गेल्या काही दिवसांत Instagram वर एक गोष्ट पुन्हा पुन्हा दिसत होती. स्वातंत्र्यदिन जवळ आला म्हणून असेल, अनेकजण आपापल्या मुलांचे, शाळांचे, कधी स्वतःचेही, राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणतानाचे reels टाकत होते. कुठे एखादं मूल अडखळत “India is my country” म्हणत होतं, कुठे मराठीत “भारत माझा देश आहे” ऐकू येत होतं, कुठे प्रतिज्ञेचा अर्थ पुन्हा आठवण्याचा प्रयत्न होता. Instagram वर National Pledge नावाखाली हजारो reels सापडतील आणि या ऑगस्टमध्ये प्रतिज्ञा म्हणण्याचे reels trending आहेत. नेहमीसारखं मीही एक reel पाहिलं, मग दुसरं, मग कुतूहल म्हणून पूर्ण प्रतिज्ञा शोधून वाचायला लागलो. अगदी nostalgic वाटू लागलं. मला ती प्रतिज्ञा अजूनही जवळजवळ पूर्ण पाठ होती. शब्द विसरलो नव्हतो. क्रमही फारसा विसरलो नव्हतो. पण मी ती जशी लहानपणी म्हणत होतो तशी आता वाचू शकत नव्हतो. कारण नकळत तिच्या प्रत्येक वाक्यानंतरच्या पूर्णविरामाच्या जागी माझ्या डोक्यात प्रश्नचिन्ह उभं राहत होतं.
भारत माझा देश आहे?
हे वाक्य शाळेत म्हणताना त्यात प्रश्न असू शकतो, अशी पुसटशी कल्पनाही नव्हती. शाळेच्या मैदानात प्रतिज्ञा म्हणजे विचार करण्यासाठी दिलेला मजकूर नव्हता. ती एक कृती होती. प्रार्थनेनंतर प्रतिज्ञा, प्रतिज्ञेनंतर सूचना, मग वर्ग. हात मागे, दोन पायांत ठरावीक अंतर, पुढच्या मुलाच्या डोक्यावरून कुठेतरी पाहत आपण म्हणायचो, “भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.” आवाजाला एक ठरवून दिलेली लय होती. त्यात पूर्णविराम होता आणि मनात काहीच विचार नव्हता. त्या वयात “देश” हा विचार नव्हता, तो एक जन्माबरोबर मिळालेला हक्क होता. जसं आपलं नाव, आपले आईवडील, आपलं घर. मला लहानपणी वाटायचं प्रत्येकाला त्याच्या जन्माबरोबर हे सगळं आपोआप मिळतच. आपण त्यांना निवडलेलं नसतं आणि म्हणूनच कदाचित त्यांच्यावर प्रेम का करतो याचं स्पष्टीकरणही द्यावं लागत नाही. देश माझा आहे, कारण तो आहे. एवढंच.
आता “भारत माझा देश आहे” वाचताना “भारत” किंवा “देश” यापेक्षा मी “माझा” या शब्दाशी अडखळतो. माझा म्हणजे काय? माझ्या मालकीचा नव्हे, हे उघड आहे. मग माझा म्हणजे ज्याच्याशी माझं नातं आहे असा? ज्याच्या यशामुळे मला आनंद होतो, ज्याच्या अपयशाने वाईट वाटतं, ज्याच्या इतिहासातल्या काही गोष्टींचा मला अभिमान वाटतो आणि काही गोष्टींची लाजही वाटते, असा? आपल्या घराला आपण “माझं घर” म्हणतो तेव्हा त्याच्या भिंतींना तडे गेले तर तो काही घराचा अपमान नसतो. मग देश “माझा” म्हणण्याचा अर्थही कदाचित असाच असावा. त्याच्याबद्दल फक्त अभिमान बाळगण्याचा नव्हे, तर त्याच्याबद्दल अस्वस्थ होण्याचाही अधिकार.
मग पुढचं वाक्य येतं.
सारे भारतीय माझे बांधव आहेत?
शाळेतल्या प्रतिज्ञेतला “सारे” हा शब्द तेव्हा किती सहज वाटायचा. आज तोच शब्द पूर्ण प्रतिज्ञेपेक्षा मोठा वाटतो. सारे म्हणजे खरोखरच सारे? माझ्यासारखे दिसणारे नव्हे, माझ्यासारखी भाषा बोलणारे नव्हे, माझ्यासारखं खाणारे नव्हे, माझ्या देवावर विश्वास ठेवणारे नव्हे, माझ्यासारखं मतदान करणारेही नव्हे. सारे. ज्यांच्या नावावरून मी त्यांच्याबद्दल काहीतरी गृहीत धरतो तेही. ज्यांची राजकीय मताने माझं डोकं फिरतं तेही. ज्यांची जात मला माहीत नाही तेही आणि माहीत झाल्यावर माझ्या वागण्यात काहीतरी बदलत असेल तर तेही. ज्यांचं दुःख माझ्या timeline वर येत नाही तेही. ज्यांच्याकडे माझ्यासारखी आर्थिक सुरक्षितता नाही तेही. ज्यांना माझ्याबद्दल कदाचित अजिबात प्रेम नाही तेही.
