फोटो प्रेम ...
काही घरे विकली जात नाहीत, ती हळूहळू आपल्या हातातून निसटत जातात. कागदांवर स्वाक्षऱ्या एका दिवसात होतात, पण घरातून बाहेर पडण्याची प्रक्रिया अनेक दिवस चालते. एखाद्या कपाटाचा शेवटचा खण उघडताना, स्वयंपाकघरातल्या रिकाम्या डब्याचा आवाज ऐकताना, पडद्यांच्या कडांवर वर्षानुवर्षे साचलेल्या धुळीकडे पाहताना, किंवा भिंतीवराच्या त्या फिकट झालेल्या चौकोनी जागेकडे नजर गेली की आठवते तिथे कधीकाळी एखादे घड्याळ किंवा फोटो लटकत असेल. तेव्हा लक्षात येते की आपण घर आवरत नसतो, आपण जुन्या काळाचा गुंडा (तो लोकरीचा असतो ना तसा) सावकाश सोडवत असतो, आणि त्या गुंडाळीतून अधूनमधून आपलेच एखादे विसरलेले वय बाहेर येऊन आपल्या शेजारी शांतपणे बसते.
बाबा यावर्षी मार्चमध्ये गेले. आईला जाऊन चार वर्षे होतील. त्यांच्या दोघांच्या अनुपस्थितीने घरात निर्माण झालेली शांतता मनाला बोचत होती. एरवी मला शांतता आवडते पण त्या घरात पाऊल टाकले की शांततेतही ऐकू येणारे माझ्या आई बाबांचे श्वास आता नव्हते. पण तरीही ते घर अजूनही रिकामे नव्हते. अजूनही एखाद्या खोलीत शिरताना क्षणभर वाटते की बाबा वर्तमानपत्राची घडी घालत असतील, आई स्वयंपाकघरातून एखादी हाक मारेल, किंवा दुपारच्या प्रकाशात गॅलेरीतल्या खुर्चीवर कोणीतरी बसलेले असेल. पण घरेही हळूहळू वास्तव शिकवतात. एका क्षणी तुम्ही चावी फिरवता आणि जाणवते की आता या घराने तुमच्यासाठी वाट पाहणे सोडून दिले आहे.
घराची आवराआवरी करताना सापडले ते काही फोटो. फार मोठा शोध लागल्यासारखा क्षण नव्हता तो. एका कपाटात अल्बम, दुसऱ्या खणात काही लिफाफे, वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या काही फ्रेम्स, पुस्तकांच्या मध्ये विसरलेली छायाचित्रे, देव्हाऱ्याच्या जवळ ठेवलेली दोन-चार छोटी चित्रे. प्रत्येक फोटो वेगळ्या ठिकाणी होता, पण त्या सगळ्यांचा पत्ता एकच होता “घर”. आणि घर म्हणजे शेवटी काय असतं, तर अशा विखुरलेल्या आठवणींना एकमेकांच्या जवळ राहू देण्यासाठी माणसांनी केलेली एक साधी व्यवस्था.
सगळ्यात जास्त फोटो अर्थातच माझ्या मुलाचे होते. त्याच्या लहानपणाचे. पहिल्या वाढदिवसापासून शाळेच्या पहिल्या दिवसापर्यंत, एखाद्या छोट्याशा बक्षिसापासून, ते त्याच्या मामाच्या लग्नात घातलेल्या शेरवानीपर्यंत, आजीच्या जवळ झोपलेल्या समाधानी चेहऱ्यापासून आजोबांच्या खांद्यावर बसून जगाकडे पाहणाऱ्या त्या निरागस नजरेपर्यंत. ते फोटो पाहताना मला एक गोष्ट जाणवली, मी वडील म्हणून त्याच्या बालपणात जगत होतो, पण माझे आई-वडील त्याच बालपणाकडे जणू एखाद्या ऋतूसारखे पाहत होते. ऋतू संपतो हे त्यांना माहीत होते, म्हणून त्यांनी त्याची प्रत्येक सकाळ, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक हसू, प्रत्येक क्षुल्लक क्षण शक्य इतका जपून ठेवला होता का?
बहुतेक आई-वडिलांना वेळेच्या वेगाची जाणीव नातवंडांमुळे अधिक होत असावी. मुलगा मोठा होताना त्यांना स्वतःचे वय दिसत असते. नातू धावताना त्यांना स्वतःचा संधीकाल दिसत असतो. म्हणून कदाचित ते फोटो काढत नाहीत, ते वेळेला थोडा वेळ थांबवण्याचा एक निष्पाप प्रयत्न करत असतात. त्यांना माहीत असते की काळ थांबणार नाही, पण त्याचा हात दोन क्षण धरून ठेवण्यातही एक विलक्षण समाधान असते.
