पुस्तकाचे नाव - नीहार (महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेता)
लेखिका / कवयत्री - पद्मा (पद्मा गोळे, जन्म १० जुलै १९१३ - मृत्यू १२ फेब्रुवारी १९९८)
आवृत्ती - प्रथम आ. इ.स. १९५४
पृष्ठ संख्या - ५९
मूल्य - रु. ३
प्रकाशन - मौज प्रकाशन गृह
अर्वाचीन मराठी कवितेला साज चढवणाऱ्या कवयित्री ते सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळख असणाऱ्या पद्मा गोळे. पद्मा गोळ्यांचा जन्म १० जुलै, इ.स. १९१३ रोजी तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यात जन्म झाला. पुण्याच्या कन्याशाळेत त्यांना विभावरी शिरुरकर शिक्षिका होत्या आणि इथे त्यांची घट्ट जोडी जमली संजीवनी मराठे बरोबर. नंतर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. माझ्या वाचनात जेवढे आले त्यानुसार त्यांनी प्रथम नाट्य लेखनापासून सुरुवात केली आणि नंतर त्या कवितांकडे वळल्या. त्यांच्या सुरुवातीच्या कविता वाचून असे वाटते कि त्यांच्यावर तांब्याचा बराच प्रभाव असेल. प्रकृतीच्या प्रतिमांचा वापर करत, त्यांच्या कवितांमधून प्रेमातील उत्कटता, स्वप्नाळूपणा, असफल प्रेमातील वेदना आणि समजूतदारपणा प्रभावीपणे व्यक्त होतो. त्यांना घराची सुरक्षितता हवी आहे, पण ती जिथे बंदिस्त वाटते, अशी चौकट नको आहे. म्हणूनच त्यांच्या एका काव्यात त्या स्पष्ट म्हणतात — "हवे मला प्रिय गृहमंदिर, नको परी ती बंदिशाला" (संग्रह - प्रीतिपथावर).
त्यांचे कविता संग्रह "नीहार" आणि "श्रावणमेघ" मला माझ्या शाळेतल्या लायब्ररी मध्ये पहिल्यांदा सापडले आणि त्यातील सगळ्या कविता मी घरी वहीत उतरवून घेतल्या. मला सगळ्यात आवडलेली भावलेली कविता म्हणजे "लक्ष्मणरेषा". पुराणकथांमधून उभ्या केलेल्या पुरुष आदर्शाविषयी त्यांना अभिमान आहे, पण त्यांतील यथार्थता तपासून पाहायची त्यांची कुवत आणि धाडस त्यांच्यात होते:
लक्ष्मणरेषा (संग्रह - नीहार) ------------------------- सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने तिने ती ओलांडली आणि झाले रामायण आमच्यापुढे दाही दिशा लक्ष्मणरेषा ओलांडाव्याच लागतात, रावणांना सामोरे जावेच लगते एवढेच कमी असते; कुशीत घेत नाही भुई दुभंगून!
आधुनिक स्त्री अर्थार्जनासाठी उंबरठ्याची लक्ष्मणरेषा ओलांडून, घरातून बाहेर पडली खरी पण बाहेरच्या जगात वाट बघत असलेले रावण, होणारी कोंडी, घुसमट आणि शेवटी धरणीमातेने फिरवलेली पाठ त्या पुराणकथांच्या प्रतीकांमधून कल्पकतेने उभी करतात. "आमच्यापुढे दाही दिशा लक्ष्मणरेषा, ओलांडाव्याच लागतात, रावणांना सामोरी जावेच लागते! एवढेच कमी असते. कुशीत घेत नाही भुई दुभंगून!" या ओळी त्यांचे बंड स्पष्ट करतात. पद्मा ताईंची खासियत म्हणजे त्यांच्या काव्य-धिटाईत खानदानी शालीनता आहे, संयम आहे. त्यांनी याच संग्रहात लिहिले आहे "आम्ही कुलीनांच्या कन्या, चाफेकळ्या पानांआड" (संग्रह - नीहार). हे त्यांच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार अजून काय. स्वत:च्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व वाटते. त्यांच्या कवितेतून त्यांनी स्त्री च्या जगण्याचा एक वेगळाच समतोल मांडलेला आपल्याला दिसतो. आधुनिकता आणि परंपरा यांचा संघर्ष त्यांच्या कवितांमधून जाणवतो. स्त्रीचं भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी जरी असले तरी काळाबरोबर बदलत जाणारी सांस्कृतिक, सामाजिक व्यवस्था आणि ह्या वातावरणात होणारी स्त्री मनाची कासाविशी, त्यांचे ताणतणाव त्या कवितेतून व्यक्त झालेले आहेत. त्यांचं सामाजिक कार्यही बरेच आहे. गोवामुक्ती आंदोलनातील शुश्रुषा पथकात त्या सहभागी झाल्या होत्या असे ऐकिवात आहे. "मी माणूस" हि त्यांची कविता हि मराठीतली पहिली स्त्रीवादी कविता असे आम्हाला आमचे मराठीचे शिक्षक सांगायचे. त्यांच्या "नीहार" संग्रहातली ही कविता आहे.
