पुस्तक परिचय: बाईच्या कविता आणि बाई बाई गोष्ट सांग - किरण येले
पुस्तकाचे नाव - “बाईच्या कविता” आणि “बाई बाई गोष्ट सांग”
लेखक / कवी - किरण येले
प्रकाशन - ग्रंथाली प्रकाशन
तुम्हांला सुरमई माहीत आहे का ?
बरोब्बर!
चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहीत नाही ?
पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल ?
अरे ! तुम्हाला तर सगळंच माहीत आहे;
तिची चमचमती त्वचा,
तिचं ताजेपण ओळखण्याची कला,
तिची महागलेली किंमत...
सगळंच.
आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही ;
तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते,
तिला एखाद्या पार्टीत सर्व्ह करताना कसं सजवावं ते,
किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते.
पण माफ करा,
तुम्हांला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे
असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे;
तुम्हांला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही,
तुम्हांला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही,
तुम्हांला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहीत नाही,
आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर
तुम्हांला नक्कीच माहीत नाही!
एक सांगतो, रागावू नका;
तुम्हांला खरं तर
सुरमईची फक्त चव माहीत आहे,
सुरमई नाही.
आणि जे सुरमईच्या बाबतीत
तेच-
अगदी तेच-
बाईच्याही
ही कविता जेव्हा मी पहिल्यांदा ऐकली / वाचली होती तेव्हा सुरमाईचा काटा अडकतो तसे घश्यात काहीतरी अडकल्यासारखे झाले, चांगलेच बोचले. किरण येले या माणसाने, एका पुरुषानं वेध घेतला आहे बाई मनाचा अन लिहिल्या आहेत “बाईच्या कविता”. यातली प्रत्येक कविता आपल्याला विचार करायला भाग पाडते की आपण खरंच आपल्या आजूबाजूला असलेल्या बायकांना (आई, बहीण, बायको, मैत्रीण, ऑफिसमधील सह कर्मचारी इ.) यांना खरंच ओळखतो? ओळखू शकतो? आपण म्हणतो वरवर की आम्ही स्त्रियांचा मान ठेवतो पण त्याचे मन? त्याचे काय? त्यात किती खळबळ असू शकते आणि त्यात काय काय चालू असते हे सगळे आपल्याला या कविता वाचतांना जाणवते. पुरुष म्हणून आपण आपल्या आयुष्यातल्या स्त्रियांना किती गृहीत धरतो हे कळते.
बाई
दिवेलागणीला
देवापुढे दिवा उजळते
हात जोडते आणि पुटपुटत
ओठातला अंधार पोटात घेते
या कवितांमध्ये काही मोठ्या कविता आहेत; काही अगदी लहान! पण सगळ्याच खूप आशयघन… प्रत्येकच कवितेतून! अनेक प्रसंगातून कवी त्या त्या घटनेतला गर्भित अर्थ, खराखुरा अर्थ चिमटीत पकडून आपल्यापुढे ठेवतो. मग तो लगोरीचा खेळ असो, बाईचं नोकरी करणं असो… ती शॉपिंग करते, रांगोळ्या काढते… का करते ती हे सारं? त्यातून तिला काय व्यक्त करायचं असतं? विशेष म्हणजे हा कविता संग्रह मी माझ्या आईला आणि बायकोला वाचायला दिला. दोघींनाही तो प्रचंड आवडला पण प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. आई म्हणाली “हे सगळं गृहीतच धरलं जातं, आमच्यावर तसे संस्कार केले जातात, हे असं मनातलं इतक्या सहजपणे व्यक्त होणं आम्हाला नाही जमणार, म्हणूनच हे शेवटी एका पुरुषालाच लिहावं लागलं” मी ते ऐकून खजील झालो. आपल्यापुढे, आपल्या नवऱ्यापुढं व्यक्त होता न येणं हे नक्की कुणाचं वैफल्य?
बाईचं नेहमीचं जगणं मांडतानाही, तिच्या व्यथा मांडतानाही किरण येले तिच्या नेहमीच्या आसपासच्या गोष्टीतून हे सगळं समोर आणतात. खालील ओळी याचा दाखला
हि माझ्या आईची आवडती कविता (रांगोळ्या ही कविताही आईला खूप आवडलेली, खाली दिलेल्या कवितेपेक्षा जास्त पण ती ३ पानी असल्याने इथे देत नाही, तुम्ही पुस्तक घेऊन वाचा):
बाई बनवते वेगवेगळे पदार्थ
मुलांच्या आवडीचे
सासू - सासर्यांच्या आवडीचे
नवर्याच्या आवडीचे
नवर्याच्या मित्रांच्या आवडीचे
पण तुम्ही बाईला
कधी दुसर्यांच्या आवडीचे
पदार्थ बनवत असतानाच्या वेळी पाहिलंय ?
तिची त्या वेळची
लगबग, हालचाल, उत्सुकता, काळजी...सगळंच ?
जाऊ द्या... नसेल पाहिलं
कारण, तुमच्या मते
बाईनं बनवलेली गोष्ट महत्त्वाची
ती बनवतानाची तिची स्थिती बिनमहत्त्वाची
असं असू शकेल
तर
बाई बनवते वेगवेगळे पदार्थ
मुलांच्या आवडीचे
सासू - सासर्यांच्या आवडीचे
नवर्याच्या आवडीचे
नवर्याच्या मित्रांच्या आवडीचे
पण बाईला कधी तुम्ही
तिच्या आवडीचा पदार्थ
बनवताना पाहिलंय ?
