दिग्दर्शक : Isao Takahata | Studio Ghibli
Studio Ghibli चे जवळजवळ सगळेच चित्रपट मला आवडतात. Spirited Away, My Neighbor Totoro, Howl’s Moving Castle, The Wind Rises, The Tale of the Princess Kaguya, From Up on Poppy Hill, Whisper of the Heart अशा कितीतरी चित्रपटांनी माझ्या मनात आपापली जागा मिळवली आहे. Ghibli च्या चित्रपटांमध्ये एक विलक्षण गोष्ट असते. लहान मुलांसाठी बनवलेला वाटणारा चित्रपट मोठेपणी पाहिला, की त्यात आपल्याला काहीतरी अगदी वेगळंच सापडतं. आणि मोठ्यांसाठी असलेला चित्रपट एखाद्या लहान मुलाने पाहिला, तर त्याला त्यात आपलं स्वतःचं जग दिसतं.
पण या सगळ्या चित्रपटांमध्ये एक चित्रपट असा आहे, ज्याच्याबद्दल मला फार कमी बोललं जातं असं वाटतं. तो म्हणजे Isao Takahata यांचा १९९१ सालचा Only Yesterday
खरं तर या चित्रपटाचं मूळ जपानी नाव Omohide Poro Poro (おもひでぽろぽろ) असं आहे. त्याचा अर्थ Only Yesterday असा होत नाही. Omohide म्हणजे आठवणी आणि Poro Poro म्हणजे एखादी गोष्ट थेंबाथेंबाने किंवा एकामागोमाग एक गळत राहणं. Memories Come Tumbling Down असं त्याचं साधारण भाषांतर करता येईल. मला तर हे मूळ नाव अधिक आवडतं. कारण आपल्या आठवणी कधीच एखाद्या सलग गोष्टीसारख्या परत येत नाहीत. त्या अचानक येतात. एखादा चेहरा, शाळेतला बाक, आईच्या साडीचा वास, एखादी विसरलेली दुपार. एका आठवणीमागून दुसरी, मग तिसरी. कित्येक वर्षं मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात पडून राहिलेल्या गोष्टी अचानक टपटप बाहेर पडू लागतात. Takahata यांच्या चित्रपटात नेमकं हेच घडतं
Ghibli च्या इतर चित्रपटांसारखी यात जादू नाही, उडणारे किल्ले नाहीत, अद्भुत प्राणी नाहीत किंवा जग वाचवण्याची मोहीम नाही. यात आहे सत्तावीस वर्षांची Taeko, टोकियोमध्ये नोकरी करणारी एक सामान्य तरुणी. काही दिवसांसाठी ती जपानमधल्या एका खेड्यात जाते आणि त्या प्रवासात तिच्या दहा वर्षांच्या वयातल्या आठवणी पुन्हा जाग्या होऊ लागतात.
शाळेतली एक घटना, पहिलं आकर्षण, गणित न समजल्यामुळे झालेली चिडचिड, बहिणींशी झालेली भांडणं, घरच्यांनी सहज म्हणून टाकलेली एखादी गोष्ट, पहिल्यांदा खाल्लेला अननस. अगदी साध्या आठवणी. इतक्या साध्या की त्यांच्यावर चित्रपट कसा बनू शकतो, असाही प्रश्न पडावा.
पण मला वाटतं, Only Yesterday समजण्यासाठी आपल्याला आधी एक गोष्ट मान्य करावी लागते. आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आठवणी या नेहमीच मोठ्या घटनांच्या नसतात. अनेकदा एखाद्या अगदी सामान्य दुपारची, वर्गातल्या एखाद्या अपमानाची किंवा कुणीतरी आपल्याला प्रेमाने बोलावलेल्या क्षणाची आठवण आयुष्यभर आपल्याबरोबर राहते. विशेष म्हणजे त्या वेळी त्या घटनेचं महत्त्व आपल्यालाही कळलेलं नसतं.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा इतिहासही तितकाच विचित्र आहे. १९९१ मध्ये जपानमध्ये प्रदर्शित झालेला Only Yesterday त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा जपानी चित्रपट ठरला. पण अमेरिकेत त्याच्या अधिकृत चित्रपटगृहातील प्रदर्शनासाठी २०१६ साल उजाडावं लागलं. चित्रपटावर सरकारने बंदी घातली नव्हती. Disney कडे Studio Ghibli च्या चित्रपटांचे उत्तर अमेरिकेतील वितरणाचे अधिकार असताना कंपनीने मात्र हा चित्रपट प्रदर्शित केला नाही. त्यामागे चित्रपटात मुलींच्या मासिक पाळीविषयी असलेले मोकळेपणाचे प्रसंग हे एक कारण असल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर चित्रपटाची संथ गती आणि भाषांतराशी संबंधित काही अडचणीही होत्या. मला यातला विरोधाभास विलक्षण वाटतो. ज्या Studio Ghibli ने जादू, युद्ध, मृत्यू, हिंसा आणि माणसाच्या मनातल्या कितीतरी गुंतागुंतीच्या भावना पडद्यावर आणल्या, त्यांच्याच एका चित्रपटात मुलींच्या शरीरात होणाऱ्या अगदी नैसर्गिक बदलांविषयी बोललं गेलं म्हणून त्याचं प्रदर्शन अडून राहिलं. कदाचित या चित्रपटाचं मोठेपण इथेही दिसतं. Takahata मुलांच्या आयुष्याकडे मोठ्यांना सोयीस्कर वाटेल अशा नजरेतून पाहत नाहीत. मुलांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी, मग त्या कितीही साध्या किंवा अस्वस्थ करणाऱ्या असोत, ते तितक्याच गांभीर्याने दाखवतात.
