शाळेत असताना आपल्या जवळ एकाच विषयाच्या दोन वह्या असायच्या, हे बहुतेक कुणी अधिकृतपणे सांगितलेलं नसायचं, पण त्या असायच्याच. एक ती, जी शिक्षकांना तपासायला द्यायची. तिच्यावर नाव, इयत्ता, तुकडी, विषय सगळं नीट लिहिलेलं, पहिल्या पानापासून तारीख, धड्याचं नाव, प्रश्नाखाली उत्तर, लाल पेनाने मारलेली खूण दिसली की पुढच्या वेळी चूक टाळायची काळजी. या वहीत अक्षर आपोआप थोडं चांगलं यायचं. मार्जिनच्या बाहेर जाणं टाळायचं. एखादं पान फारच बिघडलं तर ते अलगद फाडून टाकण्याचाही मोह व्हायचा. आणि मग दुसरी एक वही असायची, जिला कोणी तपासणार नाही याची जवळजवळ खात्री असायची. तिचा रंग कदाचित फिका, कव्हर वाकलेलं, पहिल्या पाच पानांनंतर तारीख गायब, मध्ये गणित, पुढे एखादी कविता, त्याखाली मित्राचा फोन नंबर, एका कोपऱ्यात चित्र, दुसऱ्या कोपऱ्यात नावं, काही शब्द पुन्हा पुन्हा लिहिलेले, एखादं पान पूर्ण काळं केलेलं. अक्षर कधी मोठं, कधी लहान, कधी इतकं घाईत की दुसऱ्या दिवशी स्वतःलाच वाचता येऊ नये. त्या वहीत कुणासाठी लिहायचं नसल्यामुळे कदाचित पहिल्यांदाच आपल्या मनासारखं लिहिलं जायचं.
पहिल्या वहीला आपण शिस्त म्हणायचो. दुसऱ्या वहीला रफ वही. नावातच तिचं दुय्यमपण ठरलेलं होतं. चांगलं लिहिलेलं पहिल्या वहीत जायचं आणि गिचमिड दुसऱ्या वहीत. पण आता मागे वळून पाहताना कधी कधी वाटतं, त्या दोघींमध्ये खरंच अधिक खरी वही कोणती होती? शिक्षकांना द्यायच्या वहीत आपण प्रश्न पूर्ण उतरवलेले असायचे, उत्तरं शक्यतो पाठ्यपुस्तकासारखी, अक्षर वाचनीय आणि विचारही अपेक्षित चौकटीत. चुकीच्या उत्तरावर रेघ मारताना आपण ते उत्तर दिसू नये याची काळजी घ्यायचो. रफ वहीत मात्र एखादं उत्तर चुकलं तर त्याच्या शेजारी दुसरं, त्यावर तिसरं, मग त्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह. तिथे चूक लपवण्याची गरज नव्हती, कारण त्या चुकीला पाहणारा कुणीच नव्हता. आणि माणूस कदाचित तेव्हाच स्वतःसारखा लिहितो, जेव्हा कुणी तपासणार नाही याची त्याला खात्री असते.
आयुष्याचंही असंच नाही का? आपल्या जवळ हळूहळू दोन वह्या तयार होत जातात. एक दाखवायची. एक न दाखवायची. पहिल्या वहीत शिक्षण, नोकरी, लग्न, घर, मुलं, वाढदिवस, प्रमोशन, प्रवास, पुरस्कार, फोटो, कौतुक, योग्य वेळी बोललेली योग्य वाक्यं. कुणी “कसं चाललंय?” विचारलं की “छान” म्हणताना जी वही उघडतो ती हीच. तिचं अक्षर शक्यतो चांगलं असतं. काही वर्षांनी त्यात LinkedIn येतं, Instagram येतं, CV येतो, कौटुंबिक समारंभात सांगितली जाणारी मुलांची प्रगती येते, “आमचं सगळं व्यवस्थित आहे” या एका वाक्यात बसणाऱ्या अनेक गोष्टी येतात. कुणाला काय दाखवायचं आणि कुठे थोडं मार्जिन ठेवायचं हे आपल्याला हळूहळू फार उत्तम कळू लागतं.
