भा. रा. तांबे आणि माझी पहिली भेट झाली ती पाठ्यपुस्तकात असलेल्या त्यांच्या ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ या कवितेतून. खरं सांगायचं तर पहिल्याच भेटीत हा कवी मला फारसा आवडला नव्हता. कविता सुंदर होती, शब्दांची लय होती, पण त्यातला विचार मात्र मला अजिबात पटला नव्हता. माणूस गेल्यानंतर लोक थोडा वेळ हळहळतील आणि पुन्हा आपापल्या कामाला लागतील, हे कसं शक्य आहे? आपल्यावर प्रेम करणारी माणसं आपल्याला इतक्या सहज विसरू शकतात? आपण कुणाच्या आयुष्यात इतकेही महत्त्वाचे नसतो? त्या वयात प्रेम, मैत्री, आपुलकी आणि माणसांमधली नाती यांच्याबद्दल माझ्या काही ठाम कल्पना होत्या. माणसं एकमेकांसाठी किती महत्त्वाची असतात, यावर माझा विश्वास होता. त्यामुळे तांब्यांची ही कविता मला काहीशी निष्ठुर, निराशावादी आणि माणसांच्या प्रेमाची किंमत कमी करणारी वाटली होती. जग पुढे चालत राहील, हे मान्य होतं. पण जिवाभावाची माणसंही पुन्हा हसतील, खिदळतील, आपापल्या संसारात रमतील, ही कल्पना स्वीकारणं मला अवघड जात होतं.
पुढे अनेक वर्षांनी तीच कविता पुन्हा ऐकली, तेव्हा मात्र तिचा अर्थ थोडा वेगळा लागला. मधल्या काळात आयुष्याने बरंच काही शिकवलं होतं. माणसांच्या जगण्यातली अपरिहार्यता, काळाची गती, आपल्या असण्याबद्दलचा आपलाच आग्रह आणि कुणी गेल्यानंतरही जगण्याची सुरू राहणारी धडपड आता थोडी समजू लागली होती. एखाद्या माणसाच्या जाण्याने घरात एक जागा कायमची रिकामी होते, पण त्या घरात दुसऱ्या दिवशी चहा करावाच लागतो. मुलांना शाळेत जावं लागतं, रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कुणाच्या आठवणीने डोळे भरून येत असतानाही माणूस एखाद्या विनोदावर हसतो. याचा अर्थ गेलेली व्यक्ती विसरली असा नसतो. दुःख आपल्या जागी राहतं आणि जगणं त्याच्या शेजारी सुरू राहतं. तांबे बहुधा याच अपरिहार्यतेबद्दल बोलत होते. तरीही त्यांच्या कवितेतल्या सगळ्याच गोष्टी मला आज पूर्णपणे पटतात असं नाही. विशेषतः माणसाच्या जाण्याने त्याच्या आप्तस्वकीयांचं काहीच जात नाही, हे विधान आजही अस्वस्थ करतं. काही माणसांच्या जाण्याने फार काही जातं. फक्त त्याची भरपाई करण्याची सोय नसल्यामुळे उरलेल्यांना जगावं लागतं.
भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७३ रोजी मध्य भारतातील मुगावली येथे झाला. आयुष्याचा बराच काळ त्यांनी मध्य भारतातील संस्थानांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत घालवला. कधी युवराजांचे शिक्षक, कधी दिवाण, तर कधी न्यायाधीश. १९३७ मध्ये ग्वाल्हेर संस्थानाने त्यांना ‘राजकवी’ म्हणून सन्मानित केलं. त्यांच्या आयुष्याची ही बाजू मला विशेष रंजक वाटते. रोजच्या व्यवहारात प्रशासन, न्यायनिवाडा आणि राजदरबारातील जबाबदाऱ्या सांभाळणारा एक माणूस आपल्या आत इतकं नाजूक, संवेदनशील आणि संगीताने भरलेलं जग कसं जपत असेल? त्यांच्या कविता वाचताना हा प्रश्न पडतो. तांबे महाराष्ट्राबाहेर राहिले, पण त्यांच्या कवितांनी मराठी माणसाच्या घरात आणि मनात अगदी सहज जागा मिळवली.
तांब्यांच्या कवितेचं एक वेगळेपण म्हणजे तिची विलक्षण गेयता. अनेक कविता वाचताना त्या आपोआप गुणगुणाव्याशा वाटतात. शब्दांची निवड, त्यांचा नाद, ओळींमधला ठेका आणि भावनेनुसार बदलणारी लय यांचं त्यांना सुंदर भान होतं. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची उत्तम जाण होती आणि त्यांनी काही कविता विशिष्ट राग व छंद डोळ्यांसमोर ठेवून रचल्या होत्या. पुढे वसंत प्रभू आणि हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या संगीतकारांनी या कवितांना स्वर दिले. लता मंगेशकरांच्या आवाजाने त्या महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचल्या. मराठी भावगीतांच्या इतिहासात तांब्यांच्या कवितांना इतकं जवळचं स्थान मिळण्यामागे या संगीताचाही मोठा वाटा आहे.