आणि मग लक्षात आले की या फोटोंमध्ये फक्त माझा मुलगा नाही. तर कित्येक फोटोच्या कडेला आई उभी आहे. बाबांची नजर आहे. त्यांनी निवडलेली फ्रेम आहे. त्यांनी धूळ पुसलेला काच आहे. त्यांनी पाहुण्यांना दाखवताना चेहऱ्यावर आलेला अभिमान आहे. आपण ज्याला फोटो म्हणतो, तो खरं तर त्या फोटोभोवती अनेक वर्षे जमा होत गेलेल्या नजरा, स्पर्श, संवाद आणि शांततेचा एक अदृश्य थर असतो. फोटो कागदावर छापला जातो, आठवण मात्र माणसांच्या हाताळण्यात तयार होत जाते.
आज आपण हजारो फोटो मोबाईलमध्ये ठेवतो. त्यांची संख्या एवढी असते की एखाद्या दिवसाची आठवण शोधताना आपण इतके हरवून जातो कि नक्की काय शोधतो आहे तेच विसरतो. क्लाऊडमध्ये सगळे सुरक्षित असते, पण सुरक्षित असणे आणि जपले जाणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जुन्या फोटोच्या मागे लिहिलेली तारीख, एखाद्या कोपऱ्यावर पडलेली घडी, रंग उडालेली किनार, पावसाच्या ओलाव्याने थोडेसे वाकलेले कागद, या सगळ्या गोष्टी या फक्त त्या फोटोचा भाग नसतात तर त्या त्याने जगलेल्या आयुष्याच्या खुणा असतात. जसा एखाद्या वृद्धाच्या चेहऱ्यावरची सुरकुती हा दोष नसतो, तसाच जुन्या छायाचित्रावरचा काळ हा त्या फोटोचा अपमान नसतो किंवा त्याचा दर्जा खालावत नसतो तर ती त्याची कमावलेली प्रतिष्ठा असते.
घर शेवटी विकले गेले. किल्ल्या दुसऱ्या हातात गेल्या. भिंतींना नवीन रंग येईल. खिडक्यांमधून वेगळे आवाज येतील. त्या घराला आता दुसऱ्या कुणाच्या आठवणी मिळतील. हे सगळे स्वीकारताना आश्चर्य वाटले की दुःख घर सोडण्यात नव्हते. दुःख एवढेच होते की त्या भिंतींनी इतकी वर्षे जपलेली शांतता आता दुसऱ्याच्या भाषेत बोलू लागेल. आणि तरीही, कदाचित हेच घरांचे भाग्य असावे. माणसांप्रमाणेच घरेही एका आयुष्यापुरती नसतात, ती आठवणींचे रिले शर्यतीतले पुढचे धावपटू शोधत राहतात.
ते फोटो आता माझ्या घरी आले आहेत. काही पुन्हा फ्रेममध्ये जातील, काही अल्बममध्ये राहतील, काही कदाचित पुन्हा अनेक वर्षांनी एखाद्या कपाटाच्या मागे सापडतील. तेव्हा माझ्यानंतर कुणीतरी हेच प्रश्न विचारेल “हा फोटो इतका जपून का ठेवला असेल?” आणि कदाचित त्यालाही उत्तर फोटोमध्ये सापडणार नाही, ते उत्तर फोटो जपणाऱ्या माणसांच्या प्रेमात सापडेल.
कारण छायाचित्रे माणसांना परत आणत नाहीत. ती काळालाही थांबवत नाहीत. पण ती आपल्याला एक विलक्षण गोष्ट शिकवतात, की प्रेमाचे सर्वात टिकाऊ रूप स्मरण नसते, तर जपणे असते. आणि ज्या दिवशी एखादे घर रिकामे करताना तुम्हाला जुन्या छायाचित्रांचा एखादा गठ्ठा सापडतो, त्या दिवशी प्रत्यक्षात तुम्ही कागद उचलत नसता तर अनेक वर्षांपूर्वी कुणीतरी आपल्या हातांनी काळाच्या प्रवाहातून वाचवून ठेवलेले काही क्षण पुन्हा एकदा हलकेच हातात घेत असता... आणि त्या क्षणी जाणवते की माणसे निघून जातात, घरेही दुसऱ्यांची होतात, पण जपून ठेवलेले प्रेम मात्र कुठेच जात नाही, ते फक्त आपला पत्ता बदलत राहते.
— विश्वेश


