उन्हाळ्याच्या दिवसांत महाराष्ट्रातल्या एखाद्या रस्त्यावरून जाताना आपल्याला नीरेचं दुकान हमखास दिसतं. बाहेर ताडाच्या झाडाचं चित्र, बाजूला मातीचं मडकं, कधीकधी बर्फात ठेवलेली पांढरट, गोडसर नीरा. सकाळी काढलेली नीरा ताजी असते. दिवस चढू लागला की तिच्यात बदल होऊ लागतात. आंबण्याची प्रक्रिया सुरू होते, चव बदलते आणि काही वेळाने ती सकाळची नीरा उरत नाही. आपल्या आसपासच्या कितीतरी पदार्थांसारखीच नीराही आहे. तिचं असणं इतकं परिचयाचं की तिच्याविषयी विशेष कुतूहल वाटावं असं काही कारण आपल्याला दिसत नाही. झाडातून रस काढायचा, प्यायचा, त्यापासून गूळ बनवायचा. कित्येक पिढ्यांपासून चालत आलेल्या या व्यवहारात विज्ञानाला विचारण्यासारखा एखादा प्रश्न दडलेला असेल, असं कुणाला सहजासहजी वाटणार नाही. पण विसाव्या शतकाच्या मध्यावर मुंबईतल्या एका प्रयोगशाळेत या साध्याशा रसाने एका स्त्रीचं लक्ष वेधून घेतलं. तिचं नाव होतं कमला सोहनी. त्या वेळी ती एक प्रस्थापित संशोधक होती. केंब्रिजमधून doctorate मिळवून भारतात परतलेली, वनस्पतींच्या पेशींमधल्या श्वसनक्रियेवर संशोधन केलेली आणि भारतीय आहारातील पोषकतत्त्वांचा अभ्यास करणारी वैज्ञानिक. तिच्यासमोर असलेल्या नीरेच्या नमुन्यात तिला एक विलक्षण गोष्ट दिसली. त्यात Vitamin C होतं आणि ते अपेक्षेपेक्षा अधिक काळ टिकून राहत होतं.
Vitamin C हे तसं नाजूक रसायन. हवा, उष्णता आणि अन्नावर होणाऱ्या प्रक्रियांमुळे त्याचं oxidation होऊ शकतं. त्यामुळे एखाद्या पदार्थात Vitamin C किती आहे याइतकंच ते किती काळ टिकतं, हा प्रश्नही पोषणशास्त्रात महत्त्वाचा असतो. नीरेमध्ये मात्र काही वेगळंच घडत होतं. शरीराच्या तापमानाच्या आसपास, म्हणजे ३७ अंश सेल्सिअसवर, बराच काळ ठेवल्यानंतरही त्यातल्या Vitamin C चं लक्षणीय प्रमाण टिकून असल्याचं प्रयोगांत दिसलं. नीरा स्वतः आंबू शकते, तिच्यात अनेक बदल होऊ शकतात, तरीही तिच्यातलं हे विशिष्ट जीवनसत्त्व टिकवून ठेवणारी काही रासायनिक व्यवस्था असावी, असा प्रश्न कमलांना पडला. कमला आणि त्यांचे सहकारी एम. एन. गुट्टीकर यांनी त्या प्रश्नाचा पाठपुरावा केला. निरेमध्ये sulfhydryl compounds आणि dehydroascorbic acid reductase हा enzyme असल्याचं त्यांच्या संशोधनातून दिसलं. Vitamin C चं oxidation झाल्यानंतर तयार होणाऱ्या स्वरूपाचं पुन्हा सक्रिय स्वरूपात रूपांतर करण्यास ही यंत्रणा मदत करत होती. १९५३ मध्ये या कामावर त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. एका साध्या रसातलं Vitamin C का टिकतं, या प्रश्नाचं उत्तर आता रसायनशास्त्राच्या भाषेत देता येत होतं. पण कमलांच्या दृष्टीने या उत्तराला आणखी एक बाजू होती. नीरा स्वस्त होती, स्थानिक होती आणि भारतात अनेक ठिकाणी उपलब्ध होती. मग तिचा उपयोग पोषणाच्या कमतरता भरून काढण्यासाठी करता येईल का? निरेचा आणि ताडगुळाचा गरीब कुटुंबांच्या आहारात उपयोग होऊ शकेल का? या प्रश्नातून पुढचं संशोधन सुरू झालं. त्यांच्या या कामाला पुढे राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.
