लकडी पूल
काळाच्या दोन टोकांना जोडणारा दुवा
आज बऱ्याच दिवसांनी रिक्षात बसून तुळशीबागेतील श्रीकृष्ण भुवनमध्ये मिसळ खाण्याचा योग आला.
ऑफिसमधून थेट रिक्षाने प्रस्थान केले. नेहमीचा रस्ता, नेहमीची घाई, नेहमीची धावपळ. पण जसा लकडी पूल ओलांडला, तसं अचानक काहीतरी बदलल्यासारखं वाटलं. जणू वर्तमानातून भूतकाळात प्रवेश केल्यासारखं.
क्षणार्धात डोळ्यांसमोर जुन्या आठवणींची चित्रफीत फिरू लागली. आसपासचं जग हळूहळू कृष्ण-धवल (ब्लॅक अँड व्हाईट) होत गेलं.
पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट घातलेला मी…
आईबरोबर काकाकुवा मेंशनच्या वीजबिल केंद्राच्या रांगेत उभा.
त्या काळी वीजबिल भरणं म्हणजे एक छोटासा सणच असायचा. कारण बिल भरून झालं की ठरलेला बक्षीस कार्यक्रम,
हॉटेल अगत्यातला डोसा…
किंवा उभ्याचा वडा…
फक्त त्या लालसेपोटी मी वीजबिल भरण्यासाठी उत्साहाने तयार असायचो.
आणि वडील बरोबर असले की?
मग थेट श्रीकृष्णची मिसळ.
पावलं आपोआप तिकडे वळायची.
वडिलांच्या बरोबरीने चालणारा छोटासा मी…
तुळशीबागेतल्या दुकानांच्या रंगीबेरंगी आरासींकडे पाहत डोळे विस्फारलेले असायचे माझे.
फुलं, दागिने, देवांच्या मूर्ती, रंगीबेरंगी कापडं, लहान मुलांचे कपडे, खेळणी…
सगळंच जणू परिकथेसारखं
“काय पहायचं आणि काय सोडायचं?”
श्रीकृष्णमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी.
तेव्हा वडील मला लाईनमध्ये उभं करून, तोवर रुमाल, पट्टा, एखादं छोटंसं सामान घ्यायला जात.
मी मात्र जागा सोडायचो नाही.
आत शिरताच टूमकन उडी मारून जागा पकडायचो.
समोर मिसळीची प्लेट आली की सगळी इंद्रिये एकाच वेळी जागी व्हायची.
वास, रंग, चव, उष्णता…
सगळं काही अनुभवायचं असायचं.
पहिलाच घास घेताना डोळे मिटायची सवय आजही आहे… तेव्हापासूनचीच.
मनसोक्त मिसळ खाल्ल्यावर नेहमीची पुढची फेरी ठरलेली.
जोगेश्वरीच्या बोळातून बाहेर येत अप्पा बळवंत चौकात.
वडील रसिक साहित्य वाचनालयात पुस्तक बदलायला.
आणि मी कराचीमध्ये लस्सी प्यायला.
त्या लस्सीची गोडी अजूनही जिभेवर रेंगाळते.
आज मात्र…
फक्त मिसळीवरच भागवून परतीच्या प्रवासाला लागलो.
वेळ नाही.
जबाबदाऱ्या आहेत.
मीटिंग्स आहेत.
डेडलाईन्स आहेत.
पुन्हा रिक्षा केली.
परतताना पुन्हा लकडी पूल.
आणि पुन्हा जाणवलं,
हा पूल साधासुधा नाही.
तो दोन काळांना जोडतो.
दोन पिढ्यांमधली दरी सांधतो.
जुन्या पुण्याला नव्या पुण्याशी जोडणारा दुवा.
इथे दुचाकींना आणि लहान वाहनांना पूर्वी परवानगी नव्हती.
जणू काही हा पूल तुम्हाला मुद्दामच सांगतो आहे,
“हळू चाल.
घाई करू नकोस.
आपल्या माणसांना घेऊन चाल,
आठवणींना वेळ दे.”
त्या पुलावर एक लहान मुलगा आईचा हात सोडून कठड्याजवळ उभा होता.
खालच्या पाण्यात मासे.
त्याच्या खाऊतला एक छोटासा तुकडा त्याने राखून ठेवला होता.
तो अलगद पाण्यात टाकत होता.
मग माझ्याकडे पाहून जोरात हात हलवत हसला.
ते हसू…
निर्भेळ.
निर्लेप.
निखळ.
माझाही हात नकळत हलला.
पण त्यासारखं हसू माझ्या चेहऱ्यावर आलंच नाही.
कदाचित ते हसू मी कुठेतरी वाटेत हरवून बसलोय.
कदाचित मोठं होताना आपण ते विसरतो.
कदाचित “जबाबदारी” नावाच्या पिशवीत ते कुठेतरी खोल गुदमरून गेलं असेल.
पूल ओलांडला.
पुन्हा वर्तमान.
मागे वळून पाहिलं.
सगळं धूसर.
जसं एखादं जुनं छायाचित्र हळूहळू विरघळावं.
डोळ्यांत हलकासा ओलावा जमा झाला.
क्षणभर थांबायचं मनात आलं.
पण थांबायला वेळ कुठे?
पुन्हा मोबाईल.
पुन्हा कॉल्स.
पुन्हा काम.
पुन्हा “पैसे छापायचा घाणा”.
पण…
अन गरवारे पुलावर उगाचंच मला अशी असल्याचा भास झाला
ज्यावर लिहिलंय,
“कधी तरी पुन्हा ये.
घाई न करता.
फक्त आठवणींसाठी.”
कदाचित…
पुन्हा एकदा त्या पुलावर उभं राहून,
त्या मुलासारखं हसता आलं…
तर आयुष्य खरंच थोडं हलकं होईल.
- विश्वेश