सगळं खोटं सगळं खोटं.
प्रेम खोटं काम खोटा.
साऱ्या साऱ्या नकली नोटा.
स्त्री देवी हे ही खोटं
स्त्री सखी हे ही खोटं
स्त्री सुंदर चलनी हुंडी
स्त्री म्हणजे नुसती कुंडी
तीन पानी मोठी कविता आहे आणि यातून त्यांचे वक्तृत्व, विचार आणि भावना यांचे एक खास मिश्रण आपल्याला वाचायला मिळते.
‘परी कधी हे पुरुषा! अदया!
रामस्वरूपी तुला बघावे,
भूमिगता सीताच होउनी,
एकाकीपणि तुज रडवावे’
असे लिहिणार्या पद्माताई कवितेचा शेवट करतांना लिहितात:
‘नाही मी नुसती नार,
पेजेसाठी लाचार,
शेजेसाठी आसुसणार,
नाही मी नुसती मादी
मी माणूस माणूस आधी’
हे असे निःसंदिग्धपणे सांगण्याचे धाडस त्यांच्यात होते.
त्यांची अशीच अजून एक आवडती कविता :
"पाठीशी कृष्ण हवा" (संग्रह: श्रावणमेघ) ——————————————————— मौनानं ही होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्याच स्वाधीन झाले असते ; पण शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला. शब्द म्हणजे अंध कौरव ओठात एक, पोटात भलतंच मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन; पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा.
हि कविता जरी मी शालेय जीवनात वाचली आणि उतरवली असली तरी ती डायरी जीर्ण होईपर्यंत (आणि थोडेफार शहाणपण येईपर्यंत) अनेकदा हि कविता पुन्हा पुन्हा वेग वेगळ्या पद्धतीने समजली. असेच सुनीता बाईंकडून (सुनीता देशपांडे) अनेकदा ऐकलेली हि कविता, जी सुनीताबाई म्हणतात कि त्यांची हक्काची आहे:
“चाफ्याच्या झाडा”
------------------
चाफ्याच्या झाडा ….
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय …. कळतंय ना …. चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलय ना कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं फुलांनी ओंजळ भरलीये ना
मला असे फार वाटते कि पद्मा ताईंचा काव्य प्रवास हा त्याच्या आत्मशोधाचा प्रवास होता. त्यांची प्रारंभी स्वतःपुरती असलेली कविता, नंतर स्त्रीजीवनातील सूक्ष्म वेदना समजून घेते. "आताशी मी नसतेच इथे, तशी माझी ये जा असली तरी" म्हणत ती स्वतःकडे अधिक खोलवर पाहते आणि माणसाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी परिपक्व संवेदना प्रकट करते. त्यांच्या ‘नीहार’ आणि ‘स्वप्नजा’ या काव्यसंग्रहांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. "परक्याची पाऊलवाट मान्य नसणारी" हि कवयत्री आपले वेगळे स्थान निर्माण करून गेली हे नक्की.
पद्मा ताईंना जितके वाचावे तितके भारावून जायला होते. त्यांच्याबद्दल जितके लिहावे तितके थोडेच. तेव्हा हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि मला प्रतिक्रिया कळवा.
-- विश्वेश