वसंत गेल्यावरही असतात कुठे कुठे
वसंतात फुललेली फुले...
तू निघून गेल्यावर
शब्दांनी धारण केलेल्या अर्थसारखी.
द. भा. धामणस्कर गेले, आणि त्यांच्या जाण्याची बातमी वाचल्यापासून या चार ओळी मनाच्या कुठल्यातरी अंधाऱ्या खिडकीत येऊन बसल्या आहेत.
धामणस्करांविषयी मी काय आणि किती लिहू ...
माझ्या पुस्तकांच्या कपाटात “प्राक्तनाचे संदर्भ” हे एकेकाळी मी मुद्दाम उलटं करून ठेवलेलं पुस्तक होतं, त्याचं नाव दिसू नये म्हणून, आणि हे मी गंमतीने म्हणायचो खरं, पण त्या गंमतीच्या तळाशी खरी भीती होती, कारण काही पुस्तकं आपल्याला माहिती देतात, काही आनंद देतात, काही विसरायला मदत करतात, तर काही पुस्तकं अशी असतात की आपण त्यांना वाचायला बसतो आणि काही पानांनंतर लक्षात येतं की पुस्तकच आपल्याला वाचत आहे, आपल्या आयुष्याबद्दल आपण वर्षानुवर्षं तयार केलेल्या सोयीस्कर स्पष्टीकरणांच्या पलीकडे ते आपल्याकडे पाहत आहे, आपल्याला उघडं पाडत आहे.
धामणस्करांची आणि माझी पहिली भेट झाली “हस्तांतर” मध्ये:
विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती जड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला,
द्या इकडे...
मी पुन्हा तरुण, ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला...
मी ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा माझा स्वतःचा मुलगा ७-८ वर्षांचा होता, त्यामुळे मला ती कविता त्याही काळातच फार बोचली होती आणि आज या ओळींकडे पाहताना प्रश्न अधिक कठीण वाटतो, कारण पालक म्हणून आपण पुढच्या पिढीला काय देतो याचा हिशेब आपण फार अभिमानाने मांडतो, शिक्षण, संधी, मूल्यं, सुरक्षितता, अनुभव, पण त्या सगळ्याच्या चौरंगावर आपली भीती, आपली अपूर्ण स्वप्नं, आपल्या न तपासलेल्या श्रद्धा, आपल्या अपूर्ण आकांक्षांची मूर्ती ही ठेवत नाही ना, आणि मग “द्या इकडे” म्हणणाऱ्या हाताकडे पाहताना त्याच्या ताकदीचा आनंद करायचा की आपण त्यावर काय ठेवतो आहोत याची भीती वाटायची, हे धामणस्कर सांगत नाहीत. आणि आता त्यांना विचारूही शकत नाही.
त्यांची कविता मला अभिव्यक्तीपेक्षा अधिक निरीक्षणाची, चिंतनाची वाटते.
“अनंताचे फूल” मध्ये एखाद्या अनोळखी स्त्रीच्या केसात फूल दिसतं आणि अचानक त्या फुलामागचं अंगण दिसायला लागतं.
तुझ्या केसात
अनंताचे फूल आहे म्हणजे
तुझ्याही अंगणात अनंताचे
झाड आहे...
या ओळी मला फार आवडतात, कारण आपण नातं निर्माण करण्यासाठी आज किती माहिती मागतो, नाव, गाव, व्यवसाय, धर्म, राजकारण, विचार, ओळख, पण धामणस्करांना एका फुलाचा सुगंध पुरतो, आणि मग ते म्हणतात,
नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात
एक तरल संबंध रुजून
आलेला मी पाहतो...
या “रुजून येण्या”त मला धामणस्करांची पूर्ण कविता दिसते, कारण त्यांच्या जगात नाती जाहीर करावी लागत नाहीत, ती उगवतात, झाडांसारखी, अनंताच्या फुलांसारखी, आणि कदाचित म्हणूनच त्यांची कविता माणसांमधले फरक मिटवण्यासाठी घोषणापत्र लिहीत नाही, ती फक्त दोन अनोळखी माणसांच्या मध्ये एक ओळखीचा फूलाच सुगंध ठेवते.
माझी चाहूल लागताच पक्षी
घाबरून आकाशात उडाला...
क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे
विराटाकडे धाव घेतात...