त्या वाक्यावर अविश्वास आहे म्हणून हे प्रश्नचिन्ह नाही. उलट ते वाक्य इतकं मोठं आहे की मी त्याच्या लायकीचा आहे की नाही, हा प्रश्न पडतो म्हणून. आपण सहज “सारे भारतीय माझे बांधव आहेत” म्हणतो, पण आपल्या रोजच्या वागण्यात आपण किती छोट्या छोट्या गटांत विभागलेलो असतो. आपले लोक, त्यांचे लोक. आपल्या बाजूचे, त्यांच्या बाजूचे. सुशिक्षित, अशिक्षित. शहरी, ग्रामीण. पुरोगामी, प्रतिगामी. देशभक्त, देशद्रोही. आपल्याला लेबल्स फार आवडतात, कारण लेबल लावल्यानंतर त्या माणसाला समजून घेण्याची जबाबदारी संपते. आणि अशा वेळी प्रतिज्ञेतला “सारे” हा शब्द आपल्या समोर फार शांतपणे उभा राहतो. काही बोलत नाही. फक्त विचारतो, सारे?
माझ्या देशावर माझे प्रेम आहे?
हा प्रश्न तर आणखी अवघड आहे, कारण प्रेम या शब्दाला आपण देशाच्या संदर्भात फार विचित्र बनवलं आहे. प्रेम सिद्ध करावं लागतं असं आपल्याला वाटू लागलं आहे. घोषणा करून, ध्वज लावून, चित्रपटाआधी लावलेल्या राष्ट्रगीताला उभे राहून, कुणाचा निषेध करून, कुणाचं समर्थन करून, कुणावर रागावून. पण माझ्या आयुष्यात ज्या माणसांवर मी सर्वाधिक प्रेम केलं, त्यांच्याबद्दल मी सर्वाधिक काळजी केली, सर्वाधिक प्रश्न विचारले, सर्वाधिक भांडलोही.ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबद्दल आपण अस्वस्थ होतो. म्हणून आज “माझ्या देशावर माझे प्रेम आहे?” या प्रश्नचिन्हात मला देशावरील प्रेम कमी झाल्याचं चिन्ह दिसत नाही. उलट ते प्रेम बालपणातल्या निरागस प्रेमापासून प्रौढ नात्याकडे गेल्याचं चिन्ह वाटतं. लहान मुलाला त्याचे वडील superhero वाटतात. मोठं झाल्यावर त्याला वडिलांच्या मर्यादा दिसतात, चुका दिसतात, दुर्बलता दिसते. त्यामुळे प्रेम संपत नाही. फक्त देवत्व संपतं आणि माणूस दिसायला लागतो. देशाच्या बाबतीतही कदाचित हेच होत असावं. देश महान आहे या वाक्यापासून, हा देश माझा आहे म्हणून तो अधिक न्याय्य, अधिक उदार, अधिक सुरक्षित, अधिक माणुसकीचा व्हावा असं मला वाटतं, इथपर्यंतचा प्रवास म्हणजेच मोठं होणं नाही का?
मग प्रतिज्ञा म्हणते, “माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.”
पुन्हा प्रश्नचिन्ह.
अभिमान आहे?
हो, आहे. पण अभिमान म्हणजे वारशात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीला पवित्र मानणं का? संस्कृतीबद्दल आपण कधी कधी अशी विचित्र अपेक्षा करतो की जुनी गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट. प्रतिज्ञेत “समृद्ध” आणि “विविध” हे दोन शब्द एकत्र येतात, आणि आज मला त्यातला “विविध” हा शब्द जास्त महत्त्वाचा वाटतो. विविधता म्हणजे food festival मधली वेगवेगळी ताटं, tourismच्या जाहिरातीतले वेगवेगळे पोशाख आणि Republic Day parade मधले चित्ररथ एवढीच असेल तर ती फार सोपी विविधता झाली. खरी विविधता म्हणजे माझ्यापेक्षा वेगळ्या माणसाला माझ्याइतकंच भारतीय असण्याचा अधिकार आहे, हे मनापासून मान्य करणं. विविधता पाहायला सुंदर असते, पण जगायला फार कठीण असते.
