चित्र-कूट - ए सेपरेशन - २०११
भाषा - इराणी
निर्माता / लेखक / दिग्दर्शक - असघर फ़रहादी
कुठे पाहू शकता - ऍमेझॉन प्राईम
आधुनिक इराणी सिनेमा त्याच्या अस्तित्वाला विरोध करणारे वातावरण प्रतिबिंबित करतो. गेल्या काही वर्षात त्या प्रवाहाची शिखरे दिसली: दोन इराणी सिनेमांचे प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेले प्रीमियर जगभरतील सिनेमाप्रेमींना लक्षात राहील, मोहम्मद रसौलोफचे “गुड बाय” आणि जाफर पनाहीचे “धिस इस नॉट अ फिल्म” हे चित्रपट मुक्त विचारसरणीच्या इराणी लोकांवर त्यांच्या समाजाने केलेल्या अत्याचारांविषयी तक्रार करतात आणि त्यातून मार्ग शोधतांना दिसतात. इराण एक आधुनिक राष्ट्र जे इस्लामिक कायद्यानुसार जगण्याचा प्रयत्न करते. चित्रपटाच्या कथेचा इस्लामशी कोणताही वाद नाही, परंतु अश्या धार्मिक कायद्याच्या नियमांचा वापर माणुसकीचा ह्रास करू शकते हे तो दाखवतो. माझ्या वकील मित्राने मला एकदा कायद्याची सोपी व्याख्या सांगितली होती - कायदे हे काल्पनिक परिस्थिती उद्भवण्यापूर्वी त्यांचे नियमन करण्याचा प्रयत्न आहेत. पण जर कायदे नियमांच्या ऐवजी तत्त्वांनी बनलेले असतील तर? ते मानवी स्वभावाशी अधिक योग्य असतील? असे आपल्याला हा चित्रपट पाहून सतत वाटत राहते.
सगर फरहादीचा “ए सेपरेशन” हा असाच एक आधुनिक इराणी चित्रपट. जगभरातील जवळजवळ सगळ्याच फिल्म फेस्टिवल मध्ये गौरवलेला असा हा सुप्रसिद्ध इराणी चित्रपट. हा चित्रपट एका मध्यमवर्गीय इराणी कुटुंबाचा संघर्ष दाखवतो. हे एक पुरोगामी मध्यमवर्गीय कुटुंब आहे. लग्नाच्या १४ वर्षानंतर सिमिन (लीला हातमी) आणि नादीर (पेमन मोआदी), त्यांची हुशार, संवेदनशील ११ वर्षांची मुलगी तेर्मेह (सरिना फरहादी) आणि अल्झायमरने ग्रस्त असलेल्या आणि सतत काळजी करणाऱ्या नादेरच्या वृद्ध वडिलांसोबत (अली-असगर शाहबाजी) एका फ्लॅटमध्ये राहतात. दोघेही नवरा बायको नोकरी करतात आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत, त्यांनी त्यांच्या छोट्याश्या फ्लॅटमध्ये तिच्या शाळेतील एका शिक्षिकेची वैयक्तिक शिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे जेणेकरून तिला महत्त्वाच्या परीक्षांसाठी अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाईल. पण आता सिमिनला इराण सोडून अशा देशात जायचे आहे जेथे सामान्यतः महिलांसाठी आणि विशेषतः तिच्या मुलीसाठी अधिक संधी आहेत; अधिक स्वातंत्र्य आहे. नादीर म्हणतो की वडील असे पर्यंत हे शक्यच नाही. वडिलांची काळजी घेण्यासाठी त्यांना इराणमध्ये राहावे लागेल. या कारणामुळे सिमिन घर सोडून निघून जाते. जाताना रझिया नामक मोलकरणीला घरकाम आणि सासऱ्यांची काळजी घेण्यासाठी ती कामावर ठेऊन घेते.
पहिल्याच दिवशी रझिया कामावर येते आणि पाहते कि आजोबांनी कपडे खराब केले आहेत आणि ते बदलावे लागतील, परपुरुषाचे कपडे बदलावे लागतील असे तिला अजिबात वाटले नव्हते, तिच्या मते ते तिच्या धर्मात पाप होते. तिची तळमळ, कुचंबणा, ओढाताण दिग्दर्शकाने फार प्रभावी पद्धतीने मांडली आहे. रझिया रोज तिच्या छोट्या मुलीला घेऊन नादीरच्या घरी येत असते (फारच अप्रतिम काम केले आहे ह्या छोटीने) आणि ती गर्भवती देखील असते. घरच्या आर्थिक ओढाताणीमुळे आणि कर्जामुळे तिला हे काम नाईलाजानेच करावे लागत असते.
पुढे रझिया, नादीर, आजोबा यांच्याबरोबर एक विचित्र घटना घडते त्यात नादीरचे आणि रझियाचे कुटुंब त्यात फरफटले जाते. घरात अश्या काही घटना घडतात कि ज्यामुळे तेर्मेह मनातून दुःखी होते आणि शेवटी आईबाबांच्या घटस्फोटाच्या निर्णायक दिवशी “मुली तुला आई कडे राहायचे कि बाबांकडे” हा प्रश्न ऐकून ती पुरती कोलमडते.
चांगले कलाकार या चित्रपटाचे सोने करतात, मोआदी आणि हातमी, पती-पत्नी या नात्याने, त्यांची पात्रे खऱ्या हेतूने वावरत आहेत हे आपल्याला पटवून देण्यात यशस्वी होतात, त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे पण तात्विक मतभेदही आहे, वेगळे राहायचे आहे पण काळजीहि आहे. रझिया ची मानसिक ओढाताण आणि तापट नवऱ्यासमोर होणारी तिची चलबिचल तिने कमालीची साकारली आहे. या सिनेमाची संपूर्ण हाताळणी अत्यंत वास्तववादी झाल्याने हा आपल्या अंगावर येतो आणि खूप खोलवर जाऊन स्वतःलाच अनेक प्रश्न विचारण्यास भाग पडतो.
तेर्मेह काय निर्णय घेते, रझियाचे काय होते? आणि नादीर आणि सिमिन घटस्फोट घेतात का? आजोबांचे काय होते? या सगळ्याच प्रशनांची उत्तरं आपल्याला चित्रपटात मिळतातच असे नाही पण ती मिळावीत असे शेवटी वाटतही नाही कारण दिग्दर्शकाने विचारलेले खरे प्रश्न वेगळेच आहेत ...
विश्वेश



छान लिहिला आहेस रिवयू
पहातो