माणूस पृथ्वीवर उभा आहे, त्याच्याकडे भाषा आहे, धर्म आहेत, युद्धं आहेत, शहरं आहेत, विद्यापीठं आहेत, तंत्रज्ञान आहे, आणि तरी एका घाबरलेल्या पक्ष्याच्या उड्डाणात तो अचानक “क्षुद्र” होऊन जातो, “विराट” आकाशापुढे. धामणस्करांच्या कवितेत वारंवार घडणारी ही मानवी अहंकाराची उलथापालथ मला फार महत्त्वाची वाटते, कारण ते माणसाचा अपमान करत नाहीत, फक्त त्याला केंद्रस्थानापासून दोन पावलं लांब करतात.
कदाचित म्हणूनच मला कृष्णमूर्तींच्या विचारांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता हे कळल्यावर त्यांच्या कविता अधिक स्पष्ट होऊ लागल्या, कारण कृष्णमूर्तींकडे पाहणं हे निष्कर्षापेक्षा आधी येतं, judgement च्या आधी observation, आणि धामणस्करांकडेही काहीसं तसंच वाटतं, त्यांनी पाहिलेल्या जगावर स्वतःची भावना ओतण्याआधी ते त्याला थोडा वेळ जसं आहे तसं ते राहू देतात, आणि मग कधी एखादं फूल बोलतं, कधी पक्षी, कधी वस्तू, कधी समुद्र, कधी चांदणं.
त्यांची “कोजागिरी” ही कविता तर मला हा प्रश्न थेट विचारते की जागरण आणि जागेपण यात अंतर किती?
जागणारे खाण्यागाण्यात चूर…
चांदणे पलीकडे दूर स्वस्थ उभे,
जागणाऱ्यांना जाग येण्याची वाट पाहत
उजाडेपर्यंत...
ही कल्पनाच इतकी निर्दयी आहे की कविता वाचल्यानंतर काही दिवस चंद्राकडे पाहतानाही मला अपराधी वाटायचं, उगाच तो म्हणेल, आज आठवण झाली होय रे माझी, पण त्या हलक्या विनोदामागे धामणस्करांचा फार मोठा प्रश्न उभा आहे, आपण खरंच पाहतो का, आपल्या आयुष्यात रोज उगवणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात का, की त्या फक्त आपल्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीला उभ्या असतात.
आणि मग शेवटी,
चांदणे एव्हाना ठार बहिरे,
निःशब्द,
मलूल...
माघारी फिरलेले,
दीन, अननुग्रहीत याचकासारखे...
चांदण्याला “अननुग्रहीत याचक” बनवण्याची ही प्रतिमा वाचल्यानंतर कोजागिरीचा अर्थच बदलतो, कारण उत्सवात आपण चंद्राचा उत्सव करतो असं आपल्याला वाटतं, पण कदाचित चंद्राशिवायच आपला उत्सव व्यवस्थित चाललेला असतो.
धामणस्करांच्या झाडांच्या कविता मला आणखी अस्वस्थ करतात, कारण झाड त्यांच्याकडे निसर्गाची सजावट नाही, तर स्वतंत्र नैतिक अस्तित्व आहे, आणि “झाडे सत्तेवर आली की” मध्ये ते एक फार साधा, पण भयंकर प्रश्न विचारतात.
माणसे
निरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतात,
त्यांचे हातपाय तोडून त्यांना
बेमुर्वतखोरपणे
उघड्यावर रचून ठेवतात...
इथपर्यंत आपण शांतपणे वाचतो, कारण यात नवीन काय आहे, आपल्या शहरात रोज हेच दिसतं, झाडाने चुकीच्या दिशेला फांदी केली की ती कापतो, वायरला लागलं तर कापतो, दृश्य अडवलं तर कापतो, रस्त्याच्या आराखड्यात आलं तर संपूर्ण झाडच जातं, म्हणजे माणसांच्या राज्यात झाडांना वाढण्याचं स्वातंत्र्य आहे, फक्त त्यांनी माणसाने आखलेल्या चौकटीत वाढलं पाहिजे, आणि मग धामणस्कर अगदी सहज म्हणतात,
उद्या झाडे सत्तेवर आली की तीही
तोडलेल्या माणसांची हाडे
अशीच उघड्यावर रचून ठेवतील...
हे वाचल्यावर मी खिडकीबाहेर पाहिलं आणि त्या क्षणी प्रथमच जाणवलं की आपण फक्त झाडं तोडत नाही, आपण त्यांच्यासाठी शासन, एक व्यवस्था चालवतो, त्यांनी कुठे वाढायचं, किती वाढायचं, कोणत्या दिशेला वाढायचं, हे सगळं आपण ठरवतो, आणि धामणस्कर एवढंच म्हणतात,
फक्त एकदा
त्यांचे राज्य आले पाहिजे.