या चित्रपटाचं मला सर्वाधिक आवडलेलं वैशिष्ट्य म्हणजे तो पाहणाऱ्याच्या वयानुसार बदलत जातो.
समजा, एखादं दहा-बारा वर्षांचं मूल हा चित्रपट पाहत आहे. त्याला कदाचित Taeko च्या मोठेपणीच्या आयुष्यापेक्षा तिचं बालपण अधिक जवळचं वाटेल. गणितातले अपूर्णांक न समजणं, मोठ्या माणसांना आपलं म्हणणं नीट सांगता न येणं, आपल्या इच्छा घरच्यांना क्षुल्लक वाटणं किंवा शाळेत कुणीतरी आपल्याला आवडत असल्याचं समजल्यावर होणारी विचित्र अवस्था, हे सगळं त्याला ओळखीचं असेल. मोठ्यांना हसू येणाऱ्या अनेक प्रसंगांमध्ये त्याला मात्र स्वतःची अडचण दिसेल.
कदाचित चित्रपट त्याला थोडा संथही वाटेल. काही आठवणींमधलं दुःख त्याला अजून समजणार नाही. पण तेही योग्यच आहे. त्या वयात आपण आठवणी तयार करत असतो. त्यांचे अर्थ लावण्याची वेळ अजून आलेली नसते.
आता हाच चित्रपट एखाद्या सोळा-सतरा वर्षांच्या मुलाने पाहिला तर?
मला वाटतं, त्याला Taeko च्या आयुष्यात एक वेगळाच संघर्ष दिसेल. आपल्याला नेमकं कोण व्हायचं आहे, आणि घरचे, शिक्षक, समाज आपल्याला कोण बनवू पाहत आहेत, यामधला संघर्ष. लहानपणी जे सहज वाटत होतं, तेच मोठं होताना अवघड का बनत जातं, हा प्रश्न.
Taeko ला अभिनय करायचा असतो, काही गोष्टी शिकायच्या असतात, काही गोष्टींचा अर्थ तिला स्वतः शोधायचा असतो. पण तिच्याभोवतालची मोठी माणसं तिच्या प्रत्येक आवडीनिवडीकडे स्वतःच्या अनुभवातून पाहतात. त्यांना तिचं भविष्य सुरक्षित करायचं आहे, तिला योग्य वळण लावायचं आहे. आणि या सगळ्यात तिचा स्वतःचा आवाज कधी कमी होत जातो, हे कुणाच्या लक्षातही येत नाही.
किशोरवयात आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं, पण त्याच वेळी आपल्याला कुणीतरी समजून घ्यावं, असंही वाटत असतं. मोठ्यांच्या जगात प्रवेश करण्याची घाई असते, पण बालपण अजून पूर्णपणे सुटलेलं नसतं. Only Yesterday मधली लहान Taeko आणि मोठी Taeko यांच्या दरम्यानची ही जागा मला फार सुंदर वाटते.
आणि मग प्रश्न येतो, हाच चित्रपट चाळिशीत पाहिला तर काय होतं?
माझ्या मते, इथेच हा चित्रपट सर्वाधिक अस्वस्थ करतो.
चाळिशीत आपण या चित्रपटातल्या कुणा एकाच व्यक्तीच्या जागी नसतो. आपण एकाच वेळी लहान Taeko असतो, मोठी Taeko असतो आणि तिचे आईवडीलही असतो.
लहान Taeko मध्ये आपल्याला स्वतःचं बालपण दिसतं. विस्मरणात गेलेले काही प्रसंग अचानक आठवू लागतात. शाळेतल्या शिक्षकांनी बोललेलं एखादं वाक्य, वडिलांचा राग, आईची एखादी अपेक्षा, आपल्याला काहीतरी बनायचं होतं ती धूसर इच्छा. तेव्हा अगदी मोठं वाटलेलं दुःख आज किती लहान वाटतं, याचं आश्चर्य वाटतं. पण त्याच वेळी ते दुःख त्या लहान मुलासाठी खरोखर किती मोठं होतं, हेही समजतं.
