एखाद्या दहा वर्षांच्या मुलीला सायकल हवी असणे, यात विशेष काय आहे? बहुतेक मुलांच्या आयुष्यात अशी एखादी सायकल येतेच. तिचा रंग ठरलेला असतो, दुकान ठरलेलं असतं आणि ती मिळेपर्यंत घरात एकच विषय सुरू असतो. सायकल मिळाल्यानंतर पहिल्या काही दिवसांत गुडघे फुटतात, तोल जातो आणि एक दिवस कुणाचाही आधार न घेता आपल्याला पुढे जाता येतं. मोठेपणी या गोष्टीची फारशी आठवणही राहत नाही.
पण सौदी अरेबियातील रियाध शहरात राहणाऱ्या वज्दासाठी सायकल मिळवणे इतके सोपे नाही. तिच्या वाट्याला आलेल्या समाजात मुलीने रस्त्यावर सायकल चालवणे योग्य मानले जात नाही. म्हणूनच तिच्या आवडत्या दुकानात टांगलेली हिरवी सायकल ही इतर मुलांसाठी असते तशी साधी वस्तू राहात नाही. तिला ती हवी आहे, एवढेच वज्दाला ठाऊक आहे. ती का मिळू नये, याची मोठ्यांनी तयार केलेली उत्तरं तिला अजिबात पटत नाहीत.
२०१२ साली प्रदर्शित झालेला Wadjda हा Haifaa Al-Mansour या सौदी दिग्दर्शिकेचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट. कथा अतिशय साधी आहे. वज्दा (Waad Mohammed) एका दुकानात हिरवी सायकल पाहते. तिचा मित्र अब्दुल्ला सायकल चालवतो, मग आपण का चालवू नये, असा तिचा सरळ प्रश्न असतो. आईकडून सायकल मिळण्याची शक्यता नाही हे लक्षात आल्यावर ती स्वतः पैसे जमवू लागते. शाळेत छोट्या वस्तू विकणे, पैसे साठवणे, वेगवेगळ्या युक्त्या लढवणे सुरू होते. अखेर शाळेत कुराणपठणाच्या स्पर्धेची घोषणा होते. बक्षिसाची रक्कम सायकलसाठी पुरेशी असते. एरवी नियम मोडणारी, शिक्षकांना त्रासदायक वाटणारी ही मुलगी मोठ्या उत्साहाने स्पर्धेच्या तयारीला लागते.
या सगळ्यात वज्दा फार गोड, आज्ञाधारक, आदर्श मुलगी म्हणून दाखवलेली नाही, हे मला विशेष आवडलं. ती खोडकर आहे, हट्टी आहे, कधी खोटंही बोलते. पाश्चात्त्य गाणी ऐकते, शाळेच्या शिस्तीत फारशी बसत नाही, आणि अनेकदा आपल्या फायद्याचा विचार करते. चित्रपट तिला सुधारण्याचा प्रयत्न करत नाही. लहान मुलांच्या जगात आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी असलेली धडपड जितकी नैसर्गिक असते, तितकीच तिची ही धडपड आहे.
पण वज्दाच्या भोवतालचं मोठ्यांचं जग वेगळं आहे. शाळेत मुलींनी कसं वागावं, त्यांचा आवाज किती मोठा असावा, त्यांनी कुणाशी बोलावं, कुठे खेळावं, अशा अनेक गोष्टी ठरवलेल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका मिस हुस्सा या नियमांची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी करतात. त्या स्वतः स्त्री असूनही मुलींच्या वागण्यावर सतत पहारा ठेवतात. हा विरोधाभास चित्रपट मुद्दाम समजावून सांगत बसत नाही. आपल्यावर लादलेल्या बंधनांची राखण पुढे आपणच करू लागतो, हे त्या पात्रातून हळूहळू दिसत राहतं.
वज्दाच्या आयुष्याला समांतर अशी तिच्या आईची गोष्ट आहे. माझ्या मते चित्रपटाचा सर्वांत वेदनादायक भाग हाच. आई नोकरी करते, पण त्या काळच्या सौदी नियमांमुळे स्वतः गाडी चालवू शकत नाही. कामावर जाण्यासाठी तिला चालकावर अवलंबून राहावं लागतं. घरात तिचं आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे, पण मुलगा होऊ न शकल्यामुळे तो दुसऱ्या लग्नाच्या विचारात आहे. घरातल्या वंशवृक्षात मुलांचं स्थान आहे, मुलीचं नाही. वज्दाला मात्र या सगळ्या व्यवहारातील अन्यायापेक्षा स्वतःची सायकल अधिक महत्त्वाची वाटते.
आईला मुलीचा हट्ट कळत नाही असं नाही. कदाचित तो खूप चांगला कळतो म्हणूनच ती आधी तिला रोखत असावी. आपण आयुष्यभर ज्या नियमांशी जुळवून घेतलं, ते मोडल्यावर मुलीला काय सहन करावं लागेल याची तिला कल्पना आहे. तिची भीती आणि मुलीची इच्छा या दोन्ही गोष्टी चित्रपट आपल्यासमोर ठेवतो. आईवर राग येतो, आणि थोड्याच वेळात तिची कीवही येते.