बाप रे.
पण हेच झाडांचं जग त्यांच्या कवितेत फक्त सूडाचं नाही, त्यात प्रगल्भता आहे, शांतता आहे, पाखरांच्या स्वातंत्र्याला जागा आहे, आणि म्हणून त्यांच्या इतर झाडांच्या कवितांकडे पाहताना मला जाणवतं की धामणस्करांसाठी maturity म्हणजे दुसऱ्याला धरून ठेवणं नव्हे, त्याला आपल्या फांदीवरून आकाशात जाऊ देणं, परत यायचं की नाही हे त्याच्यावर सोडणं, आणि स्वतः मात्र तिथेच उभं राहणं.
हीच गोष्ट त्यांच्या “साधना” मध्ये आणखी निर्मळ रूप घेते, जिथे पाणी प्यायला आलेल्या पक्ष्याला आपल्या उपस्थितीची भीती वाटत असेल तर दूर व्हायचं, आणि आपलं प्रतिबिंबही त्याला अडवत असेल तर आणखी दूर व्हायचं, इतकं दूर की अखेर पाण्यात आपण दिसेनासं व्हावं आणि तिथे फक्त आकाश उरावं, आणि मला वाटतं ही प्रतिमा त्यांच्या संपूर्ण काव्यस्वभावाचा केंद्रबिंदू आहे, कारण आजच्या काळात आपण प्रत्येक जलाशयावर आपलं प्रतिबिंब उमटवण्यासाठी धडपडत आहोत, प्रत्येक संभाषणात आपलं मत, प्रत्येक यशावर आपलं नाव, मुलांच्या आयुष्यावर आपल्या इच्छा, प्रेमावर आपली मालकी, आणि अशा काळात एक कवी सांगतो की खरी साधना कदाचित स्वतःला अधिक ठळक करण्याची नसून, दुसऱ्याला निर्भयपणे पाणी पिता यावं म्हणून स्वतःची सावलीही पडू नये इतके मागे जाणे ...
धामणस्करांची करुणा झाडांवर आणि पक्ष्यांवर थांबत नाही, ती गरीब मुलांपर्यंत जाते, वापरून झालेल्या वस्तूंपर्यंत जाते, पडलेल्या पानांपर्यंत जाते, आणि याच कारणाने त्यांची कविता माझ्यासाठी “निसर्गकविता” नाही, ती जगातील प्रत्येक गोष्टीच्या स्वतंत्र असण्याच्या हक्काची कविता आहे, जिथे मनुष्य हा केंद्रबिंदू नाही, तो फक्त इतर सगळ्यांबरोबर या विश्वाचा एक सहभागी आहे.
मला त्यांच्या “वस्तू” सारख्या कवितांचा विचार केला की घरातल्या जुन्या वस्तू आठवतात, कुणीतरी वापरलेली खुर्ची, वर्षानुवर्षं हाताला सरावलेला एखादा कप, एखाद्या माणसाच्या हस्ताक्षराची सवय झालेलं पेन, पुस्तकाच्या पानांत अडकलेलं जुने बिल, कारण काही वस्तूंची किंमत त्यांच्या बाजारभावात नसते, त्या आपल्या आयुष्याचा काही काळ आपल्या अंगावर साठवून ठेवतात, आणि माणूस गेल्यानंतर मृत्यूची बातमी आपल्याला अनेकदा त्याच्या वस्तू पुन्हा सांगतात, रिकामी खुर्ची पहिल्यांदा नाही, प्रत्येक वेळी थोडी थोडी रिकामी होत राहते.
कदाचित म्हणूनच धामणस्करांच्या कवितेत माणूस मेल्यावर डॉक्टरांना विचारावं इतकंच पुरेसं नसतं, त्याच्या वाटेवरच्या झाडालाही त्यांना विचारावंसं वाटतं, कारण मृत्यूचं कारण वैद्यक सांगू शकतं, पण अनुपस्थितीची नोंद कोणकोणत्या गोष्टींनी घेतली आहे हे वैद्यकाला माहीत नसतं, आणि ही कल्पना आज त्यांच्या स्वतःच्या जाण्यानंतर विचित्रपणे ठळक होते, धामणस्कर गेले हे आपण माणसांनी नोंदवलं आहे, पण त्यांनी इतकी वर्षं पाहिलेली झाडं, पक्षी, पानं, फुलं, समुद्र, चांदणं यांनी काय नोंद केली असेल, हा प्रश्न काही मला सुटत नाही.
