गप्प राहण्याचे दोन अर्थ
काही मुलं स्वभावाने अबोल असतात. काहींना बोलायला फारसं आवडत नाही. पण काही मुलं अशीही असतात, ज्यांनी बोलून काही उपयोग होत नाही, हे फार लहान वयात शिकून घेतलेलं असतं. त्यांना कुणी गप्प बसायला सांगण्याचीही गरज उरत नाही. त्यांची शांतता हळूहळू त्यांच्या स्वभावाचाच भाग बनून जाते. अशा मुलांकडे पाहताना आपण अनेकदा त्यांच्या अबोलपणाची नोंद घेतो, पण त्या अबोलपणामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत नाही.
आयर्लंडचा The Quiet Girl हा चित्रपट अशाच एका मुलीची गोष्ट सांगतो. वरकरणी अतिशय साधी, एका उन्हाळ्यापुरती मर्यादित असलेली गोष्ट. पण चित्रपट संपल्यानंतर त्या मुलीचा चेहरा, तिचे निरागस डोळे आणि तिचं न बोलणं बराच काळ आपल्यासोबत राहतं.
चित्रपटाचं मूळ आयरिश नाव आहे An Cailín Ciúin. दिग्दर्शक Colm Bairéad यांचा २०२२ साली प्रदर्शित झालेला हा पहिलाच पूर्ण लांबीचा कथाचित्रपट. आयरिश लेखिका Claire Keegan यांच्या Foster या लघुकादंबरीवर तो आधारित आहे. कथा घडते ती १९८० च्या दशकाच्या सुरुवातीच्या ग्रामीण आयर्लंडमध्ये.
नऊ वर्षांची Cáit एका मोठ्या, गजबजलेल्या, पण आतून विस्कटलेल्या कुटुंबात वाढते आहे. घरात मुलांची गर्दी आहे, पैशांची चणचण आहे, आई सतत कामात आणि चिंतेत आहे, तर वडील बेफिकीर आणि अनेकदा कठोर आहेत. Cáit ला शाळेतही फारसं कुणी समजून घेत नाही. ती इतर मुलांमध्ये मिसळत नाही, अभ्यासात मागे आहे आणि अनेकदा स्वतःच्याच जगात हरवलेली असते. घरी किंवा शाळेत, तिच्या अस्तित्वाची दखल घेणारे लोक फारसे नाहीत.
आईला आणखी एक मूल होणार असल्यामुळे Cáit ला काही दिवसांसाठी आईच्या नात्यातल्या एका जोडप्याकडे पाठवण्याचं ठरतं. तिच्या मताला त्यात विशेष स्थान नसतं. वडील तिला गाडीतून घेऊन जातात आणि एका अनोळखी घरात सोडून परत निघतात. निघताना तिची बॅगही गाडीतच राहते. हा प्रसंग चित्रपटात अगदी सहज घडतो. कुठलंही नाट्य नाही, मोठा संवाद नाही. पण एवढ्याशा प्रसंगातून त्या बापाचं आपल्या मुलीकडे असलेलं दुर्लक्ष किती खोलवर रुजलं आहे, हे आपल्याला समजतं.
नव्या घरात Eibhlín आणि Seán हे मध्यमवयीन जोडपं राहत असतं. त्यांचं शेत आहे. घर स्वच्छ, नीटनेटकं आहे. परिसर हिरवागार आहे आणि घरात एक वेगळीच शांतता आहे. Eibhlín पहिल्याच दिवसापासून Cáit ची आपुलकीने काळजी घेते. तिला गरम पाण्याने आंघोळ घालते, स्वच्छ कपडे देते, तिचे केस विंचरते आणि जेवायला वाढते. या सगळ्या अगदी साध्या गोष्टी आहेत. पण Cáit साठी त्या अनोळखी आहेत. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेपेक्षा सुरुवातीला जास्त दिसतो तो संकोच. आपल्याशी कुणी इतक्या मायेने का वागतं आहे, हेच तिला समजत नसावं.
