मौनाची वंशावळ
कविता
काही माणसं
आपल्या ओठांवर
बंद खिडकी घेऊन जगत आली.
त्यांना वाटत राहिलं
शांत राहणं म्हणजे
वादळातून न भिजता जाणं.
पण पाऊस
काही
नेहमी बाहेर पडत नाही.
कधी तो
आतल्या आत पडत राहतो.
आणि मग
एका संध्याकाळी
आरशात दिसतो
स्वतःचाच चेहरा
शब्दांनी नव्हे,
तर न बोललेल्या
विचारांच्या चिखलाने
बरबटलेला.
तेव्हा कळतं,
ज्या मौनाला आपण
शहाणपण म्हणत आलो,
ते
आपल्याच भीतीचं
एक सुसंस्कृत पण
विद्रूप रूप होतं.
आणि आता
अजून एक भीती वाटू लागते,
माझ्या रक्तातून,
मौनातून,
हा वारसा
आधीच
कुणाच्या ओठांवर
बंद खिडकी
होऊन तर बसला नाही ना?
— विश्वेश