सांगायची गोष्ट अशी की
रांधणारी आणि वाढणारी
ती स्वतःच असली तरी जेवताना
बाईच्या ताटात नेहमी
दुसर्यांच्याच आवडीचे पदार्थ असतात.
ताटात आणि आयुष्यातही !
बायकोचं म्हणणं अगदी वेगळं, बाईला व्यक्त होण्याकरता पुरुषाची गरजच नाही. आम्ही सगळ्याच बाबतीत सेल्फ सफिशियंट व्हायला शिकलो आहोत आता. तिच्या आवडत्या दोन कविता:
बाई
अनुभवातून शिकते
कोणती गोष्ट
कशी आणि कितीवेळ
शिजवावी मुरवावी
किंवा
साठवून ठेवावी ते.
बाईनं कळत-नकळत अनुभवलेले कित्येक क्षण जर समजावून घ्यायचे असतील तर एका संवेदनशील पुरुषानं लिहिलेल्या “बाईच्या कविता” वाचायला हव्यात. त्या वाचून स्त्रियांना आत्मप्रत्ययाचा अनुभव येईल आणि पुरुषांनाही ईमरोज या कवीनं विचारलेल्या “आदमी औरत के साथ सोता है, जागता क्यों नहीं?” या प्रश्नाचं उत्तर शोधायला उद्युक्त करेल.
अनोळखी लिफ्टपुढे उभी
बाई एक नजर टाकते सहप्रवाशाकडे
अंदाज घेते अन आत शिरते
स्तब्ध उभी राहते दरवाजालगत ...
डॊक्यावरल्या पंख्याखाली
उडत राहतात तिचे केस
हालत राहतो तिच्या अंगावरील वस्त्राचा एखादा तुकडा
तिला जाणवत राहतात
लिफ्टमधल्या सगळ्या स्तब्ध हालचाली
पण ती विचलत होत नाही.
मग हवा असलेला मजला येताच
बाई
तिचं अंगाअंगाला फुटलेला आपला
एकेक सावध डोळा घडी घालून बंद करते
गायीनं त्वचा हलवून माश्या उडवाव्यात
तश्या शरीरावरच्या नजरा उडवते
आणि लिफ्टबाहेर पडते.
पंधरा वर्षानंतर बाईच्या कविताचा दुसरा भाग “बाई बाई गोष्ट सांग” प्रकाशित झाला. हा काव्यसंग्रह हाती पडताच अगदी अधाशासारखा वाचून काढला, शांत बसून विचार केला, अभिप्राय लिहावा का? जाणवलं की, अजून बऱ्याच गोष्टी समजून घ्यायला हव्यात आणि आणखीन दोनदा हा संग्रह वाचून काढला. हे वाचन चालू असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे पंधरा वर्षात बाई नावाच्या जगात फार बदल झालेत, ते समजणं उमजणं आणि उमजून आपल्या आत समजलेल्या बाईला कागदावर उतरवणं इतकी सोप्पी गोष्ट नव्हती आणि म्हणून कदाचित 15 वर्ष हा माणूस बाई नावाचा धडा गिरवत आपल्यात उतरवत राहिला. या काव्य संग्रहातल्या प्रत्येक कविता या अगदी साध्या रुपकातून अभिव्यक्त झालेल्या असल्या तरी बाई म्हणून तिच्या जगातल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आता याच ओळी बघा ना -
“निवांत आरशात पाहताना
तिला वाटत राहतं
ती काहीतरी विसरतेय
ती आठवू लागते
गॅस? दूध? मुले? बिले? नवरा? सासू सासरा? सटर फटर?
ती आठवत राहते, आठवत राहते आणि स्वतःसाठी जगणं विसरून जाते....”
तिचं नेहमीचं जगणं मांडतानाही, तिच्या व्यथा मांडतानाही किरण येले तिच्या नेहमीच्या आसपासच्या गोष्टीतून हे सगळं समोर आणतात. खालील ओळी याचा दाखला -
रांधणारी आणि वाढणारी
ती स्वतःच असली तरी
जेवणाच्या ताटात नेहमी
दुसऱ्याच्याच आवडीचे पदार्थ असतात..
ताटात आणि आयुष्यातही..
बाई आपलं दुःख लपवत असते, वेदना आपल्या देहाआड लपवून जगाला मात्र नेहमीच हसत सामोरं जात असते आणि एक दिवस ती मरते.. पण त्या वेदना, जखमा मात्र हिरव्या थेंबाने जळून आपलं अस्तित्व स्पष्ट करून जातात, या अर्थाला वाचकापुढे मांडणारी “छातीच्या आतले आणि मांड्यांच्या आतले” ही कविता अगदी भेदक आहे.
नदी आणि बाई यांच्यातलं साम्य स्पष्ट करताना कवी येले यांनी पुरुषांची बाई विषयी असलेली समज इतक्या सुंदर शब्दात मांडलीय की वाचताना व्वा! हे असे शब्द आपसूक बाहेर येतात. नदी ही कविता तुमच्या आतल्या पुरुषाला भिजवून टाकते. या संग्रहातल्या सगळ्याच कविता तुमच्या मनातला बाई नावाचा तळ ढवळून काढतात आणि बाई म्हणून तुमच्या आजूबाजूला असलेल्या जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन नक्कीच देतात.
ह्या पेक्षा जास्त मी लिहिणार नाही आपण सगळ्यांनी ही पुस्तके जरूर वाचावीत ही इच्छा.
-- विश्वेश



