गाण्याची वही
साठवणीतली गाणी
माझ्या आईकडे तिच्या गाण्यांच्या वह्या होत्या (विशारद होती ती). तिला आवडलेली किंवा ती म्हणत असलेली बरीचशी गाणी तिने ह्या वह्यांमध्ये लिहून ठेवलेली होती. ती मला माझ्या लहानपणापासून म्हणायची की तुला आवडणाऱ्या गाण्यांची एक वही कर, त्यात तुझ्या हातानं ती गाणी लिहून काढ. मी फारसे तिचे कधी ऐकलेच नाही आणि गाणी लिहायची कशाला पाठ आहेत असे मला वाटायचे. पण तिचे म्हणणे असायचे की ही वही तू जेव्हा भविष्यात कधी एकटा असतांना उघडशील आणि त्यातली गाणी तुला एक नॉस्टॅल्जिया देतील. पहिल्यांदा तू ते गाणे कधी ऐकले, तेव्हा तुला कसे वाटले, त्या कवितेबद्दल, संगीताबद्दल, गायकांबद्दल तुला काहीतरी आठवेल आणि ते सगळे तुला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल जिथे तू एकटा जरी असलास तरी कधीही तुला एकाकी वाटणार नाही, ही सगळी महान लोकं, त्यांच्या कलाकृती तुझ्या बरोबर असतील. हेच तुला बळ देतील.
आज आयुष्याच्या मध्यान्हीला मला या सगळ्याचे महत्व पटते आहे आणि हो गेल्या वर्षीपासून मी देखील अशीच एक “साठवणीतल्या गाण्यांची” वही केली आहे. माझी अत्यंत आवडती गाणी, माझ्या मनाच्या जवळची अनेक गाणी मी या वहीत लिहून ठेवली आहेत आणि ती वही चालतांना मला माझी आई जवळ बसून ती गाणी गुणगुणत असल्याचा भास होतो. ह्या गाण्याच्या वहीतून माझी आई माझ्याबरोबर कायम असेल…
धन्यवाद आई.
विश्वेश




