शब्दांमधला श्वास: अभंगांपासून विरामचिन्हांपर्यंत
कधी कधी आयुष्यात एखादी गोष्ट इतकी सवयीची होते, की तिच्यामागचा इतिहास आपल्याला दिसेनासा होतो.
पूर्णविराम.
स्वल्पविराम,
प्रश्नचिन्ह?
आज ही चिन्ह नसतील तर वाचतांना आपल्याला त्रास होतो. पण एक काळ असा होता, जेव्हा मराठी भाषा या सगळ्यांशिवायही सुंदरपणे जगत होती.
आणि हे सगळे आपल्याला इतकी वर्ष मराठी वाचत आणि लिहीत असतांनाही कसे काय कळले नाही याचे नवलही वाटले आणि काहीसे वाईट ही.
लहानपणी मला कधीच असं वाटलं नाही की शब्दांच्या मध्ये अंतर ठेवायचे असते, मध्ये मध्ये श्वास घ्यावा लागतो, वाक्य योग्य ठिकाणी तोडावी आणि जोडावी लागतात.
तेव्हा वाटायचं शब्द म्हणजे शब्द. ओळ म्हणजे ओळ. गोष्ट म्हणजे खूपसाऱ्या ओळी आणि कविता म्हणजे… पाठ करून चालीत म्हणायची गोष्ट.
आमच्या शाळेत, घरी, वाचनात, वाड्यात, सगळीकडे अभंग, ओवी, मोरोपंतांच्या आर्या, पोवाडे, भारुडं यांचा वावर होता. कुठे तरी वहीत लिहिलेलं, कुठे तरी पुस्तकात छापलेलं, तर बहुतेक वेळा फक्त आठवणीत साठवलेलं आम्ही मुलं सतत म्हणायचो.
म्हणजे आम्ही ते पाठ करायचो.
मोठ्याने म्हणायचो.
तालात.
भावात.
मनापासून.
सदा सर्वदा योग तुझा घडावा |
तुझे कारणी देह माझा पडावा |
उपेक्षु नको गुणवंता अनंता |
रघुनायका मागणे हेचि आतां ||१||
जय जय रघुवीर समर्थ ||
हे म्हणताना कधीच वाटलं नाही की इथे पूर्णविराम आहे का, इथे स्वल्पविराम आहे, इथे प्रश्नचिन्ह आहे.
कारण त्या ओळींमध्ये आधीच श्वासाच्या जागा ठरलेल्या होत्या.
अभंग म्हणताना आवाज आपोआप कडव्या आधी थांबायचा.
ओवीत लय होती.
आर्येत ठरावीक उठाव-बसाव होता.
पोवाड्यात जोश होता.
भारुडात नाट्य होतं.
शब्दांपेक्षा आवाज, त्यातले चढ उतार, चाल महत्वाची होती तेव्हा, अर्थापेक्षा भाव.
पूर्वीच्या मराठी लिखाणात दंडाचा प्रयोग व्हायचा. बहुतेक एक दंड । म्हणजे स्वल्पविराम आणि दोन दंड ।। म्हणजे पूर्णविराम, कदाचित असेल असेल. (याचा अभ्यास चालू आहे)
तेव्हा शब्द वाचले जायचे नाहीत. शब्द अनुभवले जायचे.
आमच्या शाळेतल्या लेले बाई म्हणायच्या “अरे पोरांनो नुसते रेकल्यासारखं राष्ट्रगीत, प्रार्थना म्हणू नका, त्याचा अर्थ समजून घ्या, भावना समजून घ्या, शब्द अनुभवा आणि मग गा”
मग हळूहळू मोठं होताना गद्य आलं.
निबंध आले.
उत्तरपत्रिका आली.
वर्तमानपत्र आलं.
पुस्तकं आली.
आणि अचानक लक्षात आलं अरे, इथे तर थांबायचं कुठे, श्वास कुठं घ्यायचा हे सांगणारी काही चिन्हं असतात!
पूर्णविराम.
स्वल्पविराम,
प्रश्नचिन्ह?
उद्गारवाचक!
शब्दांना आता कागदावर श्वास घेण्याच्या जागा दाखवायला, काही वेळा २ वाक्य जोडायला किंवा काही ठराविक भाव दाखवण्यासाठी या खूणा लागतात.
पण हे कधी, कसं, कुणी ठरवलं याचा मी कधी विचारच केला नव्हता.
आजपर्यंत.
आजच, एका व्हाट्सअँप फॉरवर्ड मध्ये मराठीतील विरामचिन्हांवर एक बातमी आली आणि ती वाचताना एका नावावर माझं लक्ष थांबलं.
थॉमस कँडी.
ब्रिटिश अधिकारी.
इंग्रज.
आणि मराठी भाषेचा एक मोठा शिल्पकार.
हे वाचून उत्सुकता ताणली. (नाहीतर सहसा मी व्हाट्सअँप फॉरवर्ड वाचत नाही)
आपल्या भाषेच्या शिस्तीचा पाया एका परदेशी माणसाने घातला?
