१३-१४ वर्ष जुनी पोस्ट आहे, आता माझ्या मुलाला मिसरूड फुटले आहे पण लढाई अजून सुरूच आहे ....
रोज सकाळी ५:३० ला उठणारा मी काल रात्री झोपताना ६ चा गजर लावला. रात्रीतून २-३ वेळा उठून तो चेक केला.
बर ५:२५ ला जाग आली मग नेहमी प्रमाणे अजून ५ मिनिटे झोपू असे वाटत असूनही झोपलो नाही !
पटापट स्वतःचे सगळे आवरून घेतले,
मग मी युवराजांना उठवायला त्यांच्या शामियान्यात गेलो ! त्यांच्या आवडते गाणे म्हणून त्यांना हलकेच उठवले (उगाच मूड जायला नको म्हणून) सौभाग्यवती देखील लवकर उठून डबा, पाण्याची बाटली, दप्तर इत्यादी शत्रांची धार काढत बसल्या होत्या ! मग धावपळ, युवराजांचे आवरणे, त्यांचा नवीन पोशाख, नवीन जोडे, नवीन शस्त्रे हे सगळे चालू झाले !
"त्याच्या त्या २ पुस्तकांना कव्हर घातले का ?" आतून एक आवाज आला !
"बापरे" मग विलक्षण चपळाईने कात्री कागद, डिंक हातात घेतून ते काम हातावेगळे केले !
त्यांचे ते खाणे ! ते नवीन पोशाखावर सांडू नये म्हणून चालू असणारी आईसाहेबांची धडपड, हे संपता संपता झाली कि हो वेळ ! आजोबांनी घोडा सजवून, तेल पाणी करून आधीच दावणीतून सोडून पुढच्या दाराला लावला होता ! (Activa)
शेवटी निघाले युवराज नवीन लढाईला, नवे वर्ष, नवे मित्र, नवा दम, नवा जोश ! उगचच bakground ला मला तुतारीचे आवाज ऐकू येत होते !
अभूतपूर्व अशी शाळेच्या पहिल्या दिवसाची लढाई संपली अन आम्ही नवरा बायकोने चहाच्या गार झालेल्या कपाने एकमेकांना लांबूनच चीअर्स केले !
तेव्हा हातांकडे लक्ष गेले अन युवराजांच्या नवीन पुस्तकांना कव्हर घालतांना चिकटलेल्या डिंकाच्या अर्धवट काढलेल्या सालपटांनी हात भरला होता !
उगाचच त्या युद्धातल्या जखमा म्हणून मिरववाश्या वाटल्या !
मग, तुमच्या कडची पानपताची लढाई संपली कि नाही ?
चिअर्स
विश्वेश
Lovely 😍