नीरेच्या या गोष्टीत मला सर्वांत आधी जाणवते ती कमलांची नजर. एखाद्या साध्या पदार्थात काहीतरी अनपेक्षित घडतं आहे हे पाहण्याची, त्याचं कारण शोधण्याची आणि मग त्या शोधाचा माणसाच्या जगण्याशी काही संबंध जोडता येतो का हे तपासण्याची नजर. पण ही नजर घडण्याची गोष्ट नीरेच्या प्रयोगशाळेत सुरू होत नाही. तिची सुरुवात जवळजवळ वीस वर्षं आधी, १९३३ सालच्या बंगळुरूमध्ये होते. त्या वेळी कमला सोहनी या कमला भागवत होत्या. बावीस वर्षांच्या. मुंबई विद्यापीठातून Physics आणि Chemistry घेऊन पदवी मिळवलेली, उत्तम गुण मिळवलेली एक तरुण मुलगी. घरात विज्ञानाची परंपरा होती. वडील नारायणराव भागवत आणि काका माधवराव भागवत यांनी रसायनशास्त्राचं शिक्षण घेतलेलं होतं. त्यामुळे कमलांसाठी विज्ञान हा काही अनोळखी प्रदेश नव्हता. त्यांना संशोधन करायचं होतं आणि त्या काळात भारतात संशोधनासाठी उत्तम ठिकाणांपैकी एक होतं बंगळुरूचं Indian Institute of Science. कमलांनी तिथे प्रवेश मागितला. त्या संस्थेचे संचालक होते सी. व्ही. रामन. तीन वर्षांपूर्वीच भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळवलेले रामन. भारतीय विज्ञानाला जगाच्या नकाशावर स्वतंत्र स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या नावांपैकी एक. कमलांना मात्र त्यांनी प्रवेश नाकारला. त्यांचे गुण अपुरे होते म्हणून नाही, संशोधनाची तयारी नव्हती म्हणून नाही, तर त्या स्त्री होत्या म्हणून.
या प्रसंगाकडे आज पाहताना एक विचित्र विसंगती दिसते. प्रकाशाच्या वर्तनातले सूक्ष्म बदल ओळखणाऱ्या माणसाला समोरच्या विद्यार्थिनीची क्षमता तिच्या स्त्री असण्या पलीकडे जाऊन पाहता आली नाही. विज्ञानात पुराव्याला इतकं महत्त्व देणाऱ्या माणसाने तिच्या गुणवत्तेपेक्षा स्वतःच्या पूर्वग्रहाला अधिक महत्त्व दिलं. कमलांनी हा नकार स्वीकारला नाही. त्यांनी रामनांच्या निर्णयाविरुद्ध आग्रह धरला, सत्याग्रह केला आणि अखेर त्यांना प्रवेश मिळाला. पण तोही सरळ नव्हता. एक वर्ष probation, कामावर विशेष देखरेख आणि पुरुष संशोधकांच्या कामात त्यांच्या उपस्थितीमुळे अडथळा निर्माण होता कामा नये, अशा अटी होत्या. त्या काळात एखाद्या तरुण मुलीला या अटी मान्य करणं किती अपमानास्पद वाटलं असेल याची कल्पना करता येते. पण त्याहून अस्वस्थ करणारी गोष्ट वेगळी आहे. पुरुष विद्यार्थ्याला प्रयोगशाळेत प्रवेश मिळाल्यावर त्याच्या संशोधनक्षमतेची परीक्षा होत होती. कमलांना मात्र संशोधन करण्याआधी प्रयोगशाळेत असण्याचा अधिकार सिद्ध करावा लागला. त्यांची पात्रता त्यांच्या गुणपत्रिकेत होती, पण ती स्वीकारण्याची तयारी संस्थेकडे नव्हती. ज्या ठिकाणी त्यांना विज्ञान शिकायचं होतं, त्याच ठिकाणी त्यांना प्रथम स्वतःच्या अस्तित्वाचं समर्थन करावं लागलं.