आपण लहान मुलांना कितीतरी गोष्टी शिकवतो. कसं बोलायचं, कसं वागायचं, मोठ्यांचा आदर कसा करायचा, शिस्त कशी पाळायची. पण आपल्यावर प्रेम केलं जातं आहे, हे ओळखायला मुलांना शिकवावं लागतं का? Cáit ला पाहताना हा प्रश्न सतत पडत राहतो. ज्या मुलीला प्रेमाचा पुरेसा अनुभवच नाही, तिला मायेचा साधा स्पर्शही सुरुवातीला अपरिचित वाटतो.
Eibhlín च्या तुलनेत Seán मात्र फारसा बोलत नाही. तो Cáit पासून काहीसं अंतर राखून असतो. शेतावरची कामं, जनावरांची देखभाल आणि स्वतःच्या विचारांत तो गुंतलेला दिसतो. त्याच्या या वागण्यामागे काहीतरी आहे, याची जाणीव आपल्याला हळूहळू होते. पण Cáit च्या आयुष्यातला कदाचित सर्वांत सुंदर बदल याच माणसामुळे घडतो.
एका प्रसंगात Seán स्वयंपाकघरातून जाताना Cáit साठी टेबलावर एक बिस्किट ठेवून जातो. तो तिला जवळ बोलावत नाही, काही प्रेमळ शब्द बोलत नाही, तिच्या डोक्यावरून हातही फिरवत नाही. फक्त एक बिस्किट ठेवतो. किती साधा प्रसंग! पण त्यातून त्या दोघांमधलं अंतर थोडंसं कमी झालेलं आपल्याला जाणवतं. पुढे शेतावरच्या कामात, एकत्र चालताना आणि रोजच्या छोट्या कृतींतून त्यांचं नातं आकार घेत राहतं.
इथेच चित्रपटाच्या नावाला वेगळा अर्थ मिळू लागतो.
Cáit च्या पहिल्या घरातली शांतता आणि या नव्या घरातली शांतता एकसारखी नाही. पहिल्या घरात तिचं बोलणं ऐकून घ्यायला कुणी नसतं. नव्या घरात तिने बोलावं म्हणून कुणी तिच्यावर दबाव आणत नाही. पहिल्या घरात ती दुर्लक्षित आहे, तर दुसऱ्या घरात ती गप्प असतानाही तिच्याकडे लक्ष दिलं जातं. एखाद्याला गप्प राहण्याची मुभा देणं आणि एखाद्याला गप्प राहण्यास भाग पाडणं, यातला फरक या चित्रपटाने अतिशय सुंदरपणे दाखवला आहे.
माणसांच्या नात्यांमध्ये शब्दांना आपण खूप महत्त्व देतो. प्रेम व्यक्त केलं पाहिजे, संवाद झाला पाहिजे, भावना बोलून दाखवल्या पाहिजेत, असं आपण म्हणतो. त्यात चूकही काही नाही. पण काही नाती शब्दांशिवायही तयार होतात. कुणाला काय हवं आहे हे लक्षात ठेवणं, त्याच्या अस्वस्थतेची जाणीव असणं, त्याच्या सोबतीला शांतपणे बसणं, या गोष्टीही संवादच असतात. Seán आणि Cáit यांच्यातला संवाद याच भाषेत घडत राहतो.
तरीही या घरात सगळंच आलबेल नाही. Eibhlín एकदा Cáit ला सांगते की या घरात कुठलीही गुपितं नाहीत. पण हळूहळू आपल्याला कळतं की या घरातही एक दुःख दडलेलं आहे. त्या दुःखाचा उल्लेख घरात फारसा होत नाही. Cáit ला त्याची जाणीव एका बाहेरच्या व्यक्तीकडून होते आणि त्यानंतर या दोघांच्या वागण्याचा अर्थ तिला नव्याने उमगू लागतो.
