डोंगरावरच्या एका ओस पडत चाललेल्या गावात एक म्हातारा लाकडं रचतो आहे. त्याची बायको विचारते, काय करतोयस? तो सहजपणे सांगतो, तुझ्यासाठी चिता तयार करतोय.
हे ऐकताना आपल्याला धक्का बसतो. पण त्या दोघांना यात काही विलक्षण वाटत नाही. त्यांच्या रोजच्या भांडणात, थट्टेत, काळजीत आता मृत्यूही सामील झाला आहे. आणि मृत्यूची भीती वाटते ती केवळ मरावं लागणार म्हणून नाही. आपल्या नंतर उरणाऱ्या माणसाचं काय होणार, याची त्यांना अधिक चिंता आहे.
विनोद कापरी यांचा Pyre (2024) हा चित्रपट उत्तराखंडच्या कुमाऊँ भागातल्या पदम आणि तुळशी या वृद्ध जोडप्याची गोष्ट सांगतो. आयुष्याची साठहून अधिक वर्षं एकमेकांसोबत घालवलेली ही दोन माणसं. मुलगा अनेक वर्षांपूर्वी रोजगारासाठी गाव सोडून गेला. इतर घरांची दारंही एकामागून एक बंद झाली. काही मोजकी माणसं उरली होती, तीही आता निघून चालली आहेत. कधीकाळी माणसांनी भरलेलं गाव हळूहळू नकाशावर उरलेलं एक नाव होत आहे.
उत्तराखंडमध्ये अशा गावांना ghost villages म्हणतात. पण या नावात एक गंमत आहे. इथे भुताटकी नाही. काही घरं खरंच रिकामी आहेत तर काहींमधली माणसं जगाला दिसेनाशी झाली आहेत.
पदम आणि तुळशीचं एकमेकांवरचं प्रेम हा चित्रपटाचा गाभा आहे, पण आपल्या नेहमीच्या चित्रपटांत दिसतं तसं प्रेम इथे नाही. तो तिच्यावर चिडतो. ती त्याला टोमणे मारते. तो दारू पितो, ती बिडी ओढते. दोघं एकमेकांना नकोनकोसं बोलतात आणि तरीही एकमेकांशिवाय जगण्याचा विचारही त्यांना सहन होत नाही. इतकी वर्षं एकत्र राहिल्यावर प्रेमामध्ये काळजी पेक्षा कुरकुर जास्त आहे की काय असं भासतं. कोण औषध घेणार, कोण कुणाचं ऐकणार, कोण आधी मरणार, यावरसुद्धा वाद होतात. आपल्या घरातल्या आजी आजोबांना कधी जवळून अनुभवलं तर फार काही वेगळं नाही हे आपल्याला कळतं अन चटकन आपण ह्यांच्या नातवंडांच्या किंवा मुलांच्या भूमिकेत शिरतो.
मला त्यांच्या या भांडणात एक सुंदर प्रामाणिकपणा जाणवतो. म्हातारपणातलं प्रेम दाखवायचं म्हटलं की चित्रपटाने त्याला फार पवित्र, संयमी आणि त्यागमय करून टाकले आहे. या दोघांचं प्रेम तसं नाही. त्यात हट्ट आहे, चिडचिड आहे, कधीकधी स्वार्थही आहे. आणि त्याचमुळे ते खरं वाटतं.
तुळशी आजारी पडते तेव्हा तिला दवाखान्यात नेणं हे एखाद्या शहरातल्या माणसाला वाटेल तितकं सोपं काम नसतं. डोंगर उतरायचा, मदतीला दुसरं माणूस शोधायचं, अनेक तास घालवायचे. पदमकडे शेळ्या आहेत. त्याला मदत करणाऱ्या माणसाला तो एखादी शेळी देतो. आपल्या शहरात पैसे देऊन मिळणाऱ्या सेवांची इथे किंमत वेगळी आहे. शेळ्या संपल्या तर? या प्रश्नाला त्याचं उत्तर अधिक अस्वस्थ करतं. तोपर्यंत आपणच नसू कदाचित.
या चित्रपटाची कल्पना विनोद कापरी यांना खरोखर भेटलेल्या अशाच एका जोडप्यातून आली. त्या भेटीत त्यांना समजलेली गोष्ट फार साधी होती. एका माणसाच्या दृष्टीने त्याच्या बायकोला दवाखान्यात नेण्यासाठी घरात किती शेळ्या शिल्लक आहेत, हा तिच्या आयुष्याशी निगडित हिशेब होता. आपल्या विकासाच्या चर्चा, आकडेवारी, रोजगाराच्या योजना या सगळ्यांच्या पलीकडे डोंगरात राहिलेल्या वृद्धांचं जग अशा हिशेबावर चालतं.
मात्र Pyre ला स्थलांतरावरचं सरळ भाष्य समजणंही चूक ठरेल. मुलाने गाव सोडणं ही केवळ कृतघ्नतेची गोष्ट आहे का? जिथे रोजगार नाही, चांगला दवाखाना नाही, तिथे पुढच्या पिढीने काय करायचं? आणि गेलेली मुलं परतली नाहीत म्हणून गावात राहिलेल्या आईवडिलांचं एकटेपण कमी खरं ठरतं का? दोन्ही बाजूंचे प्रश्न योग्य आहेत. चित्रपट त्यांना एखाद्या भाषणातली सोपी उत्तरं देत नाही. तो पदम आणि तुळशीच्या घरात थांबतो आणि या प्रश्नांची किंमत कशी मोजली जाते ते पाहू देतो.