पण दुसरी वहीही समांतर लिहिली जात असते. तिच्यात ज्या नोकरीच्या promotion बद्दल पहिल्या वहीत अभिमानाने लिहिलं आहे, त्याच रात्री घरी येऊन आपल्याला रिकामं का वाटलं होतं हे लिहिलेलं असतं. पहिल्या वहीत लग्नाच्या वाढदिवसाचा फोटो असतो, दुसरीत त्या वर्षी दोघांनी एकमेकांशी न बोलता घालवलेल्या तीन रात्री असतात. पहिल्या वहीत मुलाच्या परीक्षेचे गुण असतात, दुसरीत त्याच्यावर आपण गरजेपेक्षा जास्त रागावलो होतो याची सल असते. पहिल्या वहीत आईचा वाढदिवस असतो, दुसरीत तिचा फोन पाहून “नंतर करतो” म्हणून ठेवलेली दुपार असते. पहिल्या वहीत वडिलांचा फोटो असतो, दुसरीत त्यांना कधी विचारायचं राहून गेलेलं एखादं वाक्य. एक वही घटनांची नोंद ठेवते. दुसरी कदाचित त्या घटनांनी आत काय केलं त्याची. त्या वहीत एका कोपऱ्यात कुठंतरी कुठल्यातरी प्रवासाची तिकिटं सापडतील.
आणि गंमत अशी की पहिल्या वहीत आपण अक्षर जाणीवपूर्वक सुधारत जातो, तर दुसऱ्या वहीत वय वाढतं तशी गिचमिड वाढत जाते. सुरुवातीला तिथे स्पष्ट शब्द असतात. “राग आला.” “वाईट वाटलं.” “मला ती आवडते.” नंतर भावना थोड्या अवघड होतात. प्रेमात राग मिसळतो, रागात अपराधीपणा, आनंदात भीती, यशात काहीतरी हरवल्यासारखं, दुःखात कधी कधी विचित्र सुटका. त्यांना एक शब्द पुरत नाही. मग अक्षरं एकमेकांवर येतात. वाक्य अर्धवट राहतात. काही पानांवर एवढ्या रेघा असतात की मूळ वाक्य काय होतं हेच समजत नाही. काही गोष्टी तर लिहिल्याच जात नाहीत. फक्त त्या पानावर खूप जागा सोडलेली असते.
कदाचित म्हणूनच आपण तपासली जाणारी वही अधिक जपतो. तिला कव्हर घालतो. दुसरी वही सहज कुठेतरी पडलेली असते. कारण तिच्यात गुण मिळवायचे नसतात. शिक्षकांनी “Good” लिहावं अशी अपेक्षा नसते. तिथे आपल्याला आपली बाजू सिद्ध करायची नसते. आपण चांगले आहोत, यशस्वी आहोत, प्रेमळ आहोत, योग्य निर्णय घेतले आहेत, याचा पुरावा द्यायचा नसतो. तिथे कधी आपण क्षुद्र असतो, कधी मत्सरी, कधी भित्रे, कधी अगदी अनाकलनीय. ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच रागावतो, ज्याला गमावण्याची भीती वाटते त्याच्यापासून दूर जातो, जे हवं आहे ते मिळाल्यावर दुसरंच काही हवंसं वाटतं. तपासणीच्या वहीत अशी उत्तरं चालत नाहीत. रफ वहीत प्रश्नच व्यवस्थित नसतात.
आणि मग कधी तरी हा विचार येतो की खरंच शेवटी काही जमाखर्च असेल तर? चित्रगुप्ताची वही असो की ईश्वराचा एखादा शांत टेबल, नाव काहीही द्या. आयुष्य संपल्यावर कुणीतरी फक्त एवढंच म्हणालं, “वही द्या,” तर आपण कोणती वही पुढे करू?
बहुधा हात आधी पहिल्या वहीकडेच जाईल. ती तयार आहे. तिची पानं क्रमाने आहेत. अक्षर वाचता येतं. चांगल्या गोष्टी अधोरेखित आहेत. चुका शक्यतो खोडलेल्या. आपण कुणाला मदत केली, कष्ट केले, कुटुंबासाठी धडपडलो, काही निर्माण केलं, कुणावर प्रेम केलं, कुणासाठी थांबलो, हे सगळं तिथे आहे. ही वही दाखवताना फारशी लाज वाटणार नाही. उलट थोडी आशा असेल की तपासणारा काही पानांवर खूण करेल, कदाचित “Good” लिहील, एखाद्या चुकीकडे दुर्लक्ष करेल, शेवटी पासिंग मार्क्स तरी देईल.
