श्रीखंडाची गोळी ...
लहानपणी खाल्लेल्या काही विशिष्ठ गोष्टींची चव ही आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. माझ्याकरता शाळेत मिळत असलेला केळकरांच्या बोरकुटाची आणि माझ्या मोठ्या मावशीच्या वाड्यात मिळत असलेल्या श्रीखंडाच्या गोळीची चव मी कधीच विसरू शकणार नाही.
माझ्या मावशीच्या वाड्यात खाली मोठा गोठा होता, गोठ्यामागे एक विहीर आणि त्या विहिरीला लागून common संडास बाथरूम. पुण्यातील रतन टॉल्किज च्या मागे होता हा वाडा. आता वाडा पाडून अपार्टमेंट झाले आहे. पण त्या वाड्याचा एक विशिष्ठ वास होता. पूर्वीच्या प्रत्येक वाड्याचा एक विशिष्ठ वास असायचा. मावशीच्या वाड्यात एक शेणाचा, दुधाचा आणि कडब्याचा मिश्रित मंद असा आणि त्याचा त्रास होऊ नये म्हणून लावलेले धूप ही त्यात आपल्या वासाची भर घालायचे. तो वास अजूनही लक्षात आहे आणि पुन्हा कुठून आला तर नक्कीच ओळखता येईल. त्या वाड्यासमोर घोड्यांचा तबेला होता आणि त्यातील घोडा आणि टांगा प्रसिद्ध मुसाफिर हूं यारो गाण्यात वापरला गेला होता असे ऐकिवात होते, त्यामुळे त्याचे एक वेगळेच आकर्षण होते. तर असा हा वाडा आणि पहिल्या मजल्यावर असलेली मावशीची खोली. एका १० बाय १० च्या खोलीत ठरलेला नेटका संसार होता माझ्या मावशीचा. ती जागा आम्हाला कधीही छोटी वाटली नाही, infact अनेक सणावारांना त्या खोलीत आमच्या देशस्थी गोतावळ्याच्या पंगती उठल्यात... एका वेळी ५ ते ६ जण मांडी घालून खाली बसून जेवायचे बाकीची मंडळी आजूबाजूला, कोणी शेजार्यांकडे, कोणी जिन्यात असे बसलेले असायचे. ते दिवस अजूनही आठवतात आणि आता ते पुन्हा अनुभवता येणार नाही, मुलाला दाखवता येणार नाही, याची रुखरुख आहे. पूर्वी वाड्यातील प्रत्येक कुटुंब म्हणजे एक extended family सारखे होते. कोणाच्याही घरात अगदी हक्काने शिरता यायचे, सगळे सगळ्यांना ओळखत असत.
ह्या वाड्यात खालच्या मजल्यावर जिना सुरु होतो तिथे एकच खोली होती तिथे एक आज्जी एकट्याच राहायच्या, कुलकर्णी आज्जी, निवृत्त शिक्षिका होत्या. त्यांच्याकडे बघून कोणीही ओळखेल की या शिक्षिका होत्या. अतिशय प्रेमळ आवाज, वयानुसार आणि भरपूर वापरला गेल्याने थोडा खोल गेलेला पण त्यात एक शिक्षिका असल्याची athority नक्कीच शाबूत होती. त्या बरेचदा त्यांच्या घराच्या पायरीवर बसलेल्या असायच्या आणि मी मावशीकडे आलो कि जाताना मला हाक मारायच्या, टोपण नावाने नाही तर माझ्या पालकांनी ठेवलेल्या खऱ्या नावाने (याचा मला एक विशेष आनंद होते, कारण बाकी वाडाभर माझे खरे नाव बहुतेक कोणाला माहितीच नसेल, सगळे टोपण नावानेच हाक मारायचे).
“आलास का रे, विश्वेश, थांब जरा” असा म्हणत त्याच्या बटव्यातून एक छोटीशी प्लास्टिक ची पिशवी काढायच्या आणि त्यातून एक श्रीखंडाची गोळी माझ्या हातावर ठेवायच्या. मावशीच्या घरी जाताना लागणार हा stop आणि त्यावर मिळणाऱ्या ह्या गोळीची (की त्या आज्जीनी प्रेमाने केलेल्या विचारपूसीची हे सांगणे आता अवघड आहे) इतकी सवय झाली होती, की आज्जी दारात बसलेल्या नसतील तेव्हा मी अगदी हक्काने घरात शिरून गोळी मागायचो बरेचदा. त्या म्हातारीनं कधीही एका ऐवजी दोन गोळ्या दिल्या नाहीत, मागितली अजून एक तरी “आता पुढच्या वेळी” म्हणायच्या. मी त्यांचे नाव गोळी आज्जी ठेवले होते. खरे नाव काय हे आज दुसऱ्या नंबरच्या मावशीला फोन करून विचारावे लागले.
जसे वय मोठे झाले, तसे वाड्यात जाणे कमी झाले. मावशी आणि मावसाहरी (म्हणजे मावशीचे हरी ...) काही वर्षांत देवाघरी गेले, तो वाडा पाडला, त्या नंतर पुन्हा त्या आज्जीची भेट नाही. श्रीखंडाची गोळी ही पुन्हा कधीच खाल्ल्याचे आठवत नाही (अर्थात कोणी कधी इतक्या प्रेमाने दिलीही नाही) ... अजूनही खाऊवाले पाटणकर वगैरे दुकानांमध्ये मिळतात या गोळ्या, दिसतात बरेचदा खरेदी करतांना, पण श्रीखंडाची गोळी अशी विकत घेऊन खायची कधी इच्छाच झाली नाही ...
असो, तर अशी एखादी अनामिक श्रीखंडाची गोळी किंवा तत्सम काही देणारी आज्जी प्रत्येकाच्या लहानपणात दडलेली असते. बघा कधीतरी मागे वळून ...
— विश्वेश



Sundar mitra…