या टप्प्यावर चित्रपट केवळ एका दुर्लक्षित मुलीची गोष्ट राहत नाही. तो अशा दोन माणसांचीही गोष्ट बनतो, ज्यांच्या आयुष्यात काहीतरी हरवलं आहे आणि ज्यांना आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी पुरेसे शब्द सापडलेले नाहीत. Cáit आणि हे जोडपं एकमेकांच्या आयुष्यात येतात तेव्हा कुणीच कुणाला वाचवण्याच्या उद्देशाने आलेलं नसतं. पण एकमेकांच्या सहवासात त्यांना काही काळापुरता का होईना, एक वेगळा दिलासा मिळतो.
चित्रपटातलं दृश्यभान विशेष उल्लेखनीय आहे. Cinematographer Kate McCullough यांनी वापरलेली 1.37:1 ही जवळजवळ चौकोनी फ्रेम आजच्या रुंद पडद्याच्या चित्रपटांपेक्षा वेगळी वाटते. Cáit चं छोटंसं विश्व, तिच्याभोवतीची माणसं आणि तिच्या हालचाली या मर्यादित चौकटीत अधिक जवळून दिसतात. दिग्दर्शक कॅमेरा अनेकदा तिच्याजवळ ठेवतो. त्यामुळे मोठ्यांच्या जगात घडणाऱ्या गोष्टींकडे आपणही तिच्याच नजरेतून पाहतो. मोठी माणसं काहीतरी बोलत असतात, त्याचा संपूर्ण अर्थ तिला कळत नसतो, पण त्या शब्दांमधला राग, उपेक्षा किंवा आपुलकी मात्र तिला अचूक जाणवत असते.
आयर्लंडचं हिरवंगार ग्रामीण सौंदर्य चित्रपटात सतत दिसत राहतं. झाडांच्या सावल्या, पाण्याची विहीर, उन्हात चमकणारी पानं, स्वयंपाकघरातला प्रकाश आणि शेतातून जाणाऱ्या पायवाटा. या सगळ्याचं चित्रण एखाद्या चित्रासारखं सुंदर आहे. पण त्या सौंदर्यात Cáit हरवून जात नाही. उलट तिच्या चेहऱ्यावरचे अतिशय सूक्ष्म बदल अधिक स्पष्टपणे दिसू लागतात.
चित्रपटात दोन वेगवेगळ्या प्रकारचे धावण्याचे प्रसंग आहेत. सुरुवातीला Cáit गवतात लपते. जणू इतरांच्या नजरेतून नाहीशी होण्याची तिची इच्छा असते. पुढे ती झाडांच्या मधून मोकळेपणाने धावताना दिसते. धावणं हीच कृती आहे, पण त्या दोन प्रसंगांतल्या मुलीमध्ये काहीतरी बदललं आहे. तीच जागा, तोच निसर्ग आणि त्याच मुलीच्या हालचाली वापरून दिग्दर्शक तिच्या मनात घडणारा बदल आपल्यापर्यंत पोहोचवतो.
Sound Design देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पानांची सळसळ, पक्ष्यांचे आवाज, पाण्याची हालचाल, भांड्यांचा किरकिराट आणि अधूनमधून ऐकू येणारे माणसांचे आवाज. चित्रपटात संवाद कमी आहेत, पण आवाजांची कमतरता नाही. शांततेलाही स्वतःचा एक आवाज असतो, याची जाणीव हा चित्रपट करून देतो.
Cáit ची भूमिका करणाऱ्या Catherine Clinch चा अभिनय तर विलक्षण नैसर्गिक आहे. विशेषतः ती फारसं बोलत नसल्यामुळे तिच्या नजरेतून आणि चेहऱ्यावरील अगदी लहान हालचालींतून अनेक गोष्टी व्यक्त होतात. एखादी गोष्ट समजून घेण्याचा तिचा प्रयत्न, कुणी प्रेमाने बोलल्यावर वाटणारा संकोच, हळूहळू निर्माण होणारा विश्वास आणि त्या विश्वासाबरोबर येणारी असुरक्षिततेची जाणीव, हे सगळं तिने फार सहजपणे साकारलं आहे.