मोठ्या Taeko मध्ये आपल्याला आजचा स्वतःचा चेहरा दिसतो. आयुष्यात आपण अनेक निर्णय घेतलेले असतात. काही स्वतःच्या इच्छेने, काही परिस्थितीमुळे आणि काही केवळ सगळेच तसं करत होते म्हणून. नोकरी, घर, जबाबदाऱ्या, आर्थिक सुरक्षितता, मुलांचं शिक्षण, भविष्याची काळजी. या सगळ्यात आपण कधीतरी लहान होतो, आपल्यालाही काही अगदी वेगळ्या गोष्टी करायच्या होत्या, याचा विसर पडतो.
मला या चित्रपटातली एक कल्पना फार अस्वस्थ करते. मोठी Taeko जेव्हा खेड्याकडे निघते, तेव्हा तिच्या आठवणीतली दहा वर्षांची Taeko जणू तिच्याबरोबर प्रवास करू लागते. सत्तावीस वर्षांची स्त्री आणि दहा वर्षांची मुलगी. सतरा वर्षांचं अंतर असूनही त्या दोघी एकमेकींपासून वेगळ्या झालेल्या नाहीत.
आपणही तसेच असतो का?
आज आपलं वय चाळीस, पन्नास किंवा साठ असलं, तरी आपल्या आत कुठेतरी दहा वर्षांचं एक मूल अजून राहत असतं का? ज्याला कधीतरी कुणीतरी अपुरं ठरवलं होतं, ज्याचं कौतुक व्हायला हवं होतं पण झालं नाही, ज्याला काहीतरी विचारायचं होतं पण विचारता आलं नाही. आपण मोठे झालो म्हणून त्या मुलाचं अस्तित्व संपत नसावं. ते फक्त आपल्या रोजच्या आयुष्याच्या आवाजात ऐकू येईनासं होत असावं.
पण चाळिशीत हा चित्रपट पाहताना आणखी एक गोष्ट जाणवते, जी कदाचित वीस वर्षांच्या वयात जाणवली नसती.
आपण आता कुणाचेतरी आईवडीलही असतो.
Taeko च्या बालपणातले अनेक प्रसंग पाहताना सुरुवातीला तिच्या आईवडिलांचा राग येऊ शकतो. एखादी इच्छा नाकारताना, मुलांच्या भावना पुरेशा गांभीर्याने न घेताना किंवा त्यांच्या क्षमतांबद्दल सहज मत व्यक्त करताना मोठी माणसं किती कठोर असू शकतात, हे दिसतं.
मग हळूहळू एक अस्वस्थ करणारा विचार मनात येतो. आपणही आपल्या मुलांशी असंच कधी वागलो असू का?
आपण सहज म्हणून टाकलेलं एखादं वाक्य आपल्या मुलाच्या मनात कायमचं राहिलं असेल का? त्याने उत्साहाने सांगितलेल्या एखाद्या कल्पनेवर आपण लगेच व्यवहार्यतेचा प्रश्न विचारला असेल का? त्याला काहीतरी दाखवायचं असताना आपण कामात व्यग्र होतो का? त्याच्या एखाद्या अपयशाला आपण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं असेल का?
आपल्या आठवणीत तो प्रसंग कदाचित शिल्लकही नसेल. पण त्याच्या आठवणीत?
हा विचार मला विशेष अस्वस्थ करतो. कारण आपल्या मुलांचं बालपण घडत असताना आपण स्वतःच्या प्रौढ आयुष्याशी झगडत असतो. त्यांच्यासाठी तो एक महत्त्वाचा दिवस असू शकतो आणि आपल्यासाठी तो ऑफिसमधून दमून घरी परतण्याचा एक सामान्य दिवस. त्यांच्यासाठी आयुष्यभराची आठवण ठरणाऱ्या एखाद्या प्रसंगात आपण किती अनुपस्थित होतो, हे आपल्याला कदाचित कधीच कळणार नाही.
पण Takahata या चित्रपटात कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाहीत. Taeko च्या आईवडिलांनाही त्यांच्या काळाची, संस्कारांची आणि मर्यादांची पार्श्वभूमी आहे. माणसं नेहमी वाईट हेतूने दुसऱ्याला दुखावत नाहीत. अनेकदा आपल्याला योग्य वाटणाऱ्या गोष्टी करतानाही आपण दुसऱ्याच्या मनात एखादी जखम ठेवून जातो.