कमलांनी त्या अटी मान्य केल्या आणि काम सुरू केलं. एम. श्रीनिवासय्या यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय आहारातल्या डाळी आणि कडधान्यांचा अभ्यास केला. तूर, मूग, उडीद, दूध, त्यांच्यातील proteins आणि nitrogen compounds. पुढच्या काही वर्षांत त्यांच्या संशोधनावर अनेक papers प्रसिद्ध झाले. मला त्यांच्या या सुरुवातीच्या संशोधनातही पुढच्या नीरेच्या गोष्टीची चाहूल लागते. भारतातल्या लाखो लोकांच्या रोजच्या जेवणात असलेल्या पदार्थांकडे त्या रसायनशास्त्राच्या नजरेने पाहत होत्या. डाळीत किती protein आहे, त्यात इतर कोणते nitrogen compounds आहेत, अन्नातून शरीराला नेमकं काय मिळतं, हे प्रश्न त्यांना महत्त्वाचे वाटत होते. आपल्या विज्ञानाच्या इतिहासात आपण अनेकदा मोठ्या शोधांची, मोठ्या यंत्रांची, अणूंची आणि अवकाशाची चर्चा करतो. पण रोजच्या जेवणातल्या डाळीचं रसायनशास्त्र समजून घेणंही तितकंच गंभीर वैज्ञानिक काम असू शकतं. कमलांनी ते केलं. आणि याच काळात त्यांनी आणखी एक गोष्ट केली जी त्यांच्या स्वभावाविषयी बरंच काही सांगते. १९३६ मध्ये त्यांनी इतर दोन विद्यार्थिनींसोबत संस्थेला पत्र लिहिलं. मुलींसाठी राहण्याची चांगली व्यवस्था करा, त्याची माहिती पालकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे आणखी मुलींना संशोधनासाठी येता येईल. तीन वर्षांपूर्वी स्वतःसाठी प्रवेश मागणारी कमला आता पुढच्या मुलींसाठी जागा मागत होती. स्वतःचा प्रश्न सुटला म्हणून तो प्रश्न संपला, असं त्यांना वाटलं नाही.
बंगळुरूनंतर कमला केंब्रिजला गेल्या. तिथे त्यांनी Derek Richter आणि पुढे Robin Hill यांच्यासोबत संशोधन केलं. वनस्पतींच्या पेशींमधल्या respiration मध्ये cytochrome system ची भूमिका काय असते, उच्च वनस्पतींमध्येही ही रासायनिक यंत्रणा आढळते का, अशा प्रश्नांवर त्यांनी काम केलं. १९३९ मध्ये *Nature* मध्ये त्यांचा आणि Robin Hill यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्याच संशोधनावर त्यांना केंब्रिजमधून doctorate मिळाली. भारतातल्या पहिल्या स्त्री वैज्ञानिकांपैकी एक म्हणून त्यांचं नाव आज घेतलं जातं. अनेक चरित्रांमध्ये त्यांचा उल्लेख विज्ञानात PhD मिळवणारी पहिली भारतीय स्त्री असा केला जातो. अशा पहिल्या स्त्रियांची चरित्रं वाचताना आपल्याला त्यांचं यश पटकन दिसतं, पण त्या पहिल्या का होत्या हा प्रश्न अनेकदा मागे राहतो. त्यांच्या आधी त्या संस्थांमध्ये, त्या प्रयोगशाळांमध्ये, त्या विद्यापीठांमध्ये आणखी स्त्रिया का पोहोचू शकल्या नव्हत्या? कमलांच्या बाबतीत याचं एक उत्तर आपल्याला रामनांच्या नकारात सापडतं. पण त्यांच्या आयुष्याला केवळ त्या नकाराच्या चौकटीत ठेवणंही चुकीचं ठरेल. कारण केंब्रिजमध्ये PhD मिळवल्यानंतर त्यांचं संशोधन संपलं नाही. त्या भारतात परतल्या आणि भारतीयांच्या आहाराशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करू लागल्या. पुढे मुंबईच्या Royal Institute of Science मध्ये त्यांनी अध्यापन आणि संशोधन केलं. Biochemistry विभागाचं नेतृत्व केलं आणि नंतर संस्थेच्या संचालकही झाल्या.