चित्रपटात हिमालयाचे लांबवर पसरलेले डोंगर, ढग, पाऊस आणि हिरव्या उतारांची सुंदर दृश्यं आहेत. सिनेमॅटोग्राफर मानस भट्टाचार्य यांनी टिपलेली ही दृश्यं पाहताना सुरुवातीला आपण त्यांच्या सौंदर्याने भारावून जातो. पण थोड्याच वेळात त्या सौंदर्याची दुसरी बाजू लक्षात येते. पोस्टकार्डवर सुंदर दिसणारा हा डोंगर आजारी माणसाला दवाखान्यात घेऊन जाताना किती निर्दयी ठरू शकतो! आपण पर्यटनाला ज्या शांततेच्या शोधात जातो, तीच शांतता तिथे कायम राहणाऱ्या माणसाला असह्य होऊ शकते.
या चित्रपटातली शांतता मला विशेष जाणवली. पाऊस, वारा, दूरवरून येणारे आवाज आणि मध्येच या दोघांची कुमाऊनी बोलीतली बाचाबाची. एकेकाळी शेजाऱ्यांच्या बोलण्याने भरलेल्या परिसरात आता कुणाला हाक मारायची, हा प्रश्न आहे. संगीताला मायकल डॅना आणि अमृता वाझ यांची साथ आहे, गुलजारांची गीतंही आहेत. काही प्रसंगांत संगीत भावना थोडं अधिक ठळक करतं असं वाटतं, पण पदम आणि तुळशीचे साधे संवाद, त्यांचं एकमेकांजवळ बसणं आणि भांडणं अधिक काळ आठवतात.
चित्रपटात पदमची भूमिका पदमसिंग कापरी यांनी, तर तुळशीची भूमिका हीरा देवी यांनी केली आहे. दोघेही व्यावसायिक चित्रपट-अभिनेते नाहीत. कदाचित त्यामुळेच त्यांच्या हालचालींत, बोलण्याच्या लयीत आणि एकमेकांकडे पाहण्यात आपल्याला अभिनयाची मुद्दाम केलेली जाणीव फारशी होत नाही. कॅमेऱ्यासमोर म्हातारपण ‘साकारायचं’ आहे, असा त्यांचा आविर्भाव नाही. त्यांच्या चेहऱ्यांवर त्या आयुष्याच्या खुणा आधीपासून आहेत.
या कथेत मुलाचं पत्र येतं आणि अनेक वर्षं थंडावलेली एक आशा पुन्हा जागी होते. पत्र हा किती विचित्र प्रकार आहे! लिहिणारा ते एका दिवशी लिहितो, पण त्याची वाट पाहणाऱ्याच्या आयुष्यात तो दिवस किती वर्षं लांबू शकतो. मुलगा परत येईल की नाही, यापेक्षाही आता या दोन माणसांना पुन्हा वाट पाहण्यासारखं काहीतरी मिळालं आहे. वर्षानुवर्षं त्यांचं जग शेळ्या, औषधं, पाऊस आणि उद्याच्या चिंतेपुरतं आक्रसत गेलं होतं. एक पत्र त्या जगात पुन्हा काही दिवसांची भविष्यकाळाची जागा करून देतं.
Pyre म्हणजे चिता. जिवंत माणसाला चितेचा विचार करावा लागणं यात वेदना आहेच, पण इथे त्याहून जास्त बोचणारा प्रश्न वेगळा आहे. ज्याच्यासोबत सगळं आयुष्य काढलं, त्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी शेवटचं काम तरी आपल्याला करता येईल का? आणि आपलाच शेवटचा निरोप द्यायला इथे कुणी असेल का?
आपण मुलांना चांगल्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी, संधीसाठी गावातून शहरात आणि शहरातून परदेशात पाठवतो. त्यांच्या जाण्याचा आपल्याला अभिमानही असतो. त्यांनी जावंच, मोठं व्हावं, आपल्यापेक्षा अधिक संधी मिळवाव्यात, असं मनापासून वाटतं. त्या इच्छेत काही गैर नाही. पण त्याच घरात एक दिवस दोन खुर्च्या उरतात. फोनवर बोलणं चालू राहतं, पैशांची अडचण नसते कदाचित, आणि तरीही अचानक ताप आला तर दवाखान्यापर्यंत सोबत कोण येणार, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
पदम आणि तुळशी हिमालयात राहतात म्हणून त्यांची गोष्ट आपल्यापासून दूरची वाटू शकते. पण हा प्रश्न आपल्या ओळखीच्या कितीतरी घरांत वेगवेगळ्या रूपांत उभा आहे. फरक इतकाच की शहरात चिता रचायला माणसं मिळतील. काही वेळा जगायला सोबत मात्र मिळेलच असं नाही.
— विश्वेश



सुंदर लेख आहे, नक्कीच बघायला हवा मला
अप्रतिम ❤️