या बद्दल अजून जाणून घ्यायचं ठरवलं आणि मी त्या रॅबिट होल मध्ये शिरलो.
एक लेख.
मग दुसरा.
मग तिसरा.
मग संदर्भ.
हा प्रवास अजून सुरूच आहे.
हळूहळू चित्र थोडं थोडं स्पष्ट होत गेलं.
थॉमस कँडी हे केवळ सरकारी अधिकारी नव्हते.
ते मराठीचे विद्यार्थी होते. अभ्यासक होते. या भाषेवर प्रेम करणारे होते.
त्यांनी मराठी व्याकरणावर काम केलं. शब्दकोश तयार केला. शालेय पुस्तकं लिहिली. इतकेच नाही तर इंग्रजी कायदे मराठीत आणले. भाषांतरांची शुद्धता सुधारली.
पण सगळ्यात महत्त्वाचं काम? मराठीला लिहिण्याची शिस्त दिली. त्यांनी “विरामचिन्हांची परिभाषा” हा छोटासा पण ऐतिहासिक ग्रंथ लिहिला.
या पुस्तकात त्यांनी प्रथमच स्पष्ट सांगितलं की वाक्य कुठे संपतं, कुठे थांबतं, कुठे प्रश्न उभा राहतो, कुठे भावना फुटते, हे सगळं कागदावर कसं दाखवायचं. आज आपण हे इतकं सहज वापरतो, की त्यामागचं कष्टाचं काम दिसतच नाही. हे वाचताना मला थोडा धक्का बसला. कारण मला जाणवलं, मी आज जो ब्लॉग लिहितो, जे पुस्तक वाचतो, जे विचार मांडतो, त्यातला प्रत्येक पूर्णविराम, प्रत्येक स्वल्पविराम, प्रत्येक प्रश्नचिन्ह, कुठेतरी कॅन्डींच्या विचारातून आलेला आहे.
माझ्या लहानपणीचे अभंग ओव्या हे आवाजातल्या चढ उतारावर, चालीवर उभे होते. आणि हे सर्व लेखन चिन्हांवर उभे आहेत. दोन्ही सुंदर आहे. पण दोघांचं जग वेगळं आहे. जसे शब्द माणसावर अवलंबून होते तसेच आज माणूस शब्दांवर अवलंबून आहे.
बोलतांना तुमचा गळा विराम ठरवतो तर लिहितांना तोच विराम बिंदू ठरवतो.
आणि या बदलामागे शांतपणे उभा असलेला माणूस “थॉमस कँडी” आणि त्याचे काम हे फारसे कोणाला माहितीही नाही.
ना पुतळा.
ना घोषणा.
ना उत्सव.
फक्त पुस्तकं.
नियम.
शिस्त.
आणि एक अभिजात भाषा.
आज एखादा जुना अभंग ऐकताना बरोब्बर जागी मन थांबतं, कोणत्याही विराम चिन्हाशिवाय. आणि एखादा लेख, निबंध किंवा गोष्ट वाचताना डोळे थांबतात ते या विराम चिन्हांबरोबर. दोन्ही ठिकाणी विराम आहे. फक्त स्वरूप वेगळं आहे. आपल्या आतला आवाज जो आपल्याला ते लिहिलेले वाचून दाखवत असतो तो ह्या सगळ्या चिन्हांचे अनुकरण करत असतो. दोन्हींचा इतिहास आपल्या भाषेत खोलवर मिसळलेला आहे.
हे लिहिताना मला बरेच प्रश्न पडलेत. मराठी भाषा आणि व्याकरण या विषयात शाळेत असतांना कधी फारसा रस घेतला नव्हता याची आता खंत वाटते.
मराठी शाळांनी भाषेला कसं वळण दिलं?
मराठी मुद्रणयंत्र, मुद्रणकला कशी आली?
पहिली मराठी छापील पुस्तकं कोणती?
मराठी पुस्तकांच्या संपादकांनी भाषा कशी घडवली?
या सगळ्यांचा शोध अजून बाकी आहे. पाहू हे रॅबिट होल कुठे नेते मला.
“थॉमस कँडी” बद्दल अधिक इथे वाचा:
संदर्भ
मराठी विश्वकोश: थॉमस कँडी
https://marathivishwakosh.org/3407/
मराठी विकिपीडिया: थॉमस कँडी
https://mr.wikipedia.org/wiki/थॉमस_कँडी
- विश्वेश
आज १३ जुलै, आज पहिला मराठी शब्दकोश तयार करणारे जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचा स्मृतिदिन.
जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काहीही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून टाकून शेवटपर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करुन घेतात काय, सगळेच अघटित आहे. या कामात त्याच्या साथीला होते थॉमस कँडी.
जेम्स थॉमस मोल्सवर्थ या ब्रिटिश अधिकाऱ्याचे मराठीवर अनंत उपकार आहेत!