आणखी पुढे एक वाक्य आहे ज्याकडे शाळेत मी कधी लक्षच दिलं नाही.
“त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.”
एक लक्षात घ्या प्रतिज्ञा देशाने माझ्यासाठी काय करावं हे सांगत नाही. ती जवळजवळ प्रत्येक ठिकाणी मला माझ्याकडे परत पाठवते. पात्रता माझ्या अंगी यावी. आपल्या देशाचा अभिमान वाटायला पात्रता लागते का? कदाचित लागते. फक्त इतिहासातील महान व्यक्तींची नावं माहीत असण्याची नव्हे, तर त्यांनी ज्या मूल्यांसाठी संघर्ष केला त्यांच्याशी आपलं रोजचं वर्तन कितपत प्रामाणिक राहिलं आहे, याची पात्रता. एखाद्या वैज्ञानिकाचा अभिमान बाळगणं सोपं आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणं कठीण. संतांचा अभिमान सोपा, त्यांनी सांगितलेल्या समतेचा आग्रह कठीण. बुद्धाचा अभिमान सोपा, करुणा कठीण. महात्मा गांधींजीं चा फोटो सोपा, सत्याशी प्रामाणिक राहणं कठीण. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सही कारच्या मागच्या काचेवर रेडियम ने लावणं सोपं, त्यांनी सांगितलेली बंधुता जगणं कठीण. वारशाचा अभिमान नेहमीच वारशाची जबाबदारी घेऊन येत नाही, आणि कदाचित म्हणूनच “पात्रता” हा शब्द इतका अस्वस्थ करतो.
आणि मग एक जवळजवळ विसरलेलं, आजच्या सार्वजनिक संभाषणात तर फारच विसरलेलं वाक्य.
“आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.”
प्रत्येकाशी?
हे वाक्य आज सोशल मीडियावर पोस्ट केलं तर ते सर्वांत radical वाक्य ठरेल असं कधीकधी वाटतं. कारण आपण मतभेद व्यक्त करण्याची कला जवळजवळ विसरलो आहोत. असहमती म्हणजे शत्रुत्व, टीका म्हणजे द्वेष, प्रश्न म्हणजे अपमान, विरोध म्हणजे देशद्रोह, समर्थन म्हणजे अंधभक्ती, अशी शब्दांची सोपी विभागणी आपल्याला सोयीची वाटते. पण प्रतिज्ञा मला “माझ्याशी सहमत असणाऱ्याशी सौजन्याने वागेन” असं म्हणत नाही. ती म्हणते प्रत्येकाशी. हा शब्द पुन्हा तोच “सारे” घेऊन येतो. ज्याचा तिरस्कार करावासा वाटतो त्याच्याशीही माणूस म्हणून वागण्याची शिस्त. हा प्रत्यक्षात राष्ट्रवादापेक्षा कितीतरी कठीण नागरिकधर्म आहे.
मग येते निष्ठा.
“माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.”
देशाशी निष्ठा म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न मोठेपणीच पडू शकतो. लहानपणी देश, सरकार, सत्ता, संस्था, समाज, इतिहास, संस्कृती हे सगळं एकच मोठं धूसर चित्र असतं. मोठं झाल्यावर त्यांच्यातले फरक दिसायला लागतात. सरकारं बदलतात. पक्ष बदलतात. नेते येतात आणि जातात. मतं बदलतात. आपण स्वतःही बदलतो. देश मात्र या सगळ्यापेक्षा मोठा असतो. आणि म्हणूनच देशाशी निष्ठा कधी कधी सत्तेला प्रश्न विचारण्यात असू शकते, कधी बहुमताशी असहमत होण्यात, कधी एखाद्या अल्पसंख्याकाच्या हक्कासाठी बोलण्यात, तर कधी आपल्या आवडत्या विचारसरणीची चूक मान्य करण्यात. निष्ठेची खरी परीक्षा आपल्या विरोधकांच्या चुका दाखवताना नसते. आपल्या लोकांच्या चुका दिसल्यावर आपण काय करतो, तिथे असते.
पण मला प्रतिज्ञेतला सर्वांत सुंदर आणि सर्वांत अशक्य वाटणारा भाग शेवटचा आहे.
“त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.”
हे वाक्य आपण खरंच मानतो का?
कारण हे वाक्य जर खरं मानलं तर देशभक्तीचा अर्थच पूर्ण बदलतो. मग देशभक्ती ही सीमा, ध्वज, राष्ट्रगीत, सैन्य, घोषवाक्यं यापुरती राहत नाही. ती माझ्या आजूबाजूच्या माणसांच्या आयुष्यात शिरते. त्याचं मूल शिकतं का, त्याला नीट उपचार मिळतात का, त्याच्यावर अन्याय होत नाही ना, त्याला आपल्या श्रद्धेसह जगता येतं का, त्याची भाषा टिकते का, त्याला सन्मानाने काम करता येतं का, याचा संबंध माझ्या सौख्याशी जोडला जातो. “त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य” हे वाक्य अक्षरशः घेतलं तर ते कदाचित प्रतिज्ञेतलं सर्वांत मोठं नागरिकत्वाचं विधान आहे.
