कनुप्रिया
काही वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री अरुणा ढेरे याचे “कृष्णकिनारा” पुस्तक वाचले. या पुस्तकाने मला जिंकलं ते अगदी प्रस्तावनेतच. अरुणा ढेरे प्रस्तावनेत लिहितात... “हे परंपरेचं जग मोठं अद्भुत आहे! कधी तत्वज्ञानाच्या अतिसुंदर चांदण्यानं झगमगतांना, तर कधी मनाविषयीच्या खोल समजुतीच्या निळाईनं वेढलेलं असताना, तर कधी उदात्ताच्या, सर्वकल्याणाच्या उन्हात प्रसन्न हसताना, तर कधी सुख दु:खाच्या विविध रंगांनी बहरुन येताना ते जग पाहिल की, खरोखर आपण स्तिनित होतो. पण पृष्ठभागावरच्या नवलाईखाली तळघरही आहेत अंधाराची, आणि त्यातलं एक मला थोडसं दिसलं. पुष्कळ बायका तिथे मरुन पडलेल्या मी पहिल्या, कुणाच्या गळ्याला देवत्वाचं नख लागलेलं, तर कुणी पातिव्रत्याचं विष प्यालेलं. कुणी निरागसतेचाच कलंक लागून मेलेली. तर कुणी समाज पुरुषाच्या कठोर मिठीत घुसमटून गेलेली. काही झगडल्या होत्या,तर काही ताठ मानेनं जगल्या होत्या. काही अबोल सोसणा-या होत्या. मी एकदाच ते विलक्षण दृष्य पाहिलं, पण आजवर ते विसरु शकले नाही. त्या तळघराच्या अंधारातून येणारा मृत्यूचा वास वेळी अवेळी मला अस्वस्थ करुन टाकतोच आहे. डोळे मिटले की त्या असंख्या बायकांपैकी कुणी ना कुणी मला दिसतेच आहे. कुणी देवळात देवी होऊन बसलेली. कुणी नाटक सिनेमातलं एखादं पात्र म्हणुन आलेली.....या अनुभवातून बाहेर यायचं कसं? एक उपाय म्हणून लिहावसं वाटलं. त्या लिहिण्याची ही अगदी लहानशी सुरुवात आहे. फक्त तिनच तुकडॆ...”
तर या पुस्तकाने भारावून तर गेलोच होतो. आता हे अजून किती लोकांपर्यंत आणि कसे पोचवता येईल, याचा विचार चालू होता आणि म्हणून त्याचे नाट्य रूपांतर करायचे ठरवले.
त्यावेळी त्याची संहिता लिहिण्यासाठी मी मदत करत होतो आणि तेव्हा मी पहिल्यांदा धर्मवीर भारतींचे “कनुप्रिया” वाचले. त्यात राधेच्या दृष्टीकोनातून लिहिलेली एक कविता मला फारच भावली आणि ती आमच्या संहितेतल्या प्रसंगाला अगदी समर्पक होती.
प्रसंग असा होता की कौरव पांडवांचे युद्ध वगैरे सगळे संपलेले आहे, सगळे उलटून काही वर्ष झाली आहेत आणि एक दिवस आचानक म्हातारी राधा द्वारकेत कृष्ण महालात येउन पोहचते आणि कृष्ण तिला सागर किनारी असलेल्या मंदिरात भेटण्याचे वचन देतो. राधा जेव्हा अनेक वर्षानंतर कृष्णाला पुन्हा भेटते तेव्हा तिच्या मनात बरंच काही साचलेलं तिला बोलायचं असतं. कृष्णाला जाब विचारायचा असतो, की का सोडून गेलास मला? ती तसे मनातल्या मनात त्याला विचारातही ... आणि कृष्ण तिला नेहमी प्रमाणे कर्म, धर्माच्या गोष्टी सांगू लागतो. शेवटी राधा त्याला थांबवते आणि म्हणते:
हि सार्थकता तू
मला कशी समजावणार ...
कान्हा ...
शब्द शब्द शब्द
माझ्या करता सगळे अर्थहीन असते,
जर ते माझ्या समीप बसून
माझ्या निर्जीव कुंतलात हात गुंफून
तुझ्या कापऱ्या ओठांतून आले नसते ...
