दडपे पोहे
माझ्या ब्लॉग च्या नावामागची गोष्ट
सकाळची वेळ असायची.
घरात अजून थोडी शांतता असायची.
खिडकीतून येणारा कोवळ्या उन्हाचा पिवळसर प्रकाश,
आणि स्वयंपाकघरातून येणारा हलकासा आवाज.
भांडी वाजण्याचा.
पाण्याचा.
कांदा चिरण्याचा.
मी अंथरुणातच असायचो.
अजून पूर्ण जागा झालेलो नसायचो.
आणि तेव्हाच…
तो आवाज यायचा.
“आज मैने तुम्हारे लिये दडपे पोहे किये है… आज वोहीच दडपो…”
अगदी शिरीष कणेकरांनी जसं लिहिलंय,
तसंच काहीसं आमच्या मध्यमवर्गीय घरात
आठवड्यातून चार-पाच वेळा घडायचं.
तो संवाद म्हणजे घोषणा असायची.
सूचना नाही,
विचारणा नाही,
निर्णय असायचा.
आज दडपे पोहे.
मी लगेच उठायचो.
कारण मला माहीत असायचं
आजचा दिवस चांगला जाणार आहे.
आईने स्वयंपाकघरात
पोह्यांची पिशवी उघडलेली असायची.
कांदा कापून ठेवलेला असायचा.
टोमॅटो चिरून त्याच्याच बाजूला.
ओल्या नारळाचा चव असायचा.
आणि तिच्या चेहऱ्यावर
नेहमीचं शांत हसू.
ती पोह्यांवर पाणी
अगदी जपून हलक्या हाताने
शिंपडायची
“जास्त शिंपडू नकोस…
चिकचिकाट होईल,”
ती स्वतःशीच म्हणायची.
दडपे पोहे म्हणजे आमच्या घरात
साधा नाश्ता नव्हता.
तो एक सोहळा होता.
कुठल्याही भरमसाट मसाल्याचा मारा नाही.
जास्त तेल नाही.
दिखावा नाही.
फक्त
कच्चे पोहे.
कांदा.
टोमॅटो.
ओलं खोबरे.
हिरवी मिरची.
वरून हलकीशी फोडणी.
बस्स.
पण त्या ताटात
आईचं संपूर्ण आयुष्य असायचं.
ती ताट माझ्यासमोर ठेवायची.
आणि म्हणायची,
“पटकन खा… त्यातच खरी मजा आहे.”
मी पहिला घास घ्यायचो.
आणि नकळत हसायचो.
कारण ते दडपे पोहे
माझ्यासाठी “गाजर का हलवा” पेक्षाही गोड होते.
त्या पोह्यात साखर नव्हती.
प्रेम होतं
शिंपडलेलं.
कधी शाळेचा ताण.
कधी परीक्षेची भीती.
कधी अपयश.
सगळं त्या पोह्यांमध्ये विरघळायचं.
आईचा एक आवाज
सगळं ठीक करून जायचा.
वर्षं गेली.
घर बदललं.
जबाबदाऱ्या वाढल्या.
आयुष्य वेगात धावू लागलं.
आणि…
तो आवाज हळूहळू हरपला.
आजही मी दडपे पोहे खातो.
हॉटेलमध्ये.
घरी.
कधी मित्रांकडे.
चव चांगली असते.
पोट भरतं.
पण…
काहीतरी अपूर्ण राहतं.
खाल्ल्यानंतरही
भूक राहते.
कदाचित पोट भरतं…
पण मन भरत नाही.
कारण त्या ताटात
आता आई नाही.
तो आवाज नाही.
“आज दडपे पोहे केले आहेत रे…”
हे शब्द नाहीत.
आता दडपे पोहे म्हणजे
फक्त पदार्थ.
तेव्हा दडपे पोहे म्हणजे
आई होती.
म्हणूनच माझ्या ब्लॉगचं नाव
dadpepohe.com ठेवलं.
कारण हा ब्लॉग
आठवणींचा आहे,
तितकेच साधे सच्चे विचार इथे मांडता यावे
म्हणून आहे
त्या हरवलेल्या आवाजासाठी आहे.
त्या आठवणींसाठी आहे.
त्या प्रेमासाठी आहे
जे आता फक्त चवीपुरतं उरलंय.
आजही मी अनेकदा दडपे पोहे खातो.
पण प्रत्येक वेळी
एकच गोष्ट जाणवते…
मी खातो फक्त पोहे.
आई देत होती ते आयुष्य.
आणि म्हणूनच…
दडपे पोहे खाऊनही
आजही माझी भूक संपत नाही.
कारण मला अजूनही
आईचा आवाज ऐकायचा आहे.
“आज मैने तुम्हारे लिये दडपे पोहे किये है…तुम वोहीच दडपो”
धन्यवाद आई
विश्वेश



अप्रतिम, विषय आणि लेखन दोघेही.
मस्त... उबदार... गोड