आणि म्हणून Instagram वर ती प्रतिज्ञा पुन्हा ऐकताना मला माझ्या शाळेचं मैदान आठवलं. सकाळचं ऊन, पुढे उभे शिक्षक, ओळीने उभी मुलं, मागे बांधलेले हात, आणि शेकडो लहान आवाज एकाच लयीत ते शब्द म्हणत आहेत. त्यात माझाही एक आवाज आहे. त्या मुलाला त्या वाक्यांचे अर्थ माहीत नव्हते, पण त्याला त्यांच्यावर शंकाही नव्हती. आज त्यालाच (म्हणजे मला) त्यांचे अर्थ थोडे अधिक कळतात कदाचित, आणि म्हणून त्यांच्याबद्दल अधिक प्रश्न पडतात.
कदाचित हेच वयानं मोठं होणं असावं.
काही वर्षांपूर्वी मी प्रतिज्ञा पूर्णविरामांनी एका लयीत म्हणत होतो कारण मला प्रश्न पडत नव्हते. आज मी ती प्रश्नचिन्हांनी वाचतो कारण मला त्या वाक्यांवर विश्वास ठेवायचा आहे.
दोन्ही गोष्टींमध्ये फार मोठा फरक आहे.
प्रश्नचिन्ह हे नेहमीच नकाराचं चिन्ह नसतं. काही वेळा ते एखाद्या वाक्याला आपण किती गंभीरपणे घेतो की याची परीक्षा घेणारे असते. “सारे भारतीय माझे बांधव आहेत?” हा प्रश्न विचारणं म्हणजे ते बांधव नाहीत असं म्हणणं नाही. उलट माझ्या वागण्यात ते खरंच बांधव आहेत का, हे तपासणं आहे. “माझ्या देशावर माझे प्रेम आहे?” हा प्रश्न प्रेम नाकारत नाही. तो प्रेमाची व्याख्या विचारतो.
आणि बहुधा हेच मला इतक्या वर्षांनी त्या प्रतिज्ञेकडे परत घेऊन आलं.
देशाला प्रश्न विचारण्याआधी प्रतिज्ञा आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारायला लावते.
आज इतक्या वर्षांनी
ती प्रतिज्ञा पुन्हा म्हणतो आहे.
पण आता
शाळेच्या मैदानात नाही.
समोर शिक्षक नाहीत.
सरळ रांग नाही.
हातही मागे बांधलेले नाहीत.
आणि आता प्रत्येक वाक्याच्या शेवटी
एक प्रश्नचिन्ह उभं आहे.
भारत माझा देश आहे?
सारे भारतीय माझे बांधव आहेत?
माझ्या देशावर माझे प्रेम आहे?
त्याच्या विविधतेचा मला अभिमान आहे?
मी प्रत्येकाशी सौजन्याने वागतो?
मी देशाशी निष्ठावान आहे?
त्यांच्या कल्याणात
खरोखर माझं सौख्य आहे?
कदाचित प्रतिज्ञा पाठ असणं
आणि प्रतिज्ञा पाळणं
यांच्यामधलं अंतर
एवढ्याच प्रश्नचिन्हांचं असतं.
आणि कदाचित देशावर प्रेम करणं म्हणजे त्या प्रश्नचिन्हांना पुसून टाकणं नव्हे. त्यांना विचारत राहणं. स्वतःला, एकमेकांना, सत्तेला, इतिहासाला आणि देशालाही. कारण प्रश्न विचारल्याने देश आपला राहायचा थांबत नाही. उलट प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य, उत्तर शोधण्याची जबाबदारी आणि उत्तर चुकलं तर ते पुन्हा तपासण्याचा अधिकार, या सगळ्यांचं नावच कदाचित नागरिकत्व असावं.
आणि मग त्या पहिल्या वाक्याकडे मी पुन्हा येतो.
या वेळी प्रश्नचिन्ह हळूहळू बाजूला ठेवतो.
भारत माझा देश आहे.
म्हणूनच त्याला प्रश्न विचारण्याचा हक्कही माझा आहे.
आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या कृतीतून खरी करण्याची जबाबदारीही.
जय हिंद.
-- विश्वेश



पुर्णविराम पासुन ते प्रश्नचिन्हा पर्यंतचा प्रवास
छान!
Amazing post! Beautiful thoughts and lucid writing