एखादी कविता वाचायला घेतली आणि पहिल्या वाचनात ती समजली नाही, तर काय करायचं? पुन्हा वाचायची? त्यातल्या एखाद्या शब्दाजवळ थांबायचं? की काहीच अर्थ लागत नाही म्हणून पुढे जायचं? कादंबरीत दोन पानं काही विशेष घडलं नाही, तर आपण अस्वस्थ होतो. चित्रपटात कॅमेरा एखाद्या चेहऱ्यावर बराच वेळ थांबला की तो प्रसंग संथ वाटू लागतो. इतक्या गोष्टी लवकर समजून घेण्याची सवय झालेल्या आपल्याला, कलेने मात्र आपल्या वेगानेच पुढे सरकावं असं वाटत असतं.
अलीकडे A Life of Reading या चॅनेलवरचा Gabriela de Mendonça Gomes यांचा एक व्हिडिओ पाहिला. त्यात पुस्तकातले मोठे वर्णनात्मक परिच्छेद वगळून फक्त संवाद वाचणाऱ्यांचा उल्लेख होता. तो व्हिडिओ पाहून साहित्य म्हणजे काय, हा प्रश्न जितका पडला नाही, तितका आपण वाचताना इतकी घाई कशाची करतो, हा पडला. खरं तर ही घाई पुस्तकांपुरती राहिलेली नाही.
दिवसभर आपण असंख्य गोष्टी वाचत असतो. बातम्या, ईमेल, मेसेजेस, सोशल मीडियावरचे मजकूर, कामाचे रिपोर्ट्स. त्यातलं बरंच वाचन आवश्यक असतं आणि ते शक्य तितक्या लवकर करणंही योग्य असतं. मुद्दा तिथे नाही. पण प्रत्येक मजकुराकडे त्याच सवयीने पाहायला लागलो की अडचण होते. मोठा परिच्छेद आला की डोळे त्यावरून घसरतात, अपरिचित शब्द आल्यावर अर्थ शोधण्याऐवजी पुढचा परिच्छेद गाठला जातो, आणि कविता लगेच उलगडली नाही की ती दुर्बोध ठरते. आपण शब्दांवरून पुढे गेलो, म्हणजे त्या शब्दांतून गेलो असं होत नाही.
आज वाचनाभोवतीही कार्यक्षमतेची एक भाषा तयार झाली आहे. महिन्याला किती पुस्तकं, वर्षभरात किती, किती दिवसांत कादंबरी संपवली, किती मिनिटांत पुस्तकाचा सारांश समजला. पुस्तकं मोजण्यात काही गैर नाही, त्यामुळे सवय लावायलाही मदत होऊ शकते. पण वाचनाचा हिशेब केवळ पूर्ण केलेल्या पुस्तकांत मांडला की एखाद्या पानावर दहा मिनिटं थांबलेला माणूस मागे पडल्यासारखा दिसतो. त्याने विचारात घालवलेल्या त्या दहा मिनिटांना कोणतीही खूण नसते.
मला वाटतं, आपल्या वाचनाच्या सवयीत हरवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेंगाळण्याची तयारी. एखाद्या वाक्याचा अर्थ कळूनही ते पुन्हा वाचावंसं वाटणं, एखाद्या कथेतल्या पात्राशी सहमत नसतानाही त्याचं बोलणं शेवटपर्यंत ऐकणं, कवितेच्या दोन ओळींमधल्या जागेत थोडा वेळ राहणं. जी. ए. कुलकर्णींची कथा वाचून अनेकदा नेमकं काय घडलं हे सांगता येईल, पण ती कथा आपल्याला काय करून गेली हे लगेच सांगता येणार नाही. ग्रेस किंवा आरती प्रभूंच्या कवितेला सरळ अर्थ लावून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला, तर तिच्यातलं बरंच काही निसटेल. प्रत्येक अस्पष्टता ही लेखकाची चूक असतेच असं नाही. आणि अर्थातच प्रत्येक अस्पष्टता म्हणजे मोठं साहित्यही नसतं.