या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची Irish भाषा. बहुतांश संवाद इंग्रजीत नसून आयरिशमध्ये आहेत. जागतिक चित्रपटांच्या संदर्भात भाषेचा प्रश्न मला नेहमीच रंजक वाटतो. आपण एखाद्या भाषेतला चित्रपट पाहतो, त्या भाषेचे शब्द आपल्याला कळत नाहीत, सांस्कृतिक संदर्भही अनोळखी असतात, तरीही एखाद्या माणसाचं दुःख किंवा आनंद आपल्यापर्यंत सहज पोहोचतो. The Quiet Girl ने २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या Oscar नामांकनापर्यंत मजल मारली. असं नामांकन मिळवणारा तो पहिला आयरिश भाषेतील चित्रपट ठरला.
मला या चित्रपटातली एक गोष्ट विशेष आवडली. Cáit ला नव्या घरात मिळणाऱ्या प्रेमामुळे तिच्या मूळ घरातलं दुःख नाहीसं होत नाही. तिचे आईवडील अचानक बदलत नाहीत. तिचं आयुष्य एका उन्हाळ्यात कायमचं सुखी होणार आहे, असं आश्वासनही दिग्दर्शक देत नाही. उलट, हा उन्हाळा संपणार आहे आणि Cáit ला पुन्हा आपल्या जुन्या आयुष्यात परतावं लागू शकतं, ही जाणीव प्रेक्षक म्हणून आपल्याला सतत अस्वस्थ करत राहते.
इथे एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो. ज्याला आयुष्यात कधी फारसं प्रेम मिळालेलं नाही, त्याला काही काळासाठी का होईना, प्रेमाचा अनुभव देणं पुरेसं असतं का? त्या अनुभवाने त्याचं पुढचं आयुष्य अधिक सुखकर होतं, की आधीच्या आयुष्यातली उणीव अधिक तीव्रतेने जाणवू लागते? चित्रपट याचं सोपं उत्तर देत नाही.
Claire Keegan यांच्या Foster या मूळ साहित्यकृतीत मुलीच्या अंतर्मनातील अनुभव शब्दांतून व्यक्त होतात. चित्रपटात मात्र त्या शब्दांची जागा कॅमेरा घेतो. साहित्य आणि सिनेमा या दोन कलाप्रकारांमधला हा फरक मला फार सुंदर वाटतो. लेखिका ज्या गोष्टी निवेदनातून सांगू शकते, त्या दिग्दर्शकाला चेहऱ्यांमधून, प्रकाशातून, हालचालींतून आणि दोन प्रसंगांमधल्या शांततेतून सांगाव्या लागतात. The Quiet Girl मध्ये हे रूपांतर अतिशय संवेदनशीलपणे झालं आहे.
चित्रपटाचा शेवटही तसाच आहे. त्या शेवटाबद्दल इथे फारसं लिहिणार नाही. पण शेवटचा प्रसंग पाहताना आपल्याला जाणवतं की एखाद्या नात्याला नाव देणं किती अवघड असू शकतं. जन्माने मिळालेली नाती आणि सहवासातून निर्माण झालेली नाती यांच्यात कधी कधी माणूस अडकून पडतो. विशेषतः एखाद्या लहान मुलासाठी हा पेच किती मोठा असेल, याची कल्पनाही करणं अवघड आहे.
चित्रपट संपल्यानंतर मला मात्र वारंवार आठवतो तो Seán ने टेबलावर ठेवलेल्या त्या बिस्किटाचा प्रसंग. Cáit च्या आयुष्यातल्या अनेक माणसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. या माणसाने तिच्याकडे लक्ष दिलं. त्याने काही विशेष केलं नाही. एक बिस्किट ठेवलं. पण त्या कृतीतून Cáit ला पहिल्यांदाच कदाचित असं जाणवलं असेल की या घरात आपल्या असण्याची कुणालातरी जाणीव आहे.
आणि मग चित्रपटाच्या नावातल्या Quiet या शब्दाचा अर्थही बदलतो.
सुरुवातीला गप्प राहणारी Cáit आपल्याला एकटी वाटते. शेवटी ती अजूनही फारशी बोलत नाही. पण आता तिच्या शांततेत दुसऱ्या कुणाच्यातरी उपस्थितीचा आधार मिसळलेला असतो.
— विश्वेश