भारतात परतल्यानंतर त्यांच्या संशोधनात डाळी, भाज्या, मासे, Vitamin B1, Vitamin C, enzymes, proteins आणि अन्नप्रक्रियेदरम्यान होणारे बदल असे विषय येत राहिले. याच काळात नीरेवरचं संशोधन झालं. केंब्रिजमध्ये वनस्पतींच्या पेशींमधील श्वसनक्रिया अभ्यासणाऱ्या कमला आता भारतीय आहारातील पोषकतत्त्वांच्या रसायनशास्त्राचा शोध घेत होत्या. वरवर पाहता या दोन संशोधनविषयांत मोठं अंतर दिसतं. पण पेशींमध्ये घडणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आणि आपण खात असलेल्या अन्नातून शरीराला मिळणारी पोषकतत्त्वं यांच्यात मूलभूत संबंध आहेत. अन्नात एखादं vitamin असणं आणि ते शरीराला उपयोगी पडणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पदार्थ शिजवताना, साठवताना किंवा त्यावर प्रक्रिया करताना काय बदलतं, हे समजून घेतल्याशिवाय त्याचं पोषणमूल्य पूर्णपणे समजत नाही. कमलांच्या काळात या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी उपलब्ध असलेली साधनं मर्यादित होती. आज आपण त्याच प्रश्नांचा अभ्यास अधिक अचूक उपकरणांनी, molecular biology च्या मदतीने आणि शरीरातील पोषकतत्त्वांच्या शोषणाची अधिक सविस्तर माहिती वापरून करू शकतो. पण मूळ प्रश्न अजूनही तिथेच आहेत.
आजच्या पोषणशास्त्रात bioavailability, micronutrient deficiencies, food fortification, nutrient stability अशा संज्ञा आपण वापरतो. एखाद्या पदार्थात Vitamin C किती आहे, त्यापैकी साठवणुकीनंतर किती शिल्लक राहतं, शरीराला त्यातून किती मिळतं, त्याची कमतरता असलेल्या लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता, हे प्रश्न आजही संशोधनाचे विषय आहेत. आधुनिक food technology मध्ये अन्न अधिक काळ टिकवण्यासाठी, त्यातली vitamins जपण्यासाठी, प्रक्रिया करताना होणारे पोषणाचे नुकसान कमी करण्यासाठी सतत संशोधन सुरू असतं. कमलांनी नीरेबद्दल विचारलेला प्रश्न याच वैज्ञानिक परंपरेतला होता. त्यांच्या संशोधनातून आजच्या सगळ्या पोषणतंत्रज्ञानाचा उगम झाला असं म्हणता येणार नाही. पण एका स्थानिक पदार्थातल्या Vitamin C च्या स्थिरतेचा अभ्यास करून त्याचा सार्वजनिक पोषणाशी संबंध जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आजही आपल्याला समजण्यासारखा आहे. विज्ञानाची उपकरणं बदलतात, संशोधनाच्या पद्धती बदलतात, उत्तरं अधिक अचूक होत जातात, पण काही प्रश्न पिढ्यानपिढ्या टिकून राहतात.
या सगळ्यात कमलांच्या आयुष्याचा आणखी एक धागा विसरता येत नाही. अनेक दशकांनंतर सी. व्ही. रामनांविषयी बोलताना त्यांनी त्यांचं वैज्ञानिक मोठेपण मान्य केलं, पण स्त्रियांविषयी त्यांची वृत्ती संकुचित होती आणि त्यांनी आपल्याला दिलेला अपमान आपण विसरू शकत नाही, हेही स्पष्टपणे सांगितलं. मला कमलांचं हे न विसरणं महत्त्वाचं वाटतं. कारण इतिहासातल्या मोठ्या माणसांविषयी बोलताना आपण त्यांच्या गैरसोयीच्या बाजू झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. “तो काळच तसा होता” असं म्हणून अनेक गोष्टींचा हिशेब मिटवतो. पण काळ तसा होता म्हणून कमलांना झालेला अपमान कमी होत नाही. आणि रामनांनी चुकीचं वागलं म्हणून त्यांच्या वैज्ञानिक कामाचं महत्त्वही नाहीसं होत नाही. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी स्वीकारता येतात. कमलांनी ते केलं. त्यांच्या संघर्षाचं महत्त्वही इथेच आहे. त्यांना रामनांना चुकीचं सिद्ध करण्यासाठी विज्ञान करायचं नव्हतं. त्या आधीपासूनच विज्ञान करण्यास पात्र होत्या. पण पुरुष संशोधकांना सहज मिळणाऱ्या संधीसाठी त्यांना लढावं लागलं. पुढे त्यांनी मिळवलेलं यश त्या अन्यायाचं समर्थन करत नाही. एखाद्या व्यक्तीने अडथळे पार केले म्हणून ते अडथळे आवश्यक होते असं होत नाही.