मागच्या पिढ्यांच्या वाचनसंस्कृतीतून याबाबत काही शिकण्यासारखं आहे. मराठी घरांमध्ये मासिकं, वाचनालयातून आणलेली पुस्तकं, वेगवेगळे दिवाळी अंक यांना जागा होती. मौज, सत्यकथा, ललित यांसारख्या नियतकालिकांच्या पानांत कथा, कविता, समीक्षा, ललित लेख, वैचारिक लेखन एकत्र भेटायचं. कादंबरी वाचणाऱ्या माणसाच्या हातात विंदा करंदीकरांची कविता पडू शकायची. त्यानंतर दुर्गा भागवतांचा लेख किंवा विजय तेंडुलकरांचं लेखन समोर येऊ शकायचं. सगळंच आवडलं पाहिजे असा आग्रह नव्हता. पण एखादी गोष्ट आपल्याला आवडेल की नाही, हे ठरायच्या आधीच ती आपल्या वाचनात आलेली असायची.
इथे एक फरक महत्त्वाचा आहे. आज आपण पुस्तक निवडताना त्याचा सारांश, रेटिंग, रिव्ह्यू, त्याबद्दलचे Short Video (Shorts/reels) पाहतो. त्यामुळे चुकीची निवड होण्याची शक्यता कमी होईलही. पण काहीतरी अनपेक्षित हातात पडण्याची शक्यताही कमी होते. आपल्याला आधीपासून आवडणाऱ्या प्रकारातली, आपल्याशी जुळणारी पुस्तकं शोधणं सोपं झालं आहे. अपरिचित लेखक किंवा आपल्या मतांना न पटणारी भूमिका असलेलं लेखन निवडण्यासाठी आता कदाचित थोडा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. पूर्वीचा वाचक नेहमीच अधिक उत्सुक होता, असं नाही. आज उपलब्ध असलेल्या निवडींच्या गर्दीत उत्सुकता टिकवणं मात्र वेगळंच काम झालं आहे.
जुन्या काळाचं उदात्तीकरण करण्यातही अर्थ नाही. तेव्हाही करमणुकीसाठी पुस्तकं वाचली जात होती, रहस्यकथा गाजत होत्या, वरवर वाचणारे लोक होते. शिवाय पुस्तकं मिळणं, शिक्षण घेणं, वाचनासाठी स्वतंत्र वेळ असणं या गोष्टी सर्वांना सारख्या उपलब्ध नव्हत्या. जात, वर्ग आणि लिंग यांमुळे कित्येक जण या तथाकथित समृद्ध वाचनसंस्कृतीबाहेरच होते. दया पवारांचं बलुतं आणि लक्ष्मण मानेंचं उपरा यांसारखी पुस्तकं वाचताना हे लक्षात येतं. म्हणून जुन्या पिढीकडे पाहताना त्यांच्या पुस्तकांची निवड आदर्श मानण्यापेक्षा, पुस्तकासाठी वेळ काढण्याची आणि अपरिचित लेखनाशी थोडं झगडण्याची जी सवय काही वाचकांनी जपली होती, तिच्याकडे पाहावंसं वाटतं.
चित्रपट पाहतानाही असाच अनुभव येतो. एखाद्या चित्रपटाचं कथानक दोन मिनिटांत सांगता येतं, आणि अनेकदा चित्रपट पाहायच्या आधीच ते आपल्याला माहिती असतं. मग उरलेल्या दोन तासांत दिग्दर्शक नेमकं काय करतो? Only Yesterday मधल्या तायकोच्या आठवणी वेगाने सांगून संपवता आल्या असत्या. पण त्या ज्या संथपणे, एखाद्या लहान तपशिलावर थांबत उलगडतात, त्यात त्या चित्रपटाचं बरंच काही आहे. Maborosi मध्ये अनेक चौकटी बराच वेळ शांत राहतात. एखादं पात्र काही बोलत नाही म्हणून त्या वेळात काही घडत नाही, असं नसतं. आपण मात्र पुढे काय घडणार याची वाट पाहत राहिलो, तर त्या शांततेत दिग्दर्शकाने काय ठेवलेलं आहे ते दिसणारच नाही.