स्पर्धेचा प्रसंग तर फार बोलका आहे. वज्दा मन लावून तयारी करते, उत्तम पठण करते आणि बक्षीस जिंकते. तिला बक्षिसाची रक्कम कशासाठी वापरायची आहे असं विचारलं जातं. ती कोणताही आडपडदा न ठेवता सांगते की तिला सायकल विकत घ्यायची आहे. तिथल्या मोठ्यांना धक्का बसतो. तिने आपलं धार्मिक शिक्षण गांभीर्याने घेतलेलं आहे, तिचं यशही निर्विवाद आहे. पण त्या यशातून तिला काय मिळवायचं आहे, हे ठरवण्याचा अधिकार तिला दिला जात नाही. तिचं बक्षीस दुसरीकडे दान करण्याचा निर्णय शाळा घेते. इतक्या वेळ केलेल्या कष्टांनंतर तिच्या हातात काहीच राहत नाही.
या प्रसंगात दिग्दर्शिका कुणावरही मोठं भाषण करत नाही. वज्दाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि निराशा पुरेशी असते. लहान मुलांना अनेकदा मोठ्यांनी सांगितलेले नियम समजत नाहीत, कारण त्या नियमांत तर्क कमी आणि सवयी जास्त असतात.
चित्रपटात आणखी एक सुंदर गोष्ट आहे. अब्दुल्ला आणि वज्दा यांची मैत्री. तो तिला चिडवतो, तिच्याशी स्पर्धा करतो, प्रसंगी तिला मदतही करतो. वज्दाला मुलगी म्हणून कमी लेखण्याचा हट्ट त्याच्यात नाही. त्याच्यासाठी सायकल चालवणे हा खेळ आहे आणि वज्दासाठी तोच खेळ मिळवण्याकरिता इतकी धडपड करावी लागते. दोघांच्या नात्यातून हा फरक अधिक स्पष्ट होतो.
दिग्दर्शिकेने रियाधचं चित्रणही फार संयमाने केलं आहे. रस्ते, शाळा, दुकानं, घरातली संभाषणं आणि दैनंदिन धावपळ यातून त्या काळच्या शहराची ओळख होते. कुठेही मुद्दाम धक्कादायक दृश्यं निर्माण केलेली नाहीत. कानावर पडणारं कुराणपठण, शाळेतले आदेश आणि वज्दाच्या आवडीचं संगीत एकाच शहरात अस्तित्वात आहे. कॅमेरा अनेकदा साध्या प्रसंगांकडे थांबून पाहतो. म्हणूनच एखाद्या दुकानाच्या काचेमागे असलेली सायकलही लक्षात राहते.
सायकल म्हटली की व्हिटोरिओ दे सिकाचा Bicycle Thieves आठवतो. त्या चित्रपटात सायकल हरवली तर एका माणसाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो. Wadjdaमध्ये सायकल अजून मिळालेलीच नाही. तरीही त्या दोन्ही चित्रपटांत एका साध्या वस्तूभोवती किती मोठं आयुष्य फिरू शकतं, हे जाणवतं. Haifaa Al-Mansour यांच्यावर दे सिकाच्या चित्रपटाचा प्रभाव होता, हे जाणून घेतल्यावर हा संबंध आणखी रंजक वाटतो.
या चित्रपटाची निर्मितीही तितकीच लक्षवेधी आहे. सौदी अरेबियात संपूर्णपणे चित्रित झालेला हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट होता. सौदी महिलेने दिग्दर्शित केलेल्या पूर्ण लांबीच्या चित्रपटाचीही ही पहिलीच वेळ होती. रियाधमधल्या काही बाह्य दृश्यांचं दिग्दर्शन Haifaa Al-Mansour यांना बंद व्हॅनमध्ये बसून, मॉनिटर आणि वॉकीटॉकीच्या साहाय्याने करावं लागलं. सार्वजनिक ठिकाणी पुरुष सहकाऱ्यांना एका स्त्रीने सूचना देणं तत्कालीन सामाजिक नियमांत स्वीकारलं जाणारं नव्हतं. पडद्यावरची मुलगी रस्त्यावर सायकल चालवू पाहत होती आणि कॅमेऱ्यामागची स्त्री त्याच रस्त्यावर उभी राहून दिग्दर्शनही करू शकत नव्हती.
शेवटचा भाग उलगडून सांगितला तर वज्दाच्या आईबद्दलच्या माझ्या भावना आणखी स्पष्ट होतील. नवऱ्याला परत आपल्याकडे वळवण्यासाठी आईला एक सुंदर लाल पोशाख घ्यायचा असतो. तिच्या मनात त्याची एक आशा असते. पण अखेर ती त्या पैशांत वज्दासाठी हिरवी सायकल घेते. ही भेट देताना आईच्या आयुष्यातले प्रश्न सुटलेले नसतात. नवऱ्याचा निर्णय बदललेला नसतो, समाजाचे नियमही बदललेले नसतात. तरी त्या क्षणी ती मुलीच्या बाजूने उभी राहते. तिच्या स्वतःच्या वाट्याला न आलेली एक छोटीशी मोकळीक ती मुलीला देते.
चित्रपटाच्या अखेरीस वज्दा सायकलवरून पुढे जाते. तिच्यापुढचा रस्ता कुठे नेईल हे तिलाही माहीत नसतं. आपण मात्र मागे राहतो, आणि थोडा वेळ तिच्या आईचाच विचार करत बसतो.
-- विश्वेश