आज स्त्रिया संशोधनसंस्था चालवतात, मोठ्या वैज्ञानिक प्रकल्पांचं नेतृत्व करतात. तरीही कोणाच्या बुद्धिमत्तेवर सहज विश्वास ठेवला जातो आणि कोणाला ती पुन्हा पुन्हा सिद्ध करावी लागते, हा प्रश्न पूर्णपणे संपलेला नाही. विज्ञानाच्या प्रगतीचाही असाच एक प्रश्न आहे. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता, जनुकीय संपादन आणि अत्याधुनिक औषधनिर्मितीच्या शक्यतांनी भारावून जातो. पण आपल्या आसपास सहज मिळणाऱ्या अन्नात नेमकं काय आहे, ते अधिक पौष्टिक कसं करता येईल आणि त्याचा उपयोग ज्यांना सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल, हे प्रश्नही तितकेच वैज्ञानिक आहेत. कमलांनी नीरेतलं Vitamin C अभ्यासलं, त्यामागचं रसायनशास्त्र शोधलं आणि त्या ज्ञानाचा उपयोग पोषणाच्या प्रश्नासाठी होऊ शकेल का हे तपासलं. ज्या स्त्रीला स्वतः विज्ञानाच्या दारात अडवलं गेलं होतं, ती पुढे विज्ञानाचा उपयोग सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या आयुष्यातले हे दोन संघर्ष एकमेकांशी जोडलेले दिसतात. एक ज्ञान मिळवण्याच्या अधिकारासाठी होता, दुसरा त्या ज्ञानाचा उपयोग कुणाला व्हावा यासाठी. पहिल्या संघर्षात तिला रामनांसारख्या मोठ्या वैज्ञानिकासमोर उभं राहावं लागलं. दुसऱ्यात तिच्यासमोर होता भारतीय माणसाच्या ताटातला पोषणाचा अभाव. दोन्ही ठिकाणी तिने आपला प्रश्न सोडला नाही.
पुढच्या वेळी उन्हाळ्यात निरेचा ग्लास हातात घेतला तर कमला सोहनींची आठवण येईलच असं नाही. तशी ती यावी अशी अपेक्षाही नाही. नीरा कमलांच्या आधीही होती आणि त्यांच्यानंतरही राहणार आहे. पण त्या साध्याशा रसातलं Vitamin C अपेक्षेपेक्षा अधिक काळ का टिकतं, हा प्रश्न विचारणाऱ्या स्त्रीला एकेकाळी भारतातल्या सर्वोत्तम विज्ञानसंस्थेने केवळ स्त्री असल्यामुळे दारात अडवलं होतं, हे मात्र विसरता कामा नये. तिला प्रयोगशाळेत संशोधन करण्याआधी तिथे उभं राहण्याचा अधिकार मिळवावा लागला होता. पुढे तिने केंब्रिजमध्ये वनस्पतींच्या पेशींमधील श्वसनक्रियेचा अभ्यास केला आणि भारतात परतल्यावर आपल्या आसपासच्या साध्या पदार्थांमधलं रसायनशास्त्र शोधलं. तिच्या आयुष्याबद्दल लिहिताना आपण रामनांनी नाकारलेला प्रवेश, केंब्रिजची doctorate आणि तिने भूषवलेली मोठी पदं यांची आठवण काढतो. पण मला तिच्या आयुष्यातला नीरेचा प्रसंग अधिक जवळचा वाटतो. एका ताडाच्या झाडातून उतरवलेल्या गोडसर रसात तिला संशोधनाचा विषय सापडला आणि त्या संशोधनात माणसाच्या पोषणाचा प्रश्न. त्या ग्लासातलं रसायनशास्त्र आज आपल्याला अधिक अचूकपणे समजावून सांगता येईल, पण त्या प्रश्नामागची जिज्ञासा आणि त्याचा उपयोग कुणाला होणार याविषयीची आस्था अजूनही तितकीच आवश्यक आहे. कमलांच्या गोष्टीत विज्ञानात कोणाला प्रवेश मिळतो आणि विज्ञानाचा लाभ कोणापर्यंत पोहोचतो, हे दोन प्रश्न एकत्र येतात. पहिल्या प्रश्नासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. दुसऱ्याचं उत्तर त्या आयुष्यभर आपल्या संशोधनातून शोधत राहिल्या.
Hats off कमला!
— विश्वेश