पण दुसरी वही?
ती द्यायची हिम्मत होईल का?
तिच्यात आपण केलेल्या वाईट गोष्टीच आहेत असं नाही. उलट कदाचित सर्वांत सुंदर गोष्टीही तिथेच आहेत, कारण त्या कुणाला दाखवण्यासाठी केलेल्या नव्हत्या. कुणाच्या नकळत केलेली मदत, फोनवर न बोलता फक्त कुणाचं दुःख ऐकत बसलेली रात्र, कोणालाच कधीच न वाचून दाखवलेल्या अनेक अर्धवट कविता, मुलगा झोपल्यावर त्याच्याकडे पाहताना मनात आलेली भीती, आईच्या आवाजातला थकवा पहिल्यांदा जाणवलेला क्षण, कुणाला न सांगता माफ केलेली व्यक्ती, आपण स्वतः चुकीचे होतो हे अचानक समजलेली दुपार. पहिल्या वहीत पुण्यकर्म म्हणून नोंदवण्याचा प्रश्नच आला नाही अशा अनेक गोष्टी दुसऱ्या वहीच्या कोपऱ्यात सहज पडलेल्या असतील.
त्या वहीत आपली कुरूपताही आहे आणि आपली कोमलताही. दोन्ही कुणी पाहील असा विचार करून लिहिलेली नाहीत.
म्हणून कधी कधी वाटतं, देव असेल आणि त्याला खरंच हिशेब करायचा असेल, तर तो पहिली वही कदाचित उघडणारही नाही. कारण ती वही त्याने आधीच हजारो वेळा पाहिली असेल. प्रत्येक माणूस साधारण तशीच एक वही घेऊन येत असेल, नीट कव्हर घातलेली, महत्त्वाच्या पानांना खूण केलेली, काही परिच्छेद नव्याने लिहिलेले, काही पानं अलगद काढून टाकलेली. “ही माझी चांगली कामं.” “इथे परिस्थिती कठीण होती.” “ही चूक झाली खरी, पण माझा हेतू तसा नव्हता.” देवाच्या दारातही आपण oral examination साठी तयारी करून गेलेलो.
तो कदाचित फक्त विचारेल, “दुसरी कुठे आहे?”
आणि आपण पहिल्यांदा घाबरू.
कारण आयुष्यभर आपल्याला वाटत होतं, ती वही कुणीही तपासणार नाही.
कदाचित आपण म्हणू, “ती रफ आहे. त्यात काही नीट नाही. अक्षरही वाचता येणार नाही.”
आणि समोरचा माणूस, देव, शिक्षक, की फक्त कुणीतरी, कोण असेल तो, शांतपणे म्हणेल, “चालेल.”
तेव्हा बहुधा आपण आयुष्यात पहिल्यांदा अशी वही कुणाच्या हातात देऊ, जिचं एकही पान नीट करण्याची संधी उरलेली नसेल. काही शब्द अर्धे, काही नावं खोडलेली, काही पानं दुमडलेली, कुठे शाई पसरलेली, कुठे वर्षानुवर्षं काहीच लिहिलेलं नाही. त्या वहीत आपण जसे दिसायचो तसे नसू. जसे असायला हवं होतं तसेही नसू. फक्त जसे होतो तसे असू.
आणि मला वाटतं खरी भीती देव किती गुण देईल याची नसेल.
भीती इतकीच असेल की त्या दोन्ही वह्या शेजारी ठेवल्यावर त्या एकाच माणसाने लिहिलेल्या आहेत हे ओळखू येईल की नाही.
किंवा कदाचित त्याहून विचित्र काही घडेल.
तो पहिली वही आपल्या हातात परत देईल.
“ही तुम्ही इतरांसाठी लिहिली होती,” एवढंच म्हणेल.
आणि दुसरी वही स्वतःजवळ ठेवेल.
तिच्यावर कोणतीही खूण करणार नाही.
कारण काही वह्या तपासण्यासाठी नसतात.
त्या फक्त वाचल्या जाण्यासाठी असतात.
-- विश्वेश



तुमची रफ वही पण इतरांच्या/माझ्या फेअर वही पेक्षा छान आहे
मस्त :))