‘नववधू प्रिया मी बावरते’ ऐकलं की तांब्यांचा एक वेगळाच चेहरा समोर येतो. इथे मृत्यूचं तत्त्वज्ञान नाही, आयुष्याच्या क्षणभंगुरतेची चिंता नाही. आहे ती एका नववधूच्या मनातली ओढ, संकोच, जुनं घर सोडण्याची हुरहूर आणि नव्या आयुष्याची अनामिक भीती. तांबे स्त्रीमनातला हा संकोच किती सहज पकडतात! ‘तिनिसांजा सखे मिळाल्या’मध्ये प्रेमाची आणखी एक छटा दिसते. संध्याकाळच्या शांत, थोड्याशा कातर वातावरणात दिलेलं प्रेमाचं वचन. ‘डोळे हे जुलमी गडे’ किंवा ‘सहज तुझी हालचाल’ यांत मात्र प्रेम अधिक खेळकर होतं. तांब्यांच्या प्रेमकवितांमध्ये मला विशेष आवडतो तो त्यांचा संयम. प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना मोठमोठ्या घोषणा कराव्या लागत नाहीत. एखादी नजर, थोडासा संकोच, सांजवेळ किंवा प्रिय व्यक्तीची साधी हालचालही त्यांना पुरेशी असते. त्यांच्या प्रेमकवितांमध्ये शृंगार आहे, पण त्यात घरगुती जवळीक आणि सहजीवनाचंही भान आहे.
आणि मग अचानक ‘कळा ज्या लागल्या जीवा’सारखी कविता समोर येते. बाहेरून शांत दिसणाऱ्या माणसाच्या आत किती काही सुरू असू शकतं, याची ही जाणीव. आपल्याभोवती माणसं असतात, बोलणं असतं, सहवास असतो, पण मनातलं नेमकं कोणाला सांगावं, हा प्रश्न कधी सुटत नाही. काही वेदना अशा असतात की त्यांचं वर्णन करतानाही त्या कमी होतात की अधिक तीव्र होतात, हे कळत नाही. तांब्यांच्या या कवितेतला एकटेपणा मला फार खरा वाटतो. इथे कुठलाही बनाव नाही, दुःखाचं प्रदर्शन नाही. माणूस स्वतःशी बोलत आहे आणि आपण ते बोलणं ऐकत आहोत, असं वाटत राहतं.
‘मधु मागशि माझ्या सख्या’ ही तर वयाबरोबर बदलत जाणारी कविता आहे. तरुणपणी ऐकताना तिच्यातला मधुरपणा आधी जाणवतो. पुढे तिच्यातला थकवा, संपत चाललेली शक्ती आणि एकेकाळी भरभरून देणाऱ्या माणसाची असहायता समजू लागते. आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला किती गोष्टी हव्या असतात! किती योजना, किती इच्छा, किती स्वप्नं. आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या आणि कुणाला काहीतरी देण्याच्या प्रयत्नात असतो. पण एक दिवस आपल्या क्षमतांनाही मर्यादा आहेत, याची जाणीव होते. पूर्वी ज्या गोष्टी सहज करता येत होत्या, त्या आता जमत नाहीत. पूर्वीसारखं प्रेम करता येत नाही असं नाही, पण ते व्यक्त करण्याची ताकद बदललेली असते. तांब्यांनी या कवितेत वृद्धत्वाची जी कातरता पकडली आहे, ती मनाला चटका लावते. मला या कवितेत एका वृद्ध माणसाबरोबरच थकत चाललेला कलाकारही दिसतो. ज्याने आयुष्यभर रसिकांना भरभरून दिलं, त्याच्याकडून अजूनही तितकंच काहीतरी अपेक्षित आहे, आणि आता मात्र त्याच्याजवळ पूर्वीसारखं देण्याची शक्ती उरलेली नाही.
‘निजल्या तान्ह्यावरी माउली’मध्ये तांबे पुन्हा वेगळे भेटतात. झोपलेल्या बाळाकडे पाहणाऱ्या आईच्या नजरेतलं प्रेम ते इतक्या हळुवारपणे मांडतात की ती कविता वाचताना घरातली शांत दुपार आठवावी. पण त्या कवितेला पुढे आध्यात्मिक अर्थही मिळतो. आईच्या वात्सल्यातून विश्वमातेच्या प्रेमाकडे जाणारी ही कल्पना तांब्यांच्या कवितेची आणखी एक खूण आहे. ‘घन तमीं शुक्र बघ’मध्ये मात्र ते खिन्न मनाला धीर देतात. अंधारातून बाहेर येण्याचं, पुन्हा आकाशाकडे पाहण्याचं आवाहन करतात. ही कविता ऐकताना मला तांब्यांच्या सुरुवातीच्या भेटीची गंमत वाटते. ज्या कवीने मला पहिल्यांदा जगाच्या उदासीनतेची आठवण करून दिली, तोच कवी दुसरीकडे जगण्याची उमेद देत आहे. ‘मावळत्या दिनकरा’मध्ये संध्याकाळची आणि आयुष्याच्या मावळतीची जाणीव आहे, तर ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे’मध्ये संध्याकाळच्या रंगांकडे अगदी निरागसपणे पाहणारी नजर आहे. एकाच कवीच्या मनात इतक्या निरनिराळ्या भावना कशा नांदत असतील!