पुस्तकातले वर्णनात्मक परिच्छेद वगळून फक्त संवाद वाचणं म्हणजे चित्रपटातले फक्त संवाद ऐकून बाकीच्या फ्रेम्स पुढे ढकलण्यासारखं आहे. गोष्ट कदाचित समजेलही. पण खिडकीतून येणारा प्रकाश, दोन माणसांमधलं अंतर, न बोलता गेलेली काही सेकंदं, यातून गोष्ट ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचते, ती पद्धतच नाहीशी होईल. साहित्याच्या बाबतीत भाषेचंही असंच आहे. शब्द केवळ माहिती वाहून नेत नाहीत. त्यांचा क्रम, लय, विराम, कधीकधी त्यांचं न उच्चारलं जाणं, यांतही लेखकाचं काम असतं.
इथे मुद्दा संथ कलाकृती नेहमी श्रेष्ठ असतात, असा अजिबात नाही. उत्तम विनोदी लेखन झपाट्याने वाचता येतं, एखादी चांगली रहस्यकथा आपल्याला सलग पुढे नेत राहते, चित्रपटाचा वेगही त्याच्या परिणामाचा भाग असू शकतो. प्रश्न आहे तो आपण प्रत्येक गोष्टीवर आपलाच वेग लादतो का, हा. एखादी कलाकृती आपल्याला क्षणभर थांबायला सांगत असेल, तर तितका वेळ आपण तिला देऊ शकतो का? की प्रत्येक विरामाला आपण वेळेचा अपव्यय समजतो?
ही सवय बदलण्यासाठी फोन बंद करून पूर्वीसारखंच जगायला हवं असंही नाही. त्याच फोनवर जगातल्या असंख्य पुस्तकांपर्यंत, कवितांपर्यंत आणि चित्रपटांपर्यंत पोहोचता येतं, जे पूर्वी अनेकांना शक्य नव्हतं. लक्ष विचलित होण्याला स्क्रीनचा काही वाटा असेल, पण त्याला एकट्याला दोष देऊन भागणार नाही. आपल्याला स्वतःच्या अधीरतेचीही ओळख करून घ्यावी लागेल. एखादा कठीण उतारा सोडून देण्यापूर्वी पुन्हा वाचणं, आवडत नसलेल्या कवितेजवळ आणखी थोडा वेळ थांबणं, चित्रपटात शांतता आली की लगेच फोन न उचलणं, हे छोटे प्रयत्न आहेत. त्यातून काही महान अनुभव मिळेलच याची खात्री नाही.
आपण वेगाला इतकं सरावलो आहोत की कशाचाही तात्काळ अर्थ न लागणं आपल्याला अपयश वाटू लागलं आहे. पण प्रत्येक कलाकृती हा सोडवायचा प्रश्न नसतो. कधीकधी वाचून किंवा पाहून झाल्यावरही काही प्रश्न अनुत्तरित राहतात. काही तपशील नंतर आठवतात. दुसऱ्यांदा वाचताना आधी न दिसलेलं वाक्य अचानक दिसतं. यासाठी वेळ लागतो, आणि त्या वेळेचा काही भाग वरकरणी अगदी निष्क्रिय वाटू शकतो.
कलेला तिचा स्वतःचा वेग असतो. तो प्रत्येक वेळी आपल्या सोयीचा असेलच असं नाही. एखादं पुस्तक संपवण्यासाठी आपण घड्याळ पाहू शकतो, पण ते पुस्तक आपल्या आत किती वेळ राहील याचा हिशेब करता येत नाही. म्हणून कधीतरी पुढचं पान उलटण्याआधी थोडं थांबायला हरकत नाही. कदाचित ज्या गोष्टीसाठी आपण पुढे धावत आहोत, ती त्याच पानावर असेल.
— विश्वेश