चित्रपटाचं आणखी एक सुंदर वैशिष्ट्य म्हणजे आठवणींचं चित्रण. बालपणाचे प्रसंग पाण्यात विरघळलेल्या रंगांसारखे दिसतात. त्यांच्या कडा धूसर आहेत, पार्श्वभूमी अनेकदा अपूर्ण आहे. वर्तमानकाळातली दृश्यं मात्र अधिक स्पष्ट, तपशीलवार आहेत. जणू Takahata आपल्याला सांगत असावेत की आठवणी म्हणजे भूतकाळाची तंतोतंत नोंद नसते. काही चेहरे, काही आवाज, काही रंग आणि त्या सगळ्यांभोवती आपण वर्षानुवर्षं जपलेल्या भावना, एवढंच त्यांचं स्वरूप असतं.
मला विशेष आवडतं ते म्हणजे हा चित्रपट भूतकाळात अडकून राहत नाही. Taeko तिच्या आठवणींना भेटते, पण तिला जगायचं आहे ते वर्तमानातच. आपलं बालपण कसं होतं, याचा विचार करताना आपल्या उरलेल्या आयुष्याचं काय करायचं, हाही प्रश्न तिच्यासमोर उभा राहतो.
इथे Only Yesterday साध्या nostalgia च्या पलीकडे जातो.
आपण बालपण आठवतो, तेव्हा अनेकदा त्या काळात परत जावंसं वाटतं. पण खरोखर परत जायचं असतं का? त्या वयातली असुरक्षितता, भीती, अपमान, बंधनं हेही तर त्या आठवणींचाच भाग असतात. कदाचित आपल्याला परत जायचं नसतं. आपल्याला फक्त त्या लहान मुलाला एकदा भेटायचं असतं. त्याचं काय झालं, हे त्याला सांगायचं असतं. त्याला जेव्हा आपलं आयुष्य संपल्यासारखं वाटलं होतं, तेव्हा खरं तर कितीतरी गोष्टी अजून घडायच्या बाकी होत्या, हे सांगायचं असतं.
आणि कदाचित त्यालाही आपल्याला काही विचारायचं असेल.
तुला जे करायचं होतं, ते तू केलंस का? तुला अजून चित्रं काढायला आवडतात का? तू अजून मनापासून हसतोस का? तू मोठा होऊन आनंदी आहेस का?
या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असतीलच असं नाही.
मला वाटतं, Only Yesterday हा चित्रपट आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पुन्हा पाहायला हवा. दहा वर्षांच्या मुलाला त्यात त्याचं आजचं जग दिसेल. किशोरवयीन मुलाला स्वतःचं भविष्य आणि त्याबद्दलची अनिश्चितता दिसेल. तर चाळिशीतल्या आईवडिलांना स्वतःचा भूतकाळ, वर्तमान आणि आपल्या मुलांच्या आठवणींमध्ये आपण कसे राहणार आहोत, हा प्रश्न दिसेल.
आणि विशेष म्हणजे यापैकी कुणाचंही चित्रपटाचं आकलन चुकीचं नसेल. प्रत्येकाला त्याच्या वयाइतकाच चित्रपट दिसेल.
Only Yesterday हे नावही मला फार आवडतं. कालच तर घडलेलं सगळं, असं त्यातून काहीसं सुचतं. तीस-चाळीस वर्षं उलटून गेली असली तरी काही आठवणींना काळ स्पर्श करू शकत नाही. एखादी दुपार, कुणाचं हसणं, कुणाचा राग, एखादा अपमान, पहिलं प्रेम. डोळे मिटले की सगळं कालच घडल्यासारखं समोर उभं राहतं.
चित्रपट संपल्यानंतर मला Taeko पेक्षा माझ्याच बालपणाची जास्त आठवण येते. आणि त्याच वेळी असंही वाटतं की, आज माझ्या मुलाच्या आयुष्यात घडणाऱ्या कितीतरी साध्या घटना उद्या त्याच्या अशाच आठवणी बनणार आहेत. त्यातल्या काही आठवणींमध्ये मी असेन, काहींमध्ये नसेन. आणि जिथे असेन, तिथे त्याला मी कसा आठवेन, याची निवड पूर्णपणे माझ्या हातातही नाही.
कदाचित म्हणूनच हा चित्रपट मला इतर अनेक Ghibli चित्रपटांपेक्षा वेगळा वाटतो.
बाकीचे काही चित्रपट पाहताना मला पुन्हा लहान व्हावंसं वाटतं.
Only Yesterday पाहताना मात्र, मी खरोखर कधी मोठा झालो, हा प्रश्न पडतो.
---
मला भावलेले काही वैश्विक चित्रपट | भाग १
— विश्वेश


