दर सोमवारी
माझ्या उशाशी
एक दगड जन्मतो.
त्याच्या माथ्यावर
माझ्याच अक्षरांत
माझे Weekly Goals
कोरलेले असतात.
मी त्याला ढकलत
चढत राहतो.
माथ्यावर शेवट नाही,
हे ठाऊक असूनही.
माथ्यावर देवही नाही,
हे ठाऊक असूनही.
तिथे असतं फक्त
पुढच्या डोंगराचं
नियुक्तिपत्र.
संध्याकाळी
तोच दगड खाली येतो.
मी मात्र
थोडा थोडा
तिथेच उरत जातो.
पायथ्याशी,
माझ्या घरी,
माझ्या अनुपस्थितीचा
पगार जमा होतो.
आणि मुलं
त्या पैशांनाच
बाबा म्हणू लागतात.
— विश्वेश



आई ग.. खूप सुंदर !
अबब !! 🤕