शब्द शब्द शब्द
कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व ....
मी देखील घरो घरी ऐकले आहेत हे शब्द
अर्जुनास यात काहीही सापडो ...
मला बापडीला यात काही सापडत नाही प्रिया ...
मी फ़क़्त त्यांच्या मार्गात अडखळून
तुझ्या ओठांची कल्पना करत राहते,
ज्यातून तू पहिल्यांदा उच्चारले असशील हे शब्द ...
तुझे ते सावळे मनोहर रूप
किंचित वळलेली शंखाकृती मान
माझ्या दिशेने उठलेल्या चंदन-बाहू
ती आपल्यातच मग्न अशी दृष्टी
अन हळू हळू हलणारे ते ओठ ...
मी कल्पना करते कि
अर्जुनाच्या जागी मी आहे
आणि माझ्या मनात मोह निर्माण झाला आहे
मला माहिती नाही कि हे कोणते युद्ध आहे
मी कोणाच्या बाजूने आहे
नेमका पेच काय आहे
आणि युद्धाचे कारण काय आहे
पण माझ्या मनात मोह निर्माण झाला आहे
कारण तुझ्याकडून समजावून घेणे
मला फार आवडते
आणि सैन्य स्तब्ध उभे आहे
इतिहास स्थगित झाला आहे
आणि तू मला समजावत आहेस ...
कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व ....
शब्द शब्द शब्द
माझ्या करता नितांत अर्थहीन आहेत हे -
मी ह्या सगळ्याच्या पलीकडे तुला पाहते आहे
तुझ्या प्रत्येक शब्दाला
चातकासारखी पीत आहे
आणि तुझे असाधारण तेज
माझ्या शरीरातील रोमा रोमास
सचेतन करीत आहे
आणि तुझ्या ह्या जादूभर्या ओठांतून
रातराणीच्या फुलासामान टप-टप शब्द झरत आहेत
एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक ....
कर्म, स्वधर्म, निर्णय, दायित्व ....
आणि माझ्यापर्यंत येता-येता सगळे बदलून जात आहेत
मला ऐकु येते ते फक्त ...
राधे राधे राधे ...
शब्द शब्द शब्द
तुझे शब्द अगणित आहेत कान्हा - अमाप
पण त्यांचा अर्थ एकाच आहे -
मी
मी
फ़क़्त मी
मग आता त्या शब्दांनी
मलाच
इतिहास कसा समजावणार कान्हा ?
- शब्द - अर्थहीन
धर्मवीर भारती (स्वैर अनुवाद - विश्वेश)
याच संग्रहातील अजून एक कविता जी थेट काळजाला हात घालते. कृष्ण राधेला सोडून पांडवांना मदत करायला गेला आहे, आणि मागे राधा स्वतःला विचारते की मी कोण आहे? मी कोण होते कान्हा साठी?
सेतु : मी (अनुवाद)
===========
खोल घाटांतून ...
उंच शिखरांकडे
ज्याला जायचे होते तो तर गेला -
हाय माझ्या शिरी पाय रोवून
माझ्याच बहुपाशातून ...
इतिहास तुला घेऊन गेला
ऐक कान्हा, ऐक
का मी फ़क़्त एक सेतू होते तुझ्यासाठी
लीलाभूमी आणि युद्धभूमी मधील
दुस्तर काळ जोडण्यापुरती!
आता या सुन्या शिखारांत, मृत्यू-घाटात
सोन्याच्या पातळ तारांनी गुंफलेल्या पुलासारखे
निर्जन
निरर्थक
कंपणारे, विसरलेले, उरलेले माझे हे सेतू-शरीर
ज्याला जायचे होते तो तर गेला
- धर्मवीर भारती (स्वैर अनुवाद - विश्वेश)
तुम्ही “कानुप्रिया” नक्की वाचा. पुढेमागे आयुष्यात पुन्हा कधी योग आलाच तर हे नाटक मी पुन्हा उभं करेन आणि रंगमंचावर घेऊन येईन.
- विश्वेश