आज त्यांच्या जाण्यानंतर मला त्यांच्या शब्दांविषयी लिहितानाही थोडा संकोच वाटतो, कारण कवीच्या मृत्यूनंतर कवीबद्दल मोठमोठी वाक्यं लिहिण्याचा मोह असतो, पण धामणस्कर स्वतः मोठ्या वाक्यांचे कवी नव्हते, आणि दुःखाच्या काही खोल खोल्यांत शब्द अपुरे पडतात हे त्यांना नीट माहीत होतं, म्हणून कदाचित त्यांच्याबद्दल लिहिताना प्रत्येक काही परिच्छेदांनंतर काही वेळ शांत बसावंसं वाटतं, जणू यातला काही भाग आपण लिहायचा नाही, तो रिकामा ठेवायचा.
कालचे सर्व गंगेचे
गंगेत सोडुनी दिधले
पात्रात निरामय नूतन
दे भोग आजचे सगळे.
आयुष्यात असं काही तरी निर्मळ करावं की हे पुस्तक मी शेल्फमध्ये पुन्हा सरळ करून ठेवू शकेन, तोवर माझे भोग मी भोगत राहीन, पण आज इतकी वर्षं गेल्यावर, आयुष्यात काही माणसं निघून गेल्यावर, काही घरं मागे राहिल्यावर, मुलं आपल्या दिशेने नव्हे तर स्वतःच्या दिशेने चालायला लागल्यावर, असं वाटतं की काही पुस्तकांनी शेल्फमध्ये सुखाने बसूच नये, ती अधूनमधून वाकडी व्हावीत, खाली पडावीत, रात्री हाताला लागावीत, सहज एखादं पान उघडावं आणि त्या चार ओळींनी आपण दिवसभर स्वतःशी केलेला एखादा सोयीचा करार रद्द करावा, कारण आपल्याला कायम शांत करणारी पुस्तकंच आपली काळजी घेतात असं नाही, कधी कधी आपल्याला बेचैन करणारी पुस्तकं आपल्यावर जास्त प्रेम करत असतात.
आज प्राक्तनाचे संदर्भ पुन्हा हातात घ्यावंसं वाटतं, यावेळी भीतीने नाही, तर त्या माणसाबद्दलच्या कृतज्ञतेने ज्याने इतक्या कमी शब्दांत जगातील इतक्या गोष्टींकडे पुन्हा पाहायला शिकवलं. आणि म्हणून शेवटी पुन्हा सुरुवातीच्या त्या चार ओळींकडे परत यावंसं वाटतं,
वसंत गेल्यावरही असतात कुठे कुठे
वसंतात फुललेली फुले...
तू निघून गेल्यावर
शब्दांनी धारण केलेल्या अर्थसारखी.
“द. भा. धामणस्कर गेले” असं लिहिताना त्या वाक्यातला “गेले” हा शब्दही थोडा अपुरा वाटतो, कारण माणूस निघून जातो तेव्हा त्याच्या वस्तू उरतात, पण कवी निघून जातो तेव्हा त्याने जगाकडे पाहण्याची दिलेली पद्धत उरते, आणि मग पुढच्या वेळी एखादा पक्षी आपल्याला पाहून उडेल तेव्हा क्षुद्र आणि विराट आठवतं, मुलगा आपल्या हातातून काही वजन घेईल तेव्हा ययाती आठवतो, चंद्राकडे पाहताना आपण खरंच जागे आहोत का हा प्रश्न आठवतो, झाडाची फांदी कापताना त्यांचं राज्य आठवतं, आणि कुणाच्या केसात अनंताचं फूल दिसलं तर पूर्ण अनोळखी माणसाशी आपलं एक अदृश्य नातं असू शकतं ही शक्यता आठवते.
कवी याहून अधिक किती राहू शकतो?
वसंत गेला आहे.
पण कुठे कुठे अजून फुलं आहेत, आणि त्या फुलांच्या पाकळ्यांवर फार लक्ष देऊन पाहिलं तर शब्दांनी धारण केलेला त्यांचा अर्थ अजून ओला आहे.
द. भा. धामणस्करांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻
१४ ऑगस्ट २०२६
-- विश्वेश
तळटीप: मी मुद्दाम सगळ्या कविता इथे दिल्या नाहीत, तुम्ही जाऊन त्यांची एखादी तरी कविता वाचावीत ही इच्छा ...



सर, खूप मस्त लिहिता तुम्ही. २-३ लेख वाचले तुमचे..अगदी सहज, मनापासून पण तितकंच परखड आणि पोक्त ...I am glad to have found your account 🙂
भारी लिहिलंयस.... अगदी पोटातून उमटलंय...