ये रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींवर जास्त भर असलेला दिसतो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, आपल्या आजूबाजूच्या, अगदी घरात सहज सापडणाऱ्या ह्यांचा वापर करून दिलेली शिकवण ती ही अगदी सहज सोप्या शब्दात म्हणजे रहीम चा हा दोहा “सुई” बद्दल बोलतो:
रहिमन देख बड़ेन को, लघु न दीजिए डारि।
जहां काम आवे सुई, कहा करे तरवारि।।
आता ह्यात खरंतर सुई हे प्रतिकात्मक आहे, छोट्या गोष्टींकरता. मोठी किंवा महागडी वस्तू मिळाल्यावर लहान किंवा स्वस्त वस्तूचे मूल्य कमी होत नाही. प्रत्येक वस्तूचे स्वतःचे महत्त्व असते.
आता हा रहीम चा दोहा ऐका:
रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय।
टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय॥
इथे रहीम मुद्दामूनच चटकाय म्हणतो म्हणजे प्रेमाचा धागा झटका देऊन तोडून टाकणे, साधे नाही, चटकण्याचा आवाज इथे रहीमने वापरला आहे, ज्यातून तो हिसका आपल्याला वाचतांनाही जाणवतो.
हे दोहे जरी हे शेकडो वर्षांपूर्वी लिहिले गेले असले तरी आजही ते तितकेच समर्पक वाटतात. दोहा हे अर्ध-सम मात्रिक छंद आहे. दोह्याचे चार चरण असतात. याच्या विषम चरणांत (पहिला व तिसरा) १३ मात्रा आणि सम चरणांत (दुसरा व चौथा) ११ मात्रा असतात.
उदाहरणार्थ :
बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर।
पंथी को छाया नहीं, फल लागैं अति दूर।।
म्हणजे नुसत्या पोकळ मोठेपणाचा काय उपयोग जर तुम्ही दुसऱ्याच्या उपयोगी पडत नसाल? खजुराचे झाड न सावली देते न हाताशी फळ येते.
या पुस्तकातून मला काही नवीन महाकवींची ओळखही झाली. “महाकवी घाघ” हे नाव मी कधीच ऐकले नव्हते आणि त्यांचे दोहे वाचून पुढे त्यांच्याबद्दल उत्सुकताही वाढली. पुन्हा कधीतरी सविस्तर लिहेन त्यांच्याबद्दल, पण हा दोहा बघा:
अति का भला न बरसना, अति की भली न धूप ।
अति का भला न बोलना, अति की भली न चूप ।।
कुठलीच गोष्ट अति झाली की त्याची माती होते ...
ट्विटर (किंवा आता त्याला X म्हणून ओळखतो आपण) जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा आपल्याला वाटले १४० अक्षरांत कसे व्यक्त व्हायचे? परंतु शेकडो वर्षांपूर्वीचे हे दोहे बघता त्यांना ४०-५० अक्षरेही पुरली, ते हि अगदी व्याकरणाचे नियम लावून...
जावेद साहेब सांगतात कि कुठल्याही कलेला २ महत्वाची अंग असतात - स्वैर, स्वच्छंद, विचारांचे आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे आणि दुसरीकडे नियम, बद्धता, सुसूत्रता आणि चौकट आहे. याने कला निखरून येते. उदाहरण म्हणजे हॅम्लेट चे पात्र मूळ कथानकानुसार अत्यंत गोंधळलेले आणि ठाम निर्णय न घेणारे, चलबिचल जरी असले तरी ते सादर करणारा कलाकार “टू ऑर नॉट टू बी” च्या वेळी स्टेजवर आखून दिलेल्या खुणेवर आलाच पाहिजे तरच त्याच्यावर फोकस घेता येईल. तर असे हे दोहे छोट्या सुसूत्र बांधणीतून आपल्याला आयुष्य जगण्याचं ज्ञान देऊन जातात. प्रत्येक दोह्याचे विश्लेषण जावेद साहेबांनी त्यांच्या खुमासदार शैलीत केलेले असल्यामुळे एकदा का तुम्ही हे शिंपले (म्हणजे सीपियाँ) उघडलेत कि तुमच्या मनाच्या ओंजळीत कायमस्वरूपी हे मोती घर करून राहतील. तेव्हा हे पुस्तक नक्की वाचा.
याचा शेवटचा दोहा आहे रहीम यांचा:
तरुवर फल नहिं खात हैं, सरवर पियहिं न पान।
कहि रहीम पर काज हित, संपति सँचहि सुजान॥
झाडं आपली फळं कधीच खात नाहीत, सरोवर आपले पाणी आपणच पीत नाही त्याच प्रमाणे मोठी महान माणसं आपण केलेले काम, जमवलेले सगळॆ दुसऱ्यांवर खर्च करतात ...
-- विश्वेश