तांब्यांच्या कविता आणि लता मंगेशकरांचा आवाज यांचं नातंही स्वतंत्रपणे लिहिण्यासारखं आहे. लताबाईंनी आपल्या एका लेखात तांबे हे आपले अत्यंत आवडते कवी असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या कवितांना चाली देण्याआधी हृदयनाथ मंगेशकरांनी योग्य कविता निवडून दिल्याची आठवणही त्यांनी लिहिली आहे. लताबाईंच्या आवाजातली ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ऐकणं आणि ती कविता नुसती वाचणं, हे दोन वेगळे अनुभव आहेत. गाण्यातले विराम, शब्दांवरचा संयम आणि आवाजातली शांतता कवितेला आणखी काही अर्थ देऊन जातात. ‘घन तमीं शुक्र बघ’मधली उभारी असो किंवा ‘कळा ज्या लागल्या जीवा’मधली व्याकुळता, लताबाई प्रत्येक वेळी वेगळ्या वाटतात. तांब्यांच्या ‘मधु मागशि माझ्या सख्या’ला पं. कुमार गंधर्वांनी दिलेला स्वराविष्कारही तितकाच वेगळा अनुभव आहे. एका कवितेची दोन माणसं दोन प्रकारे अनुभूती देऊ शकतात, हे अशा वेळी कळतं.
तांब्यांच्या कवितांचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं. त्या वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या प्रकारे भेटतात. ‘नववधू प्रिया मी बावरते’मधलं बावरलेपण एका वयात अधिक जवळचं वाटतं. ‘तिनिसांजा सखे मिळाल्या’मधलं प्रेमाचं वचन दुसऱ्या वयात वेगळा अर्थ देतं. ‘मधु मागशि माझ्या सख्या’ किंवा ‘मावळत्या दिनकरा’मधली संध्याकाळ समजायला आयुष्याची थोडी वाट चालावी लागते. आणि ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ समजण्यासाठी कदाचित स्वतःच्या असण्याबद्दलच्या काही कल्पना बदलाव्या लागतात. कवितेतील शब्द तेच राहतात, पण आपण बदलत असतो. त्यामुळे पूर्वी साधी वाटलेली एखादी ओळ अचानक अस्वस्थ करू लागते, तर पूर्वी अजिबात न पटलेला विचार काही प्रमाणात समजू लागतो.
आज २७ ऑक्टोबर. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या जन्माला १५३ वर्षं झाली. त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता आजही गाण्यांच्या रूपाने आपल्या आसपास आहेत. कित्येकांना त्या कवितांचे शब्द तोंडपाठ असतील, पण कवीचं नाव माहीत नसेल. एखाद्या जुन्या रेडिओवर, सकाळच्या शांत वेळेत किंवा संध्याकाळी अचानक यांपैकी एखादं गाणं कानावर पडतं. गाणं ओळखीचं असतं, पण त्यातला एखादा शब्द त्या दिवशी नव्याने ऐकू येतो. मला वाटतं, तांब्यांच्या कवितांकडे पुन्हा पुन्हा परत जाण्याचं हे एक कारण आहे.
‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ या कवितेबद्दल मात्र माझ्या मनातली ती पहिली असहमती अजून थोडी शिल्लक आहे. माणसाच्या जाण्याने सगळं काही पूर्ववत होतं, हे मला अजूनही पूर्णपणे मान्य नाही. काही माणसं गेल्यानंतर जग पूर्वीसारखं राहत नाही. निदान काही माणसांसाठी तरी. पण आपल्या अनुपस्थितीतही सूर्य उगवत राहणार, माणसं हसणार, संसार चालणार, हेही आता नाकारता येत नाही. या दोन गोष्टी एकाच वेळी खऱ्या असू शकतात, हे त्या वयात मला माहीत नव्हतं.
तांब्यांशी माझी पहिली भेट एका मतभेदातून झाली होती. त्यानंतर त्यांच्या कितीतरी कविता वाचल्या, आवडल्या, कितीतरी गाणी मनात घर करून राहिली. पण आजही त्यांची आठवण झाली की सर्वप्रथम तीच कविता आठवते. तेव्हा न पटलेली.
आता मात्र ते गाणे लागले की पूर्ण ऐकल्याशिवाय राहवत नाही.
— विश्वेश


mast